बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी सुरेश चंद्राकर याला विशेष तपास पथकाने (एसआयटी) हैदराबाद येथून अटक केली. पोलीस महानिरीक्षक (बस्तर रेंज) सुंदरराज पी यांनी सोमवारी ही माहिती दिली. पत्रकार मुकेश चंद्राकर यांची हत्या ३ जानेवारीला हत्या झाल्याचे उघड झाले होते. त्या दिवसापासून ठेकेदार सुरेश चंद्राकर फरार होता. (Journalist murder)
सोमवारी सकाळी आरोपीला बिजापूर येथे आणण्यात आले. त्याची चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. हत्या प्रकरणात सुरेश चंद्राकरचा भाऊ रितेश चंद्राकर आणि दिनेश चंद्राकर आणि पर्यवेक्षक महेंद्र रामटेके या तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
मुक्त पत्रकार मुकेश चंद्राकर (वय ३३) हे १ जानेवारी रोजी बेपत्ता झाले होते. ३ जानेवारीला त्यांचा मृतदेह बिजापूर शहरातील चट्टनपारा बस्ती येथे सुरेश चंद्राकर यांच्या मालकीच्या मालमत्तेच्या सेप्टिक टँकमध्ये सापडला होता.(Journalist murder)
२५ डिसेंबर रोजी ‘एनडीटीव्ही’वर बिजापूरमधील रस्तेबांधणीच्या कामातील कथित भ्रष्टाचारावर प्रकाश टाकणारा वृत्तांत मुकेश चंद्राकर यांनी प्रसारीत केला होता. यातून त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी सुरेश चंद्राकर काँग्रेसचे नेते असल्याचा दावा केला होता. काँग्रेसने मात्र हा दावा फेटाळताना सुरेश चंद्राकरने नुकताच सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, अधिकाऱ्यांनी आरोपींच्या बेकायदा मालमत्ता आणि अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. सुरेश चंद्राकरने बिजापूर-गंगळूर रोडवरील वनजमीन बळकावून बांधकाम केले होते. ते पाडण्यात आल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.(Journalist murder)
सुरेश चंद्राकर आणि अन्य आरोपींची बँक खाती गोठवण्याची प्रक्रियाही पोलिसांनी सुरू केली आहे. आतापर्यंत सुरेश चंद्राकरची तीन खाती होल्ड करण्यात आली आहेत.
कोब्रा कमांडोची केली होती सुटका
एप्रिल २०२१ मध्ये बिजापूरमधील टाकलगुडा येथे नक्षलवादी हल्ला झाला होता. त्यातील कोब्रा कमांडो राकेश्वर सिंह मन्हास यांची माओवाद्यांच्या कैदेतून सुटका करण्यात मुकेश चंद्राकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या हल्ल्यात २२ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले होते. कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ॲक्शन (CoBRA) हे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे एक विशेष जंगल युद्ध युनिट आहे. मुकेश यांनी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीसाठी मुक्त पत्रकार म्हणून काम केले. ‘बस्तर जंक्शन’ हे लोकप्रिय यूट्युब चॅनलही चालवले होते. या चॅनेलचे सुमारे १.५९ लाख सदस्य आहेत.
दरम्यान, पत्रकार मुकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ रविवारी कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही करण्यात आली.
हेही वाचा :