Home » Blog » Father lost the Prime Ministership : मुलाच्या प्रतापामुळे हुकले बापाचे पंतप्रधानपद

Father lost the Prime Ministership : मुलाच्या प्रतापामुळे हुकले बापाचे पंतप्रधानपद

by प्रतिनिधी
0 comments
Father lost the Prime Ministership

बापाचं राजकीय आयुष्य मुलानं अडचणीत आणल्याची देशाच्या राजकारणात अनेक उदाहरणं आहेत. महाराष्ट्रात सध्या पार्थ पवार यांचं जमीन खरेदी प्रकरण गाजतंय. त्यामुळं अजित पवार अडचणीत आले आहेत. हे वादळ कुठपर्यंत जाणार आहे आणि कुठे जाऊन थांबणार आहे, याचा अंदाज येत नाही. परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बॅकफुटवर गेले आहेत.

अजित पवार यांच्याशी संबंधित या प्रकरणानंतर देशाच्या राजकारणातील अशाच एका मोठ्या प्रकरणाच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. त्यावेळी तर मुलाच्या प्रतापामुळे बापाची पंतप्रधानपदाची संधी हुकली होती. काय होते ते प्रकरण आणि नेमके काय घडले होते..?

विजय चोरमारे

सुरेश रामचा कार अपघात आणि सुरुवात झालेली वादळ

२१ ऑगस्ट १९७८ची घटना आहे. दिल्लीच्या बाहेरच्या मोहन नगर भागात मोहन मीकिन कंपनीच्या गेटसमोर एक गंभीर अपघात झाला. मर्सिडीज कारने एका व्यक्तीला चिरडले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्या कारमध्ये एक जोडपे होते. अपघात पाहून जमलेल्या गर्दीतले लोक त्यांना मारहाण करतील, अशा भीतीने त्या व्यक्तिने कार सरळ प्लांटच्या आत घुसवली. (Father lost the Prime Ministership)

रखवालदाराने फोन करून प्लांट मॅनेजर अनिल बाली यांना कळवले. कारमधून उतरलेल्या व्यक्तिला अनिल बालीने लगेच ओळखले—तो त्यावेळचे संरक्षणमंत्री बाबू जगजीवनराम यांचा मुलगा सुरेश राम होता. कारमध्ये त्याची गर्लफ्रेंड होती.या घटनेनंतर उघड झालेल्या सेक्स स्कँडलने देश हादरून गेला.राजकीय विश्लेषकांच्या मते— जर हे सेक्स स्कँडल समोर आले नसते, तर १९८०च्या दशकात बाबू जगजीवनराम यांच्या रुपाने देशाला पहिले दलित पंतप्रधान मिळाले असते.

इंदिरा गांधीपासून वेगळे होणे

आणीबाणीनंतर १९७७ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणूक जाहीर केली. तेव्हा संरक्षणमंत्री असलेल्या बाबू जगजीवनराम यांनी इंदिरा यांना सांगितले: आणीबाणीचे डाग स्वच्छ केले नाहीत तर आपल्याला जनतेचा विश्वास पुन्हा मिळणार नाही. वृत्तपत्रांवरील निर्बंद, राजकीय कैदी, इतर निर्बंध हटवले पाहिजेत.इंदिरा गांधींनी त्यांचा सल्ला नाकारला. तीन दिवसांनी बाबू जगजीवनराम यांनी राजीनामा दिला.

पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये सगळ्यात पुढे

 आणीबाणीनंतर १९७७च्या निवडणुकीत काँग्रेस पराभूत झाली. जनता पक्ष सत्तेवर आला. जनता पक्षातील सर्वात मोठा गट जनसंघाचा—९३ जागा. त्यांनी स्पष्ट सांगितले— पंतप्रधानपदासाठी आमची पहिली पसंती बाबू जगजीवनराम. कारण: ते अनुभवी होते. वेगवेगळ्या मंत्रालयांच्या जबाबदा-या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत. सर्वांना सोबत घेण्याची, अनेक पक्षांना एकत्र ठेवण्याची क्षमता त्यांच्यात आहे. परंतु मोरारजी देसाई यांनीही पंतप्रधानपदावर दावा केला होता. चौधरी चरण सिंग यांनाही पंतप्रधान व्हायचे होते. वाद वाढला आणि शेवटी जयप्रकाश नारायण यांनी मोरारजी यांची निवड जाहीर केली. (Father lost the Prime Ministership)

ही बातमी ऐकल्यावर बाबू जगजीवनराम प्रचंड अस्वस्थ झाले होते. त्यांचा संताप संताप झाला होता. “हा विश्वासघात आहे!” असे ते म्हणत होते. परंतु तरीही शेवटी जयप्रकाश नारायण यांच्या सूचनेनुसार ते सरकारमध्ये सामील झाले. मोरारजी देसाई यांचे सरकार लवकरच अस्थिर झाले. त्यावेळी जगजीवनराम यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या. आपला पंतप्रधानपदाचा रस्ता मोकळा झाला, असे त्यांना वाटू लागले. याच दरम्यान त्यांचा मुलगा सुरेश रामचे सेक्स स्कँडल उघड झाले.

नग्न फोटो कसे बाहेर आले?

याबद्दल तीन वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात: सुरेश रामची एफआयआर. त्यानुसार २० ऑगस्ट १९७८ रोजी त्याचे आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे गुंडांनी अपहरण केले. त्यांना मारहाण केली.  त्यांचे नग्न फोटो काढले. राजनारायण यांचा माणूस असलेल्या ओम पाल याला ठाऊक होते की, सुरेश रामची गर्ल फ्रेंड दिल्ली युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी होती. सुरेश राम स्वतःच आपल्या गर्लफ्रेंडसोबत खासगी क्षण व्यतीत करीत असताना पोलरॉईड कॅमेऱ्याने फोटो काढत असे. या कॅमे-यातून ऑन दि स्पॉट प्रिंट बाहेर येत असे. ते फोटो कारच्या पुढच्या भागातील बॉक्समध्ये होते. ओम पालने सुरेश रामच्या कारचा पाठलाग करताना कार अडवली आणि त्याच दरम्यान फोटो हातोहात काढून घेतले.

सिगारेट काढताना फोटो खाली पडले

२३ ऑगस्ट १९७८ ला राजनारायण यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. राज नारायण यांच्या दोन लोकांना अटक करण्यात आली होती. या प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकारांनी राजनारायण यांना ओम पालने फोटो कसे मिळवले, याबद्दल विचारले. त्यावर ते म्हणाले, ओम पालने सुरेश रामकडे सिगारेट मागितली. सिगारेटसाठी त्याने कारचा बॉक्स उघडला, त्यातून काही फोटो खाली पडले, ते ओम पालने उचलले. फोटो परत घेण्यासाठी सुरेश रामने ओम पालला पैशाचे अमिष दाखवले, परंतु ओम पाल तयार झाला नाही. त्याने फोटो परत दिले नाहीत. त्यावेळी राजनारायण पुढे म्हणाले, “जर तुम्ही रस्त्यावर नग्न पळत असाल, तर ते तुमचे ‘खाजगी प्रकरण’ राहत नाही.” (Father lost the Prime Ministership)

 सुमारे चाळीस फोटो घेऊन ओम पाल थेट राजनारायण यांना भेटला. त्याच रात्री एक बैठक झाली.  उद्योगपती कपिल मोहन यांच्या घरी मध्यरात्री बैठक झाली. त्यात बाबू जगजीवनराम यांनी फोटो परत मिळवण्यासाठी राजनारायण यांना विनवण्या केल्या. “तुम्ही जे मागाल ते देतो—पैसा, पद, राज्याचे मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद—फक्त फोटो परत द्या.” असे बाबूजी म्हणाले. परंतु राजनारायण तयार झाले नाहीत. या चर्चेतून काहीच निष्पन्न झालं नाही.

 फोटो संजय गांधींपर्यंत पोहोचले

संजय गांधीही फोटो पाहून हादरले. इंदिरा गांधी यांनाही फोटो दाखवले गेले. इंदिरा म्हणाल्या— “जोपर्यंत जगजीवनराम माझ्याकडे म्हणजे काँग्रेसकडे परत येत नाहीत तोवर मी हे फोटो छापण्यापासून कुणाला रोखणार नाही.”

 कृष्णकांत यांची मदत

जगजीवनराम यांनी आधीचे काँग्रेसचे नेते आणि जनता पक्षाचे खासदार कृष्णकांत यांची मदत घेतली. ते त्यांचे जवळचे मित्र आणि विश्वासू होते. त्यांच्याशी बोलताना जगजीवनराम म्हणाले, एक और बेटे ने बाप को डुबो दिया. दरम्यान सर्व वृत्तपत्रांच्या कार्यालयात सुरेश रामचे नग्न फोटो पोहोचले होते. परंतु कृष्णकांत यांच्या मदतीने सर्व वृत्तपत्रांना मॅनेज करण्यात आले. फक्त इंडियन एक्सप्रेसने एक टिपणी छापली होती तेवढेच.

पण संजय गांधी यांच्या पत्नी मनेका गांधी यांनी तेव्हा सूर्या नावाचे इंग्रजी मासिक सुरू केले होते. ‘सूर्या’ मासिकाने ऑक्टोबर १९७८ चा अंक सुरेश रामच्या प्रकरणाची कव्हर स्टोरी केली. तब्बल आठ पाने ही स्टोरी छापली होती. सुरेश रामचे वय ४२ वर्षे होते आणि तो विवाहित होता. त्याची गर्ल फ्रेंड वीस वर्षांची होती. स्टोरीमध्ये सुरेश रामच्या पत्नीची मुलाखतही होती. आठ पानांच्या स्टोरीमध्ये दोन पानांवर नग्न फोटो होते.

या स्टोरीमुळे सूर्या मासिक चर्चेत आले. त्याचा खप वाढला. या अंकाची तर ब्लॅकने विक्री झाली. परंतु त्याचवेळी जगजीवनराम यांच्या राजकीय आयुष्याला मात्र ब्रेक लावला. इंदिरा गांधींना वाटत होते की, दलितांचा मोठा नेता पंतप्रधान बनला तर त्याला पदावरून दूर करणे अवघड बनेल. त्यांचा प्रशासनावरील वचकही जबरदस्त होता. परंतु सुरेश रामच्या – त्यांच्या मुलाच्या प्रकरणामुळे सगळेच संपले.

 कट कोणाचा होता?

राजकीय वर्तुळात असे मानले जाते की, चौधरी चरण सिंग, राजनारायण आणि इंदिरा गांधी यांचा या कटात सहभाग होता. कारण या तिघांनाही बाबू जगजीवनराम पंतप्रधान व्हावेत असे नव्हते. बाबू जगजीवनराम हे स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात सक्षम, अनुभवी आणि कर्तृत्ववान दलित नेते होते. पंतप्रधानपदाच्या अगदी जवळ पोहोचलेले नेते होते. पण त्यांच्या मुलाच्या स्वैरपणामुळे आणि विरोधकांनी केलेल्या राजकीय खेळींमुळे देशाचा पहिला दलित पंतप्रधान बनण्याची संधी हातातून निसटली.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00