स्वातंत्र्याच्या संकल्पनेची रुजवणूक

– संजय सोनवणी

स्वतंत्र भारत कसा असेल याबाबत गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कल्पना स्पष्ट होत्या. भारतात लोकशाही असेल, प्रत्येक सज्ञान व्यक्ती मतदाता असेल, सर्वांना समान अधिकार असतील” हा त्याचा पाया होता. हिंदू व मुस्लिम संस्थानिक याला विरोध करणार हे निश्चितच होते. पण संस्थानी प्रजेतही भारतीय स्वातंत्र्याची संकल्पना रुजवण्यात काँग्रेसने यश मिळवले.

टिळकांच्या निधनानंतर महात्मा गांधी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या पटलावर आले आणि त्यांनी अद्भूत क्रांती केली. त्यांनी देशभरातील सामान्य लोकांनाही सहज वापरता येईल असे सत्याग्रहाचे शस्त्र दिले. स्वदेशीचा फक्त नारा देऊन ते थांबले नाहीत तर चरखा घरोघर पोचवला. भारतीय स्वातंत्र्याशी आपलाही काही संबंध आहे ही आसेतु-हिमाचल जाण निर्माण करण्यात त्यांना अभूतपूर्व यश मिळाले. राष्ट्र हे एक आहे, ही पूर्वी भारतात कधीही नसलेली भावना त्यांनी निर्माण केली. देशभर शोषित, वंचित समाजघटक व महिलाही खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्यलढ्यात उतरल्या.

हे स्वातंत्र्य मर्यादित घटकांचे नाही तर ते “माझे आणि प्रत्येकाचे समान पातळीवरील” स्वातंत्र्य आहे हा विश्वास गांधीजीनी निर्माण केला. स्वतंत्र भारताचे स्वरूप लोकशाही राष्ट्र असणार हे तर स्पष्टच झालेले होते. त्यामुळे त्यांच्या आंदोलनात देशभरातील स्त्री-पुरुष सामील होऊ लागले. १९२८ सालीच स्वतंत्र भारताची घटना तयार करण्यासाठी मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली.

१९२९ मध्ये लाहोर अधिवेशनात एका ठरावाद्वारे “संपूर्ण स्वातंत्र्य” हे ध्येय ठेवण्यात आले व २६ जानेवारी १९३० हा दिवस “पूर्ण स्वराज्य दिन” म्हणून साजरा केला जाईल असे ठरवले. जेव्हा सर्व भारतीय आता स्वातंत्र्यासाठी तयार आहेत हे लक्षात आले तेव्हा ८ ऑगस्ट १९४२ रोजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करत ब्रिटिशांना “चले जाव !”चा इशारा दिला व अभूतपूर्व आंदोलन सुरू झाले. सरकारने दडपशाही केली. लाखो लोकांना अटका केल्या. पण स्वातंत्र्याचे लोण आता सर्वत्र पसरले होते. आपले स्वातंत्र्य हे घटनात्मक स्वातंत्र्य असेल याची ग्वाही लोकांना मिळालेली होती.

स्वतंत्र भारत कसा असेल याबाबत गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कल्पना स्पष्ट होत्या. भारतात लोकशाही असेल, प्रत्येक सज्ञान व्यक्ती मतदाता असेल, सर्वांना समान अधिकार असतील” हा त्याचा पाया होता. हिंदू व मुस्लिम संस्थानिक याला विरोध करणार हे निश्चितच होते. पण संस्थानी प्रजेतही भारतीय स्वातंत्र्याची संकल्पना रुजवण्यात काँग्रेसने यश मिळवले.

देश एकीकडे असा संपूर्ण स्वातंत्र्याकडे प्रवास करत असताना मुस्लिम लीग जशी अस्वस्थ होती तसाच एक या लढ्यापासून दूर राहणारा संघ परिवार हा घटकही होता. काँग्रेसच्या कोणत्याही आंदोलनात सामील व्हायचे नाही (व ब्रिटीशांना सहकार्य करायचे) हे संघ नेतृत्वाने ठरवूनच टाकलेले होते. त्यामुळेच की काय रा. स्व. संघ भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात जसा सामील झाला नाहे तशीच सावरकरप्रणीत हिंदू महासभाही.त्यामुळे मुंबई प्रांताच्या ब्रिटिश सरकारने “संघाने स्वत:ला ऑगस्ट १९४२च्या उपद्रवापासून स्वत:ला दूर ठेवले आणि स्वत:ला ब्रिटिश कायद्याचा सीमेत ठेवले.” या शब्दात संघाचा गौरव केला. ( From Plassey to Partition: A History of Modern India by Sekhara Bandyopadhyaya (2004))

हिंदू महासभेने मुस्लिम लीगशी युती करून सिंध, नॉर्थ-वेस्ट फ्रंटियर व बंगाल प्रांतात सरकारे स्थापन केली. (१९३७). मार्च १९४३ मध्ये सिंध प्रांत सरकारने पाकिस्तान स्थापनेचा ठराव केला. या ठरावाला वरकरणी विरोध केला तरी हिंदू महासभेच्या एकाही मंत्र्याने राजीनामा दिला नाही. (हे तीनही भाग आजच्या पाकिस्तान व बांगला देशात आहेत.) असे असतानाही १४ ऑगस्ट भारतीय फाळणीचा स्मृतीदिन साजरा करण्यासाठी भाजप सरकारच आवाहन करते हा विरोधाभास आहे. किंबहुना सरसंघचालक मोहन भागवत (व पूर्वी सावरकर) अखंड भारताच्या घोषणा करत असतात हा तर मोठा विनोद आहे. फाळणीला विरोध केला तो काँग्रेसने. “माझ्या प्रेतावरूनच फाळणीचा रस्ता जाईल.” असे महात्मा गांधी म्हणत. फाळणी टाळण्यासाठी जीनाशी कोणतीही तडजोड करायला गांधीजी तयार होते. त्याला ‘मुस्लिमांचा अनुनय’ म्हणून गांधीजींची हेटाळणी करणारे वीर हेच होते.

मुस्लिम प्रश्नाची दाहकता मोठी होती. बहुसंख्यांक हिंदूंसोबत मुस्लिम कसे जगणार हा प्रश्न तर होताच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न होता कथित अखंड हिंदुस्तानाची “घटना” काय असणार हा. फाळणी न झाल्याने संख्या जास्त झालेले मुस्लिम आपली तत्वे घटनेत घुसवणार व जो समतावादी सहिष्णू भारत निर्माण करायचा आहे त्यात अडथळा येईल हा मुद्दाही महत्वाचा होता. १९४०च्या Pakistan or the Partition of India या प्रसिद्ध ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले की, मुस्लिमांना स्वतंत्र राष्ट्र हवे असेल तर ते बळाच्या जोरावर थांबवता येणार नाही. पाकिस्तानची निर्मिती व्हायचीच असेल तर ती स्वतंत्र भारताची घटना तयार होण्याआधीच व्हायला हवी कारण नंतर विभाजन झाले तर ते देशाला महागात पडेल. भारतातील बहुसंख्य हिंदू जर मुस्लिमांना दडपणाखाली दुय्यम नागरिकत्व देतील अशी मुस्लिमांची भावना बनली असेल तर त्यांना एकाच राष्ट्राच्या छताखाली ठेवणे योग्य नाही. असे राष्ट्र बनू शकणार नाही.

गोळवलकर गुरुजींच्या १९३९ सालीच प्रसिद्ध झालेल्या “We Or Our Nationhood Defined” या पुस्तकातील “मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्व बहाल केले जाईल” हे विधान सुप्रसिद्धच आहे आणि त्या विधानाचा गंभीर परिणाम मुस्लिम मानसिकतेवर झाला हे वास्तव नाकारता येत नाही. वैदिक धर्मियांच्या वर्चस्वाखालील हिंदू राष्ट्रवाद तेव्हाही घातक ठरला आणि आज तर तो विकोपाला जाऊ पाहत आहे. प्रचंड हिंसा होऊन देशाची फाळणी झाली हे एक वास्तव आहे. महात्मा गांधींचा बळीही त्याच विखारी वातावरणाने घेतला व त्यातील मुख्य आरोपी नथुराम गोडसेचे पाठीराखे कोण होते आणि आजही त्याचा गौरव कसा करत असतात हे आता सारा देश जाणतो.गांधीजीमुळे या देशातील जनतेला स्वातंत्र्याचा अर्थ उमगला. सर्वांनी स्वातंत्र्य आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला. गांधीजी यशस्वी न होता अन्य कोणतेही घटक यशस्वी झाले असते तर या देशाचे आज स्वरूप काय राहिले असते हे वाचकांच्या लक्षात येईल. घटनात्मक लोकशाहीचे आहे तेवढेही राष्ट्र उरले नसते. असंख्य राष्ट्रांचा समूह एवढेच त्याचे स्वरूप राहिले असते. आणि प्रत्येक राष्ट्राची घटना वेगवेगळी तर असतीच पण परस्पर विरोधाभासीही असती. सर्वसामान्य जनतेला त्यात कितपत स्थान उरले असते याची शंकाच आहे. हिंदू राजांनी तर वैदिकांच्या कच्छपी लागून मनुस्मृतीलाच राज्यघटना बनवले असते. मुस्लिम राजवटी शरियतच्या राज्याच्या भानगडीत पडले असते. धर्मांधता, शोषणाची आणि अन्यायाची परिसीमा झाली असती.

Related posts

पोटातले ओठावर!

हिंदुदुर्ग!

Lok Sabha : खेळपट्टी खराब करण्याचा संसदीय खेळ