शरद पवारांच्या ‘राजकारणा’चे काय होणार?

  • अमेय तिरोडकर

महाराष्ट्र धर्माचा हा विचार आधुनिक काळात महात्मा फुलेंपासून सुरू होतो. हा समतेचा आणि आधुनिकतेचा विचार आहे. तो या मातीत आधीपासूनच होता. फुलेंच्या नंतर त्याला आधुनिक राजकारणाची जोड मिळाली. छत्रपती शाहू महाराज, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मातब्बर मंडळींनी त्याचे एका चळवळीत रूपांतर केले. स्वातंत्र्योत्तर काळात या चळवळीने महाराष्ट्राला पुरोगामी आणि आधुनिक विचारांवर चालण्याची दिशा आणि प्रेरणा दिली. थोडेसे धाडसाने आणि बहुतांशी दुःखाने हे म्हणायची वेळ आलेली आहे की, या परंपरेतले शरद पवार हे महाराष्ट्रातले शेवटचे ताकदवान राजकारणी आहेत. शरद पवारांच्या राजकीय यशापयशाचा विचार जसा आपण महाराष्ट्रातल्या पुरोगामी परंपरेच्या यशावर करत नाही तसाच तो त्यांना मिळत असलेल्या निवडणुकीतल्या संख्येवर म्हणजे आमदार / खासदार यांच्या संख्येवर पण करत नाही. शरद पवारांचे राजकीय यश किंवा अपयश मोजताना राज्याच्या राजकीय परिस्थितीचा व्यापक अवकाश आपल्याला बघावा लागतो.
शिवसेना-भाजपचे १९९५ मध्ये सरकार आल्यानंतर राज्यातले राजकीय अवकाश हे सातत्याने विखंडित – fractured राहिलेले आहे.

अजित पवारांची कसोटी

जागतिकीकरणाचा प्रभाव वाढत गेल्यानंतर तर महाराष्ट्रातल्या दोन भागांतल्या प्रश्नांचे स्वरूप पूर्णतः भिन्न झाले आहे. म्हणजे उदाहरणार्थ, मुंबई परिसरातल्या लोकांचे प्रश्न आणि विदर्भ, मराठवाडा इथले प्रश्न संपूर्णतः भिन्न आहेत. जणू काही दोन राज्येच नांदत असावीत, असे वाटण्यासारखी ही स्थिती आहे आणि अशा काळात सातत्याने संपूर्ण राज्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रभाव ठेवत राहणे ही सोपी गोष्ट नाही. ती महाराष्ट्रात फक्त एकट्या शरद पवारांना जमली आहे, ही गोष्ट कोणीच नाकारू शकणार नाही. ज्या स्थितीत त्यांना हा प्रभाव टिकवणे जमले आहे ती स्थितीसुद्धा विलक्षण आहे. एका बाजूला देशातला धर्मांध राजकारणाचा अवकाश वाढत गेला आहे. दुसरीकडे शरद पवारांनी सरंजामदारांची मोट बांधली आहे. त्यांच्यावर सतत feudal politics करण्याचे आरोप होतात. तिसरीकडे गेल्या पन्नास वर्षांत हे सरंजामदार ज्या पैशावर उभे राहिले त्या सहकार आधारित संस्थात्मक राजकारणाला मागे टाकून कृषी संबंधित नव्या आणि छोट्या उद्योगांची साखळी उभी राहते आहे. आणि ‘मंडल’नंतरच्या काळाने सर्वच जातींमधील छोट्या गटांचे राजकीय orientation (अभिमुखता) हे प्रस्थापित विरोधी बनवले आहे. अशा टोकाचे अंतर्विरोध असलेल्या राजकीय पटलावर सत्तेची कसरत सतत करत राहणे ही सोपी गोष्ट नाही. शरद पवारांनी ती अनेक वर्षे केलेली आहे.

गंमत ही आहे की, ह्या राजकारणाचा गाभा खरेतर सत्ता नाही. तो समाजाभिमुखता आहे. तसा नसता तर हे राजकारण इतका दीर्घ काळ टिकूच शकले नसते. पण शरद पवारांनी या राजकारणात ज्यांना मोठे केले किंवा ताकद दिली ते बहुतांशी लोक हा गाभा विसरले. त्यांनी आपले सरंजामदारी राजकारण हेच महाराष्ट्राचे अंतिम सत्य आहे, असे स्वतःच स्वतःला सांगितले आणि स्वतःच त्यावर विश्वास पण ठेवला. अखेर या राजकारणाला २०१४ नंतर धक्का बसला आणि संपूर्णतः या राजकीय साच्यापासून वेगळा असलेला वर्ग सत्ता हाकणारा झाला. त्याचा दुसरा परिणाम म्हणजे हे गावोगावी उभे राहिलेले सत्ता सरंजामदार किती पोकळ आहेत आणि ते वेळ आली तर सर्कशीतल्या वाघांपेक्षाही दारुण असतात हे महाराष्ट्राने बघितले. पण या लोकांना बाजूला ठेवून पण राजकारण करता येते हे शरद पवारांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांत दाखवून दिले आहे. आणि याचे मूळ कारणच त्यांच्या राजकारणाचा आजवरचा राहिलेला पोत आहे. शरद पवारांच्या पक्षाचे भवितव्य काय, यावर लिहायला सांगितले गेले तेव्हा २०२४ लोकसभा निवडणुकांच्या निकालापासून लिहायचा मोह झाला. पण मुळात हे निकाल ज्यात शरद पवारांना १० जागा लढवून ८ मिळाल्या तो त्यांच्या आजवरच्या राजकारणाचा परिपाक आहे हे समजून घेण्याची आणि सांगण्याची गरज भासली.

सत्तातुराणां न भयं न लज्जा!

शरद पवारांनी उमेदवार आयात केला आणि विदर्भातल्या वर्ध्यात त्याला निवडून आणला. मुंबई परिसरातल्या भिवंडीत असाच उमेदवार बाहेरून घेऊन निवडून आणला. मराठवाडा (बीड), उत्तर महाराष्ट्र (अहमदनगर आणि दिंडोरी) हे उमेदवार त्यांनी असेच शोधले, बाहेरून आणले आणि त्यांना निवडून पण आणून दाखवले. ते ही किमया करू शकले कारण परिस्थितीचे व्यापक भान त्यांना नेहमीच राहिलेले आहे. आणि हे भान त्यांना येते / येऊ शकले कारण त्यांच्या राजकारणाचा गाभा हा समाजकारणाचा आहे. सत्तेच्या पलीकडे जे जनतेचे सर्वांगीण राजकारण असते ते सतत खेळत राहण्याची त्यांची तयारी ही निवडणुकांत कामी येते. गंमत ही आहे की, हे असे व्यामिश्र भान शरद पवारांना – केवळ एकट्यालाच आहे. त्यांच्या पक्षात असलेल्या कोणालाही ते भान आहे असे दिसत नाही. निवडणुका नसताना काय राजकारण करायचे हा प्रश्न शरद पवारांना पडत नाही. सत्ता नसताना काय करायचे याची चिंता त्यांना सतावत नाही. इतरांना त्या चिंतेने दोन वेळचे जेवण नीट जात नाही. हा त्यांच्यातला आणि इतर नेत्यांमधला फरक. शरद पवारांना महाराष्ट्राला काय हवं हे नीट समजतं कारण इथला जो मुख्य राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विचार आहे त्याच्याशी ते एकरूप झालेले आहेत.

सुरुवातीला म्हटले की, समता आणि आधुनिकता ही महाराष्ट्राच्या जीवनाची सूत्रे आहेत. समता मग ती सर्वच प्रकारची – स्त्री-पुरुष, हिंदू-मुस्लिम, मराठा-ओबीसी. दिव्यांग आणि धडधाकट. सर्वच माणसे समान. त्यात कुठलाच भेद नाही. आणि जी या ना त्या कारणाने मागे पडत आहेत, समपातळीवर येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी मग सत्ता राबवणे. त्यात महिला धोरण पण येते आणि नामांतर आंदोलन सुद्धा. हा समतेचा, सन्मानाचा विचार आहे. आधुनिकता ही भौतिक आणि वैचारिक अशा दोन्ही स्वरूपात आहे. म्हणजे साखरेच्या धंद्यात जगात कुठेही काही नवीन होत असेल तर तिथे जाऊन ते बघून येणे आणि ते तंत्रज्ञान वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट माध्यमातून महाराष्ट्रात आणणे ही जशी आधुनिकता आहे, तशीच ती तृतीयपंथी व्यक्तीला आपल्या पक्षाचे प्रवक्ते पद देण्यात पण आहे. देशात असा प्रवक्ता असणारा राष्ट्रवादी (शरद पवार) हा एकमेव पक्ष आहे. जगावेगळे आणि दूरदृष्टी ठेवून पाऊल तेव्हाच उचलता येते जेव्हा स्वत:च्या विचारावर प्रामाणिक निष्ठा असते आणि जगात उद्या काय होईल याची नीट समज आणि चाहूल असते. या समतेचा आणि आधुनिकतेचा विचार सातत्याने सर्वच क्षेत्रांत पुढे नेला की आपोआपच एक गुड विल तयार होते. वलय निर्माण होते. आणि निवडणुकांच्या राजकारणात कमी-अधिक फरकाने ताकद कायम राहते. शरद पवारांच्या राजकारणाचा हा गाभा नेहमीच राहिलेला आहे आणि त्यांच्या पक्षाचे भवितव्य पण यातच दडलेले आहे.

फलटणकरांच्या नाड्या दोन्ही पवारांच्या हातात

प्रश्न हा आहे की, हे भान बाळगून सतत समाजकारण करत राहणारी दुसरी व्यक्ती त्यांच्या पक्षात कोण? यात कोणी व्यक्ती आहे किंवा नाही हे लिहीत नाही. काही गोष्टी काळाच्या हिशेबावर सोडून द्यायचा असतात. त्या सोडून देतो. पण इथे ही नोंद करण्याची गरज आहे की आधुनिक महाराष्ट्राचे राजकारण ज्या मुख्य विचारांनी भारलेले आहे तो विचार राजकारणात आणखी पुढे घेऊन जाण्यासाठीचा नेता आत्ता समोर दिसत नाही. यशवंतराव चव्हाण साहेब गेले तेव्हा वसंतदादा होते. इतर अनेक नेते होते. वसंतदादा पाटील यांनी त्यांच्या अखेरच्या काळात त्यांच्या सर्व विश्वासू लोकांना एकत्र करून शरद पवारांची साथ द्या, असे आवाहन केले म्हणतात. म्हणजे तेव्हा शरद पवार होते. आता पवारांनी त्यांच्या समर्थकांना असे आवाहन करावे असे कोण नेतृत्व आहे? अशी सक्ती नाही की ते त्यांच्याच पक्षातून येईल. इतर पक्ष-संघटना यांच्यातून पण येईल. पण यातून एक गोष्ट नक्की होते ती ही की, पवारांच्या पठडीतील राजकारण करण्याची खूप मोठी पोकळी आता हळूहळू निर्माण होते आहे. मी हा शरद पवारांच्या राजकारणाचा दोष मानतो. ते सतत सांगत राहतात की, आता नव्या पिढीकडे सूत्रे देण्याची वेळ आली. पण त्यांनी घडवलेली नवी पिढी ‘ईडी’च्या धाकाने गुलामीच्या वळचणीला गेली. निघाले होते देवाच्या आळंदीसाठी पण, पोचले चोरांच्या आळंदीला.

महाराष्ट्राचा अंगार सहजासहजी विझवता येत नाही!

अशा वेळी विचारांवर ठाम श्रद्धा असणारी आणि राजकारणाला व्यवसाय म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून बघणारी फळी शरद पवार निर्माण करू शकले नाहीत हा त्यांचा दोष आहे. आणि त्या दोषाचे तोटे आता स्वतः ते भोगत आहेत. फक्त एक गोष्ट ही आहे की, या मातीशी एकरूप असण्यामुळे कितीही संकटे आली तरी लढायची उमेद आणि हिंमत शरद पवारांत अंगभूत आहे. त्यामुळे ते लढतात. लढताना अनेकदा तडजोडी करतात. त्याबद्दल वेळोवेळी त्यांच्यावर योग्य अशी टीका पण होते. पण निर्णायक क्षणी मात्र ते कच खात नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राची जनता त्यांच्या एरवीच्या तडजोडीकडे दुर्लक्ष करून त्यांच्यासोबत उभी राहते. उलट्या बाजूने नेमक्या कुठवर तडजोडी करायच्या आणि कुठे वैचारिक राजकारणाचा वारसा सांभाळायचा याचा सुवर्णमध्य त्यांना जमला आहे. शरद पवारांनंतर हा सुवर्णमध्य ज्याला साधता येईल त्याच्याकडे महाराष्ट्राच्या या राजकीय परंपरेची सूत्रे जातील. त्यांच्या पक्षाचे भवितव्य काय, या प्रश्नाचे अगदी पाच टक्के उत्तर सुप्रीम कोर्टातून येणार आहे. पन्नास टक्के उत्तर लोकसभा निकालांनी दिले आहे. बाकीचे विधानसभेत येईल. ते काही लोकसभेपेक्षा फार वेगळे असेल अशी सुतराम शक्यता नाही. पण त्यांच्या या पक्षापलीकडे राज्य सांभाळण्याचे आणि त्याला पुरोगामी आणि आधुनिकतेच्या मार्गावर ठेवण्याचे जे राजकारण शरद पवार जाणीवपूर्वक अथकपणे, कर्तव्य असल्यासारखे करत आले आहेत त्या राजकारणाचे काय होणार, हा महाराष्ट्रासमोरचा मोठा प्रश्न आहे. आणि या घडीला त्याचे उत्तर निर्माण करण्याची जबाबदारी पण शरद पवारांचीच आहे.

Related posts

पोटातले ओठावर!

हिंदुदुर्ग!

Lok Sabha : खेळपट्टी खराब करण्याचा संसदीय खेळ