भारतीय संघ सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सामन्यात वैयक्तिक कारणांमुळे अनुपस्थित असल्यामुळे संघाची धुरा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे आहे. या संधीचे सोने करत त्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पर्थ येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला विजय मिळवून दिला. त्याच्यासह यशस्वी जैस्वाल, विराट कोहली आणि के. एल. राहुल यांनी मोलाचा वाटा उचलला. जाणून घेऊया जसप्रीत बुमराहच्या कारकिर्दीबद्दल…
जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. तो क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतो. सलग १४०-१४५ कि.मी. प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. यासह तो इन-स्विंगिंग यॉर्कर टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे.
बुमराहचा जन्म ६ डिसेंबर १९९३ रोजी अहमदाबाद, गुजरात येथे झाला. लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. यानंचर जसप्रीतच्या आईने त्याचे पालनपोषण केले. लहान असतानाच जसप्रीतला क्रिकेटचे वेड लागले. यावेळी तो परिसरातील मुलांसोबत क्रिकेट खेळायचा. त्याला क्रिकेटमध्ये फलंदाजीपेक्षा गोलंदाजीमध्ये अधिक आवड निर्माण झाली.
लहान असतानाच त्याने आपली आवड जोपासत क्रिकेटमध्येच करिअर करायचे ठरवले. २०१२-१३ साली झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राविरुद्ध खेळताना टी -२० सामन्यात पदार्पण केले. अंतिम सामन्यात बुमराहने स्पेलमध्ये फक्त १४ धावा देत ३ गडी बाद करून संघाला विजयी केले.
यानंतर ऑक्टोबर २०१३-१४ साली त्याने गुजरातकडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने विदर्भविरुद्धच्या सामन्यात शानदार प्रदर्शन करत सात फलंदाज बाद केले होते. या कामगिरीमुळे तो गुजरात संघाचा अविभाज्य भाग बनला.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
आपल्या देशांतर्गत क्रिकेटमधील शानदार कामगिरीमुळे बुमराह कायम चर्चेत राहिला. २०१६ साली त्याला भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. २६ जानेवारी २०१६ साली झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यातून बुमराहला भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. यानंतर त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर एका कॅलेंडर वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक २८ बळी घेण्याचा विक्रम केला.
२०१७ साली झालेल्या इंग्लंड विरुद्घ भारत यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसर्या सामन्यात बुमराहने अचूक गोलंदाजी करत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शेवटच्या षटकात इंग्लंडला जिंकण्यासाठी ७ धावांची आवश्यकता असताना त्याने फक्त २ धावा देत २ गडी बाद केले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या कामगिरीबद्दल त्याला सामनावीरचा पुरस्कार मिळाला.
२०१७ मध्ये श्रीलंका दौऱ्यात बुमराह हा पाच किंवा त्यापेक्षा कमी सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याने या दौऱ्यात तब्ब्ल १५ बळी घेतले.
नोव्हेंबर २०१७ मध्ये द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आले. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात, जोहान्सबर्ग येथे, बुमराहने १८.५ षटकांत ५/५४ या आकड्यांसह कसोटीत पहिले पाच बळी घेतले.