Delhi Capitals : दिल्लीचा सलग दुसरा विजय

Delhi Capitals

विशाखापट्टणम : मिचेल स्टार्क व कुलदीप यादवच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलमध्ये रविवारी सनरायझर्स हैदराबादला ७ विकेट्सनी हरवले. दिल्लीचा हा यंदाच्या मोसमातील सलग दुसरा विजय असून याबरोबरच दिल्लीने गुणतक्त्यात ४ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. (Delhi Capitals)

या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. परंतु, लौकिकाप्रमाणे धडाकेबाज सुरुवात हैदराबादला करता आली नाही. डावाच्या पहिल्याच षटकात सलामीवीर अभिषेक शर्मा धावबाद झाला. स्टार्कने भेदक मारा करत आपल्या सुरुवातीच्या तीन षटकांमध्ये तीन विकेट घेतल्यामुळे हैदराबादची स्थिती पाचव्या षटकात ४ बाद ३७ अशी होती. अनिकेत वर्मा आणि हेन्रिक क्लासेन यांनी चौथ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी रचून संघाला संकटातून बाहेर काढले. अनिकेतने ४१ चेंडूंमध्ये ५ चौकार व ६ षटकारांसह ७४ आणि क्लासेनने १९ चेंडूंमध्ये प्रत्येकी २ चौकार, षटकारांसह ३२ धावा फटकावल्या. मोहित शर्माने क्लासेनला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर, कुलदीपने मधल्या फळीतील ३ विकेट घेऊन हैदराबादच्या धावसंख्येला ब्रेक लावला. स्टार्कने १९व्या षटकात दोन विकेट घेत हैदराबादचा डाव संपवला. त्याने ३५ धावांमध्ये हैदराबादचा निम्मा संघ गारद केला, तर कुलदीपने २२ धावांत ३ विकेट घेऊन त्याला उपयुक्त साथ दिली. (Delhi Capitals)

हैदराबादच्या आव्हानाचा पाठलाग करताना फाफ डुप्लेसिस आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क यांनी दिल्लीला ९ षटकांत ८१ धावांची सलामी दिली. विशेषत: डुप्लेसिसने वेगाने धावा जमवत अवघ्या २६ चेंडूंमध्ये प्रत्येकी ३ चौकार व षटकारांसह अर्धशतक झळकावले. मात्र, पुढच्याच चेंडूवर झिशान अन्सारीने त्याला बाद करून दिल्लीला पहिला धक्का दिला. दहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर अन्सारीनेच फ्रेझर-मॅकगर्कलाही बाद केले. फ्रेझरने २२ चेंडूंमध्ये ४ चौकार व २ षटकारांसह ३८ धावा केल्या. यंदाच्या मोसमातील पहिलाच सामना खेळणाऱ्या लोकेश राहुलला केवळ १५ धावा करता आल्या. त्यानंतर मात्र, अभिषेक पोरेल आणि ट्रिस्टन स्टब्ज यांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचत दिल्लीचा विजय साकारला. अभिषेक ३४, तर स्टब्ज २१ धावांवर नाबाद राहिला. हैदराबादतर्फे तिन्ही विकेट अन्सारीने घेतल्या. हैदराबादचा हा सलग दुसरा पराभव असून संघ गुणतक्त्यात सातव्या स्थानावर आहे. (Delhi Capitals)

संक्षिप्त धावफलक : सनरायझर्स हैदराबाद – १८.४ षटकांत सर्वबाद १६३ (अनिकेत वर्मा ७४, हेन्रिक क्लासेन ३२, ट्रॅव्हिस हेड २२, मिचेल स्टार्क ५-३५, कुलदीप यादव ३-२२) पराभूत विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – १६ षटकांत ३ बाद १६६ (फाफ डुप्लेसिस ५०, जेक फ्रेझर-मॅकगर्क ३८, अभिषेक पोरेल नाबाद ३४, झिशान अन्सारी ३-४२).

हेही वाचा :

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ऑक्टोबरमध्ये

आर्यना सबालेंकाला विजेतेपद

Related posts

Royal Challengers : बेंगळुरू पुन्हा विजयपथावर

Abhishek Sharma : ‘ऑरेंज आर्मी, हे तुमच्यासाठी!’

Lucknow Wins : लखनौ ‘टॉप फोर’मध्ये