डॅमेज कंट्रोलसाठी बावनकुळे इचलकरंजीत

कोल्हापूर;  प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. आता महायुतीमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. हाच वाद इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातही दिसू लागला आहे. महिनाभरापूर्वी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच राहुल आवाडेंना महायुतीकडून उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र त्यांच्या पक्षप्रवेशामुळे प्रकाश आवाडे यांचे कट्टर विरोधक असलेले भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या आमदारकीला कात्री लागल्याने सुरेश हळवणकर समर्थक आणि कट्टर भाजपचे जुने कार्यकर्ते नाराज झाले. आवाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला असला तरी अद्याप इचलकरंजी भाजपने त्यांना स्वीकारल नाही अस चित्र सध्या दिसून येत आहे. (Chandrashekhar Bawankule)

आवाडेंना निमंत्रण नाही

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात आज सुरेश हाळवणकर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपचा मेळावा पार पडत आहे. मात्र या मेळाव्यास भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार प्रकाश आवाडे यांना निमंत्रणच दिलेले नाही. यामुळे इचलकरंजीत भाजपमध्ये गटातटातील राजकारण आणि नाराजी चव्हाट्यावर आली आहे. २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचा पराभव केला. तसेच प्रकाश आवाडे यांनी थेट भाजपाला समर्थन देत महायुतीच्या माध्यमातून मतदार संघातील विविध कामे करून घेतली. प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांची गेल्या काही दिवसांत भाजप पक्षश्रेष्ठींसोबत वाढलेली जवळीक यामुळे हळवणकर आणि आवाडे यांच्यात राजकीय संघर्ष दिवसेंदिवस शिगेला पोहोचला होता.

निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची नाराजी

गेल्या दीड दोन वर्षांपासून आवाडेंचे भाजप पक्षश्रेष्ठींबरोबर चांगले संबंध तयार झाल्याने ते अधिकृतपणे भाजपमध्ये येण्यास इच्छुक होते. मात्र सुरेश हाळवणकर यांच्यामुळे  आवडे पिता-पुत्रांचा पक्षप्रवेश थांबत होता. मात्र महिनाभरापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रकाश आवाडे आणि त्यांचा मुलगा राहुल आवाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. विशेष म्हणजे हा पक्षप्रवेश होत असताना व्यासपीठावर आवाडे पितापुत्रांसोबत सुरेश हळवणकर हेही होते. हे चित्र पाहून आवाडे आणि हळवणकरांतील राजकीय संघर्ष संपला. हळवणकर यांचे राजकीय पुनर्वसन होणार असे सर्वांना वाटत होते. मात्र आज इचलकरंजी येथे पार पडत असलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आपली नाराजी बॅनरबाजीतून दाखवून दिली. सुरेश हळवणकर यांचा फोटो बॅनरवर झळकवत ‘निष्ठेला हाच का न्याय ?’ असा सवाल विचारण्यात आला आहे. तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे छायाचित्र लावून ‘नये चाहे दस जुट जाए, लेकिन पुराना कार्यकर्ता हमारे जीत की गॅरंटी है. नए कार्यकर्ता पर विश्वास करना जल्दबाजी है,’ बॅनर देखील झळकवण्यात आले आहे. (Chandrashekhar Bawankule)

डॅमेज कंट्रोल करण्यात बावनकुळे यशस्वी होणार का?

भाजपमध्ये या आधीही अनेक ठिकाणी इन्कमिंगमुळे भाजपच्या निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शवत वेगळी भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर इचलकरंजीमधील भाजपमधील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येत असले तरी त्यांच्यासमोरच त्याच मेळाव्यात पक्षातील दोन गटांतील नाराजी स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला आणि आवाडे पितापुत्रांना ही निवडणूक सोपी नसणार आहे असेच चित्र दिसत आहे. यामुळे बावनकुळे डॅमेज कंट्रोल करण्यात यशस्वी होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी