काँग्रेसचा ‘हा सूर्य हा जयद्रथ’ पवित्रा

जमीर काझी;  मुंबई : निवडणूक प्रचारनीतीत अग्रेसर आणि आक्रमक असलेल्या भाजपाला काँग्रेसने पहिल्यांदाच त्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले. काँग्रेसशासित राज्यांत निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याच्या मोठ्या जाहिराती भाजपाकडून दिल्या होत्या. त्यावर संबंधित राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र येत भाजपच्या खोट्या जाहिराती आणि आरोपांची चिरफाड केली.

काँग्रेसने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशात जाहीर केलेल्या गॅरंटी दिल्या नाहीत, अशा जाहिराती भाजपाने दोन दिवसांपूर्वी सर्व प्रमुख वृत्तपत्रांत पान-पानभर दिल्या होत्या. त्या दिशाभूल करणाऱ्या असल्याचा आरोप करीत काँग्रेसने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर शनिवारी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खु, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत या गॅरंटी कशा लागू केल्या, त्यांचा किती लोकांना लाभ झाला, याची आकडेवारीसह सविस्तर माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांच्या खोटारडेपणाला  चोख प्रत्युत्तर दिले. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अशा प्रकारे अन्य राज्यांच्या प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक घेऊन काँग्रेसने विरोधकांचे आरोप आक्रमकपणे खोडून काढण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.

दादर येथील टिळक भवनात ही पत्रकार परिषद झाली. हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू म्हणाले, की सत्याला नेहमीच असत्याशी सामना करावा लागतो. महाराष्ट्राप्रमाणेच हिमाचल प्रदेशनेही ‘ऑपरेशन कमळ’चा सामना केला. जनतेने काँग्रेसच्या गॅरंटीवर आणि सरकारच्या कामकाजावर विश्वास ठेवत पुन्हा सत्ता दिली. काँग्रेसचे सरकार येताच पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू केली. ज्यांना ५००० रुपये मिळत होते त्यांना आता ५० हजार रुपये मिळत आहेत. मक्याला प्रतिकिलो ३० रुपये, गहू ४० रुपये किलो, तर गाईच्या दुधाला प्रति लिटर ४५, म्हशीच्या दुधाला ५५ रुपयांचा हमीभाव देण्याचा निर्णय घेतला. ५८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला दरमहा १५०० रुपये दिले जात  आहेत. १८ वर्षांवरील मुलींना १५०० रुपये, तर वैद्यकीय शिक्षण, पीएचडी करणाऱ्या मुलींनाही आर्थिक मदत दिली जात असल्याचे सांगत या गॅरंटींची पूर्तता करण्यासाठी महसूल उत्पन्नाचे स्रोत वाढवले आहेत, असे त्यांनी सांगितले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले, की विधानसभा निवडणुकीवेळी  ६ गॅरंटी जाहीर केल्या होत्या. सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना सरसकट २ लाख रुपयांची कर्जमाफी दिली, २२ लाख शेतकऱ्यांना फायदा झाला. बळिराजाला १८ कोटी रुपये वितरित केले. १० महिन्यात ५० हजार सरकारी नोकऱ्या दिल्या. महालक्ष्मी योजनेअंतर्गत मोफत बस प्रवास सुरू केला. आतापर्यंत बस महामंडळाला ३४०० कोटी दिले. ५९ लाख कुटुंबांना ५०० रुपयांत गॅस सिलिंडर दिले जात आहे. गृहज्योती योजनेअंतर्गत ५० लाख कुटुंबांना २०० युनिट वीज मोफत दिली जात आहे.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले की, राहुल गांधी यांनी कर्नाटकात ६ गॅरंटी देण्यात आल्या. आम्ही सत्तेत येताच त्याची अंमलबजावणी सुरू केली. कर्नाटकातील १ कोटी २२ लाख महिलांना ‘गृहलक्ष्मी’ योजनेतून दरमहा २००० रुपये मिळत आहेत. १ कोटी ६४ लाख कुटुंबे ‘गृहज्योती’ योजनेचा लाभ घेत आहेत. ४.०८ कोटी लोकांना ‘अन्नभाग्या’ योजनेअंतर्गत १० किलो मोफत तांदूळ दिला जात आहे. ‘शक्ती’ योजनेतून आतापर्यंत ३२० कोटी महिलांनी मोफत बस प्रवास केला आहे.

Related posts

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणी २८ डिसेंबरला मोर्चा

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र