Kolhapur Crime : गीता, धनश्रीचे ‘ऑपरेशन गर्भलिंग निदान’

कोल्हापूर; प्रतिनिधी : गीता आणि धनश्री रुग्ण म्हणून फुलेवाडीतील क्लिनिकमध्ये गेल्या. गर्भपात करण्यासाठी ३५ हजार रुपये खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ३५ हजार रुपये दिल्यानंतर डॉक्टरने एक गोळी दिली. त्यानंतर एका व्यक्तीला फोन करा म्हणून डॉक्टरांनी सांगितले. संबंधित व्यक्तीने जोतिबा डोंगरावर असल्याचे सांगितले. दोघी तिथे गेल्या पण ती व्यक्ती मिळाली नाही. पोलिसांनी मोबाईल लोकेशन तपासल्यावर संबंधित व्यक्ती बुधवार पेठेतील लॅबमध्ये होती. लॅबमध्ये आणखी तीन पेशंट होते. तिथे त्यांना सोनोग्राफीचे मशिन सापडले. गीता आणि धनश्री, पीसीपीएनडीटी पथकातील डॉक्टर. पोलिसांनी बोगस डॉक्टरसह तिघांना पकडले आणि ‘ऑपरेशन गर्भलिंग निदान रॅकेट’ यशस्वी झाले. तिघांविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.  (Kolhapur Crime)

डॉ. डी. बी. पाटील (रा. राजलक्ष्मीनगर, कोल्हापूर, मूळ गाव घाणवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) तंत्रज्ञ बजरंग श्रीपती जांभिलकर (रा. महाडिकवाडी. ता. पन्हाळा जि. कोल्हापूर), गजेंद्र उर्फ सनी बापूसाहेब कुसाळे (रा. सिरसे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) अशी या तिघांची नावे आहेत.

बनावट ग्राहक बनून केला पर्दापाश

फुलेवाडी परिसरातील प्रतीक्षा क्लिनिक आणि वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगर येथे अवैधरित्या गर्भपात आणि गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती पीसीपीएनडीटी समितीला मिळाली होती. त्यानुसार समिती सदस्या आणि सामाजिक कार्यकर्त्या गीता हासूरकर आणि पोलिस अधीक्षक कार्यालयातील कॉन्स्टेबल धनश्री पाटील यांनी सापळा रचला. धनश्री पाटील या बनावट ग्राहक आणि त्यांची मैत्रीण म्हणून गीता हासूकर यांना मोहिमेवर पाठवले. बुधवारी (दि.१८) रात्री धनश्री पाटील यांनी प्रतीक्षा क्लिनिकचे डॉ. डी.बी. पाटीलला पुण्याहून बोलत असल्याचे सांगितले. त्यांनी गर्भपात करण्यासंबंधी डॉक्टरांना विचारले. त्यांनी गर्भपात करण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी ३५ हजार रुपये खर्च येईल असे सांगितले. गुरुवारी (दि. १९) रंकाळा तलाव परिसरात येण्यास सांगितले. ठरल्यावेळी धनश्री आणि गीता या दोघीही रंकाळा परिसरात गेल्या. तिथे डॉ. पाटीलला दोघींनी रोख ३५ हजार रुपये दिले. त्यानंतर डॉक्टरने एक गोळी दिली. आणखी १५ हजार रुपये घेऊन फुलेवाडीतील क्लिनिकमध्ये त्यांना यायला सांगितले.  (Kolhapur Crime)

मोबाइल लोकेशनवरून काढला माग

सायंकाळी पाच वाजता धनश्री आणि गीता फुलेवाडीतील डॉ. पाटीलच्या क्लिनिकमध्ये गेल्या. पण तिथे डॉक्टर नव्हते. मोबाईलवर कॉल केला असता त्यांनी बजरंग जांभिलकरला भेटण्यास सांगितले. पण त्याचीही भेट झाली नाही. त्याच्या मोबाईलवर कॉल केला असता त्याने जोतिबा डोंगरावर असल्याचे सांगितले. दोघी जोतिबा डोंगरावर गेल्या. पण जांभिलकरची भेट झाली नाही. तो मोबाईल कॉलही रिसिव्ह करत नव्हता. पोलिसांनी मोबाईल लोकेशन शोधून काढले असता जांभिलकर बुधवार पेठेतील एका लॅबमध्ये असल्याचे लक्षात आले. दोघी धन्वंतरी लॅबमध्ये पथक असता दोन ते तीन रुग्ण वेटिंगवर होते. त्या ठिकाणी सनी कुसाळे हा तरुणही होता. पीसीपीएनडीटी पथकाने लॅबची तपासणी केली. त्यावेळी जांभिलकरच्या सॅकमध्ये सोनोग्राफी मशिन सापडले. तसेच औषधे आणि इंजेक्शनही मिळाली. सायंकाळी डॉक्टरच्या कारची तपासणी केली असता त्यातही औषधे सापडली. (Kolhapur Crime)

पीसीपीएनडीटी पथकात डॉ. प्रकाश पावरा, डॉ. सुदर्शन पाटील, गीता हासूरकर, कॉन्स्टेबल धनश्री पाटील, कायदा सल्लागार ॲड. गौरी पाटील यांचा समावेश होता.

पीसीपीएनटीडी पथकाकडून महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी सुदर्शन पाटील यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार डॉ. डी. बी. पाटील (रा. राजलक्ष्मीनगर, कोल्हापूर, मूळ गाव घाणवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) तंत्रज्ञ बजरंग श्रीपती जांभिलकर (रा. महाडिकवाडी. ता. पन्हाळा जि. कोल्हापूर), गजेंद्र उर्फ सनी बापूसाहेब कुसाळे (रा. सिरसे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) या तिघांना पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी त्यांना कोर्टापुढे हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (Kolhapur Crime)

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी