सणासुदीच्या आनंदावर महागाईचे विरजण

नवी दिल्लीः खाद्यपदार्थांच्या किंमती प्रचंड वाढल्याने अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी सणांचा आनंद घेणे महाग होत आहे. सणासुदीच्या काळात कमाईचा बहुतांश भाग खाण्यापिण्यावर खर्च होतो. वाढत्या महागाईमुळे अनेक लोक अत्यावश्यक वस्तूंची खरेदी पुढे ढकलत आहेत. त्यामुळे ‘फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुडस्‌’ वरदेखील परिणाम होऊ शकतो.

बटाटे, कांदे, टोमॅटो, तूप आणि तेल यांसारख्या वस्तूंचा वापर सणासुदीच्या काळात केला जातो. परंतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या किंमती दहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या आहेत. भाज्यांचे दर ३६ टक्क्यांनी वाढले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थांची किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये ९.२४ टक्क्यांवर पोहोचली. जी गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये हा दर ५.६६ टक्के होता.

सरकारी आकडेवारीनुसार ऑक्टोबर २०२२ च्या तुलनेत गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खाद्यतेलाच्या किरकोळ किंमतीत १४ टक्के घट झाली होती. या वर्षी सप्टेंबरमध्ये खाद्यतेलाच्या किमती अडीच टक्क्यांनी वाढल्या आहेत. डाळींचे भाव सातत्याने वाढत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच डाळींच्या किंमतीत १५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, देशातील ६० टक्क्यांहून अधिक लोक महिन्याला केवळ १०-३० हजार रुपये कमावतात. अशा स्थितीत त्यांच्या कमाईचा बहुतांश भाग सण-उत्सवात खाण्यापिण्यावर खर्च होत आहे.

कांदे, टोमॅटो, बटाटा वधारला

‘ॲगमार्कनेट’ या सरकारी साइटनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याच्या घाऊक भावात प्रतिक्विंटल २००० रुपयांनी वाढ झाली आहे. बटाट्याच्या घाऊक भावात ४०० रुपयांनी वाढ झाली असून टोमॅटोच्या दरात क्विंटलमागे ५६०० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत या वर्षी ऑक्टोबरमध्ये डाळींच्या घाऊक किमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये विविध प्रकारच्या गव्हाच्या सरासरी घाऊक किमती ११-१७ टक्के वाढताना दिसत आहेत. सणासुदीत मोहरीचे तेल आणि तूपही जास्त वापरले जाते आणि या दोन्हीचे भावही चढे आहेत.

हेही वाचा :

Related posts

Python near Hostel: शंभर किलो अजगराचा गर्ल्स होस्टेलजवळ डेरा

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित