कर्करोगविरोधी उपचारांचा भारतीय आविष्कार

-स्मृति मल्लपटी

शोध-संशोधन आणि ज्ञान-विज्ञान ही दोन्ही क्षेत्रे पाश्चात्य देशांच्या प्रभावाने व्यापलेली आहेत. मात्र नितांत गरज आणि पर्यायाचा उपलब्ध नसलेला अवकाश या निकडीतून आता भारतानेसुद्धा कर्करोग विज्ञानात आपला ठसा उमटवण्यात प्रारंभ केला आहे. अलीकडे नेक्स कार १९ ( NexCAR 19) ही आधुनिक कर्करोगविरोधी उपचारपद्धती विकसित करण्यात भारतीय वैज्ञानिकांना यश आले आहे. या यशाचा लाभ  भारतासारख्या कर्करोगप्रवण देशाला होणार आहेच, परंतु जगातले जे गरीब देश आहेत, त्यांनासुद्धा ही उपचारपद्धती एकप्रकारे वरदान ठरणार आहे. याच नव्या उपचारपद्धतीच्या निर्मितीची प्रक्रियेचा ऊहापोह.

‘डॉक्टर, माझा कॅन्सर बरा होईल ना?’ आणि ‘डॉक्टर, मी कॅन्सरमुक्त होईन ना?’ असे दोन प्रश्न मनात घेऊनच कोणीही उपचार घेऊ इच्छिणारा रुग्ण रुग्णालयात दाखल होत असतो. हे दोन प्रश्न म्हटले तर खूप अपेक्षित नि नित्याचे, पण कर्कविज्ञानात नवनवे शोध लावू पाहणाऱ्या संशोधकांसाठी खूप प्रेरणादायीसुद्धा आहेत. किंबहुना, या दोन साध्याशा प्रश्नांची तड लावण्याच्या जिद्दीनेच तर आजवर वैज्ञानिकांनी अनेक पायऱ्या यशस्वीपणे पार केलेल्या आहेत. नेक्स कार१९ (NexCAR19)  ही नवी उपचारपद्धती वैज्ञानिकांनी मिळवलेल्या यशाचा भारतीय आविष्कार आहे. लिम्फोमा आणि ल्युकेमिया या रक्ताच्या कर्करोगाला शरीरात परत शिरू न देण्याची क्षमता असलेल्या या उपचारपद्धतीचा प्रणेता भारत असला तरीही, या प्रयोगाने जगातल्या अनेक विकसनशील देशांच्या आशा पल्लवीत केलेल्या आहेत.

भारतीय पाऊल पडते पुढे

इम्युनो अॅक्ट(ImmunoACT) नावाच्या मुंबईस्थित एका छोट्याशा जैवतंत्रज्ञान क्षेत्रातल्या भारतीय कंपनीने ज्याला कटिंगएज कॅन्सर ट्रिटमेंट म्हणता येईल, अशा शिमेरिक अँटिजेन रिसेप्टर (CAR) प्रकारातल्या इम्युनोथेरपीचा अर्थात प्रतिकारक्षम  उपचारांचा एक भाग असलेल्या टी-सेल उपचारपद्धतीचा एतद्देशीय अवतार जन्माला घातला आहे. लक्षात असू द्या, अमेरिका हा देश या उपचारपद्धतीचा उद्गाता आहे आणि ही उपचारपद्धती भारतातल्याच नव्हे, तर जगातल्या अनेक विकसनशील देशांतील रुग्णांना न परवडणारी ठरली आहे. आकडेवारीत सांगायचे झाले तर अमेरिकेत  उपचार घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांना ३ लाख ७० हजार ते ५ लाख ३० हजार अमेरिकी डॉलर्स (म्हणजे जवळपास ३ ते ५ कोटी रुपये) इतकी भरभक्कम किंमत चुकवावी लागते. मात्र मुंबईस्थित कंपनीने शोधलेल्या उपचारपद्धतीसाठी रुग्णाला २२ ते ३३ लाख रुपये  खर्च करावे लागू शकतात. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्यापेक्षा एकदशांश किमतीत उपलब्ध झालेली ही टी-सेल उपचारपद्धती भारतीय संशोधकांचे यश अधोरेखित करणारी ठरली आहे. रक्ताच्या कर्करोगांबरोबरच मेंदूच्या कर्करोगावर तसेच प्रतिकारक्षमतेशी निगडित इतर आजारांवर देखील ही उपचारपद्धती आशादायी ठरू शकेल, असा या क्षेत्रांतल्या जाणकारांचा होरा आहे.

इथे प्रश्न अर्थातच पैशांपेक्षाही संशोधनातल्या उच्च दर्जाचा आणि कौशल्याचा आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात भारताच्या औषध नियंत्रकांनी या उपचारपद्धतीस मान्यता दिली आणि डिसेंबर २०२३ मध्ये ज्यांना हे उपचार परवडले त्यांना ते देण्यास सुरुवातही झाली. आता स्थिती अशी आहे, देशभरात सध्या प्रत्येक महिन्याला दोन डझनांहून अधिक संख्येने रुग्ण इम्युनो अॅक्ट कंपनीने पुरवलेल्या उपचारांचा लाभ घेत आहेत. ते सारे पाहता मुंबईस्थित कंपनी दर्जा आणि कौशल्य या दोन्हींत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली आहे, असे सहजपणे म्हणता येते.

जगाचा हातभार

‘इट्स ड्रीम कम ट्रु…आमचे स्वप्न प्रत्यक्षात अवतरले आहे…’अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया या निमित्ताने अलका द्विवेदी यांनी व्यक्त केली आहे. अलका या इम्युनोलॉजिस्ट-प्रतिकारशास्त्र तज्ज्ञ आहेत. या घडीला अमेरिकेतल्या मेरिलँड राज्यातल्या बेथेस्डा यूएस नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी नेक्सकार १९ विकसित करण्यात अत्यंत मोलाचे योगदान नोंदवले आहे. या उपचारपद्धतीच्या वापराने पहिला रुग्ण कसा पूर्णपणे बरा होऊन घरी गेला, हे सांगताना अलका यांचा स्वर आपसूक मृदु होऊन जातो. त्या म्हणतात, ‘हेच ते सगळे रुग्ण आहेत, ज्यांच्यासाठी इतर सर्व उपचारपद्धती अयशस्वी ठरल्या होत्या, परिणामी, या सर्वांनी जगण्याच्या आशादेखील सोडल्या होत्या. पण आता, कर्कविज्ञानाने परिस्थितीवर मात केली आहे. असाध्य भासणाऱ्या आजाराने ग्रस्त रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतत आहेत.’

ही अत्यंत सकारात्मक घडामोड आहे, अशी प्रतिक्रिया या संबंधाने रिनाटो कुन्हा यांनी नोंदवली आहे. कुन्हा हे साओ पावलो, ब्राझिलस्थित ग्रुपो ऑन्कोक्लिनिकामध्ये कार्यरत रक्तपेशीशास्त्र तज्ज्ञ- हिमॅटोलॉजिस्ट आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘नव्या यशस्वी उपाचारपद्धतीमुळे विकसनशील देशांतील असंख्य रुग्णांना नवे जीवन लाभणार आहे. यामुळे आधुनिक उपचारांचा मार्गही प्रशस्त होत जाणार आहे. असा वेळी ‘आशा’ हा केवळ एकच शब्द माझे मन भरून राहिलेला आहे.’

कर्करोग उपचारांच्या रांगेत भारतीय कंपनीने हे जे काही नवे उत्पादन आणले आहे, त्याने अमेरिकेसारख्या देशातल्या संशोधकांचे डोळे उघडले आहे, असे काहीसे परखड मत टेरी फ्रे यांनी येथे नोंदवले आहे. फ्रे डेनव्हर इथल्या युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो अॅनशूल्ड्झ मेडिकल कँपसचे रोगप्रतिकारशास्त्र आणि बालकर्करोग तज्ज्ञ आहेत. याच फ्रे यांनी इम्युनो अॅक्ट कंपनीच्या संशोधन प्रकल्पात सहभागी संशोधकांना बहुमोल सल्ला देण्याचे काम केलेले आहे. ते म्हणतात, ‘भारतातल्या या यशस्वी प्रयोगाने आम्हा सगळ्यांमधला वन्ही चेतवण्याचे काम केले आहे. भारतातल्या या यशस्वी प्रयोगाने अमेरिकेतही आम्ही इतक्या माफक दरात सर्वसामान्यांना ही उपचारपद्धती उपलब्ध करून देऊ शकतो, याची जाणीवही करून दिली आहे.’

भारतीय बुद्धिमत्तेचे तेज झळाळले

कार-टी या उपचारपद्धतीची खासियत ही आहे की, यात दुसऱ्याचे रक्त घेतले जाते आणि त्यातून टी सेल नावाचे प्रतिकारक्षम घटक विलग केले जातात. त्यानंतर या टी सेलवर जनुकीय बदल घडवून पृष्ठभागावर प्रतिसाद देणारा ‘कार’ नावाचा ग्राही मिळवला जातो. पुढे जाऊन हा ग्राही कर्कपेशींचा शोध घेऊन त्यांचा नाश करण्यास प्रतिकारक्षम पेशींना मदत करतो. अशा प्रकारे योजनाबद्ध पद्धतीने आकारास आलेल्या पेशींचे घाऊक प्रमाणात उत्पादन घेऊन त्या रुग्णाच्या रक्तात सोडल्या जातात. पुढचे कर्कपेशींवर हल्ला करण्याचे काम योजल्यानुसार सुरु राहते.

अर्थात, जर आकडेवारी पाहिली, तर अशा प्रकारच्या उपचारपद्धतीला भारतात या घडीला मर्यादित मागणी आहे, हे दिसते. मात्र त्याच वेळी हेही वास्तव समोर येते की, ल्युकेमियाच्या संबंधाने दर एक लाखांपैकी १५ जणांना ल्युकेमियाचा आजार झाल्याचे निदान होते, त्यातल्या अर्ध्या रुग्णांचा कर्करोग किमोथेरपीसारखे उपचार घेऊनही दोन वर्षांनंतर पुन्हा उलटतो नि मग निराश झालेले रुग्ण पुन्हा एकदा कर्करोगविरोधी उपचारांचा खर्च करण्यापेक्षा नाईलाजाने  दुःखशामक उपचारांचा अवलंब करताना दिसतात.

या पार्श्वभूमीवर, इम्युनो कार उपचारपद्धतीची भारतातल्या असंख्य गरजू रुग्णांना नितांत आवश्यकता आहे, असे ठोस प्रतिपादन अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटशी संबंधित बालकर्करोग तज्ज्ञ निराली शाह करतात. निराली शाह यांनी इम्युनो अॅक्ट या भारतीय कंपनीला अकादमिक सहयोगी म्हणून योगदान दिले आहे. भारतीय कंपनीने उपलब्ध करून दिलेली नेक्स कार१९ ही उपचारपद्धती अमेरिकेत सध्या उपलब्ध असलेल्या पद्धतीशी मिळतीजुळती आहे. मात्र, तरीही काही बाबतीत आपले वेगळेपणही जपून आहे.  उदाहरणार्थ अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिलेल्या सहापैकी चार कार-टी उपचारपद्धती अशा आहेत, की ज्या बी सेल नामक कर्कपेशींवर असलेल्या सीडी१९ नावाच्या घातक चिन्हकांवर हल्ला करण्याच्या हेतूने आकारास आणलेल्या आहेत. अर्थात, सध्याच्या व्यावसायिक उपचारपद्धतींमध्ये ‘कार’ पेशींच्या टोकावर जे प्रतिपिंड घटक आहेत, ते मुख्यतः उंदिरांच्या शरीरातून मिळवलेले आहेत. यामुळे घडतेय असे की, त्यांच्या टिकाऊपणाला आपसूक मर्यादा पडताहेत. कारण, जेव्हा ही प्रतिपिंडे सोडली जातात, शरीरातल्या प्रतिकारक्षम पेशी त्यांना परक्या समजून हल्ला करतात. त्यांना नष्ट करतात. यामुळे एक उद्दिष्ट फोल ठरते.

Related posts

ताठ कण्याच्या विदुषी : रोमिला थापर

विहिरीत पडलेला माणूस

लाडकी बहीण योजनेचा खरा परिणाम