नवी दिल्ली : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये खेळणार का, याचा निर्णय मंगळवारी होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अंतिम संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) पाठवण्याची मुदत १२ फेब्रुवारी असून तत्पूर्वी, बुमराहच्या सहभागाविषयी फैसला घेण्यात येईल. (Bumrah)
भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये पाचवी कसोटी खेळताना बुमराहची पाठीची दुखापत बळावली होती. या दुखापतीमुळे तो पाचव्या कसोटीच्या अखेरच्या डावात गोलंदाजीही करू शकला नव्हता. तेव्हापासून मागील महिनाभर बुमराह पाठदुखीवर उपचार घेत आहे. सध्या सुरू असलेल्या भारत-इंग्लंड वन-डे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठीही त्याला विश्रांती देण्यात आली होती. तिसऱ्या सामन्यासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला असला, तरी त्याच्या फिटनेसवर अंतिम संघातील सहभाग अवलंबून आहे. (Bumrah)
मागील आठवड्यामध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) बेंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये बुमराहच्या पाठीचे स्कॅन्स करण्यात आले. त्यानुसार, बीसीसीआयचे वैद्यकीय पथक निवड समितीशी चर्चा करणार असून त्यावर आधारित निर्णय घेण्यात येईल. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या प्राथमिक संघामध्ये बुमराहचा समावेश असला, तरी तो खेळू न शकल्यास त्याच्याजागी हर्षित राणाची निवड करण्यात येईल. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेस १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून भारताचा सलामीचा सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशशी होणार आहे. (Bumrah)
हेही वाचा :