नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (सीबीएसई) ने दहावीची परीक्षा वर्षात दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. २०२६ पासून याची अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच बोर्डाशी संलग्न असलेल्या २६० परदेशी शाळांसाठी सीबीएसई ग्लोबल अभ्यासक्रमही याच वर्षीपासून सुरू करणार आहे.(CBSE)
शिक्षण मंत्रालयाने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाखाली सीबीएसई, शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, केंद्रीय विद्यालय संघटना आणि नवोदय विद्यालय समिती यांच्या प्रमुखांशी चर्चा केली. सोमवारी सार्वजनिक सल्लामसलत करण्यासाठी तयार केलेल्या मसुदा योजनांची सविस्तर चर्चा करण्यात आली. (CBSE)
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (सीबीएसई) ने दरवर्षी अनेक बोर्ड परीक्षा राबविण्याची योजना जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षा दोनदा देता येईल. त्यामुळे त्यांना मेरिटही राखता येईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा(एनईपी)शी सुसंगतच ही सुधारणा आहे. लवचिकता आणि विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनावर यामुळे भर देता येतो, असा दावा करण्यात आला आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “वर्षातून एकाचवेळी होणाऱ्या बोर्ड परीक्षेचा विद्यार्थ्यांच्या मनावर मोठा ताण असतो. हा ताण कमी करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी सुधारण्याची संधी देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सीबीएसईचा हा प्रयत्न अधिक विद्यार्थीस्नेही आहे.’’ (CBSE)
परीक्षेची चिंता किंवा या चिंतेतून येणारे आजारपण यांसारख्या आव्हानांना तोंड देत असलेल्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा हा प्रयत्न आहे. शिवाय राष्ट्रीय शिक्षण धोरणातील सर्वसमावेशकतेच्या उद्दिष्टाचे समर्थनही यामुळे होते. एकापेक्षा जास्त प्रयत्न केल्याने विविध पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता प्रदर्शित करण्याची वाजवी संधी यामुळे मिळणार आहे. (CBSE)
शिक्षण मंत्री प्रधान यांनी, या धोरणामुळे विद्यार्थी तणावमुक्त राहतील. त्याचबरोबर परीक्षा पद्धतीतही चांगली सुधारणा होईल. या माध्यमातून परीक्षेमुळे येणारा ताण कमी व्हायला मदत होईल. अधिक संतुलित मूल्यमापन प्रणाली अंमलात आणता येईल, असा विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा :