जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याने खुद्द भाजप उमेदवाराची गोची

सातारा; प्रतिनिधी :  केंद्रात आणि राज्यात सरकार असल्यावर सत्ताधारी पक्षाच्या अनेक चवचाल पुढाऱ्यांना कंठ फुटत असतो अशा पुढाऱ्यांची एक रांग वर्षभर आपण टिव्हीवर पाहत असतो. याच संगतीचा परिणाम जयकुमार गोरे यांच्यावर झाला आहे. त्यांची भाषणे आणि टिव्हीवरच्या बाईट्स हा विषय चटकदार असतो. पण आपण बोलताना भोवतालच्या परिस्थितीचे भान असतेच असे नाही. गोरे बोलता बोलता स्वतःच्या बोलण्यात अडकले आहेत.

पडळ (ता. खटाव) येथील खटाव माण शुगर्सच्या आवारात तीन चार वर्षापूर्वी झालेल्या खुनाच्या घटनेचा उल्लेख त्यांच्या बोलण्यात व भाषणात येत असतो. परंतु त्याच खून प्रकरणात त्यांच्याच पक्षातील एक सहकारी अडकला होता त्याचे काय ? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. दहा पंधरा वर्षांपूर्वी जयकुमार गोरे यांचा सातारा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर उदय झाला. त्याअगोदर त्यांचे भाऊ अंकुश हे युवक कॉंग्रेसचे पुढारी होते. २००७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत जयकुमार गोरे जिल्हा परिषद सदस्य झाले. त्यांचा तो उमेदीचा काळ अनेकांना भावला होता. अनेक सज्जन आणि दुर्जनांनी त्यांच्या नेतृत्वाला खतपाणी घातले.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या डोक्यात आणि अविर्भावात अशी काही भर पडली की ती हवा दिवसेंदिवस फुगत व सुजत चालली आहे. दिवंगत सदाशिवराव पोळ यांचा उल्लेख ते उघडपणे एकेरीत करायचे. जयकुमार असे बोलले की अनेकांना तेव्हा उखळ्या फुटायच्या, तर पोळ तात्यांच्या मुलांना राग यायचा. कालगती अशी की पोळ तात्यांचा एक मुलगा आज त्यांच्या बरोवर आहे. तर त्यावेळी ज्यांना उखळ्या फुटत होत्या ते आज गोरे यांच्या विरोधात आहेत. किती दिवस राहतात कुणास ठाऊक, असो.

विधानसभेच्या या निवडणुकीत जयकुमार गोरे यांच्या विरूद्ध प्रभाकर घार्गे उभे आहेत. घार्गे आणि गोरे यांचे संबंध परवा पर्यंत चांगले होते. तसे गोरे आणि माण-खटावमधील सगळ्या पुढाऱ्यांशी अंदरघुसमी उत्तम असे जमते. अपवाद फक्त रणजितसिंह देशमुख यांचा. तर विषय असा की, गोरे आणि घार्गे यांचे जमते हा. काही दिवसांपूर्वी घार्गे यांच्या कारखान्यावरील कार्यक्रमास गोरे यांनी  पायफुफुटा झाडलेला, पण आता बदललेल्या परिस्थितीत घार्गेच गोरे यांच्या विरूद्ध उमेदवार बनले आहेत. त्यांच्याबद्दल व्यक्त होताना गोरे यांची रसवंती वाहत आहे. एवढेच काय तर घार्गे यांचे स्टेज शेअर करणाऱ्या इतर नेत्यावरही ते घसरत आहेत. समोरचे सगळेच लोक सज्जन आहेत, असे बोलणाऱ्या गोरे यांनी भारतीय जनता पक्षात गेल्यावर शेक्सपियरने लिहिलेल्या साहित्याची ओळ न ओळ वाचून काढली आहे की काय? असे वाटते.

गोरे यांनी प्रभाकर घार्गे यांच्याबद्दल बोलताना ‘ते खूप सज्जन आहेत. सोज्ज्वळ आहेत. त्यांच्यावर ३०२ चा गुन्हा आहे,’ असे उद्‌गार काढले. त्यांचे हे उद्‌गार ऐकून खुद्द भाजपच्या कार्यकत्यांच्या चक्कीत जाळ झाला. कारण वास्तव असे की असा कोणता गुन्हा आहे का? तर आहे. त्यात घार्गे यांचे नाव आहे का? तर आहे. पण गोरे अंशतः सत्य बोलत आहेत. कारण याच गुन्ह्यात त्यांच्या पक्षातील त्यांचे सहकारी मनोज घोरपडे पण आरोपी आहेत. ते पण तेवढेच दिवस तुरुंगात होते. समजा, वेळ आली तर गोरे हे पूर्णसत्य उद्या फडणवीस यांच्या साक्षीने जाहीर सभेत सांगतील का?

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी