भारतापुढे मुंबई कसोटीत व्हाईट वॉश रोखण्याचे आव्हान

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील अखेरचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला उद्यापासून (दि.१) सुरूवात होत आहे. याआधीच न्यूझीलंडने बंगळुरू आणि पुणे कसोटीत विजय मिळवून मालिका खिशात घालून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. उद्या होणाऱ्या कसोटीत किवी संघ भारतीय संघाला व्हाईट वॉश देण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. तर, भारतीय संघ व्हाईट वॉश टाळण्यासाठी खेळणार आहे. (Mumbai Test )

न्यूझीलंडने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बंगळुरू आणि पुणे कसोटीत विजय मिळवून भारताची १२ वर्षांपासून मायभूमीत मालिका जिंकण्याची विजयी घौडदौड रोखली. पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत राहण्यासाठी भारताला मुंबई कसोटीत विजय मिळवणे गरजेचे आहे.
भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मुंबई कसोटीसह सहा सामने खेळायचे आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम दोनमध्ये स्थान मिळवण्यासाठी सहापैकी चार सामन्यात विजय मिळवणे महत्वाचे आहे. बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी सुमार कामगिरी केली. यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने पुनरागमन करत दमदार खेळी केली होती. मात्र, दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर नांग्या टाकल्या होत्या. तर, पुणे कसोटीत भारताच्या वॉशिंग्टनने गोलंदाजीत शानदार कामगिरी केली होती. यामुळे पुणे कसोटीत भारतीय संघ जिंकणार असे चित्र होते. मात्र, न्यूझीलंडच्या सँटनरच्या फिरकीत भारतीय फलंदाज अडकले. यामुळे पुणे कसोटीतही भारताचा पराभव झाला.

न्यूझीलंडने भारताच्या दौऱ्यात आपली रणनीती चांगल्या प्रकारे राबवली आहे. यासह भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांना कडवे आव्हान देण्यात त्यांचा संघ यशस्वी ठरला आहे. या मालिकेतील रोहित, कोहली, अश्विन आणि जडेजा यांची आतापर्यंतची खराब कामगिरी भारतासाठी चिंतेचा विषय ठरणार आहे. भारताला न्यूझीलंडची विजयी मोहीम थांबवायची असेल, तर या चार खेळाडूंना चांगला खेळ करावा लागेल. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टीही फिरकी गोलंदाजांना मदत करेल अशी अपेक्षा आहे आणि अशा परिस्थितीत भारतीय फलंदाजांना आणखी एका खडतर कसोटीतून जावे लागणार आहे.

Related posts

‌Bengal Record : बंगालचा विक्रमी धावांचा पाठलाग

Mohammed Shami : शमीचा समावेश अद्याप दूरच

Tanush Kotian : तनुष कोटियनला ऑस्ट्रेलियाचे तिकीट