book exhibition : राज्यघटनेच्या मूळ प्रत, दुर्मिळ ग्रंथ वाचायचे आहेत…?

Suv

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्रामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत आयोजित विविध प्रकारच्या ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन १५ दिवस चालणार आहे.  राज्यघटनेच्या मूळ दुर्मिळ प्रतिसह १५३ दुर्मिळ ग्रंथ, विविध विषयावरील पुस्तके वाचकांना मोफत वाचण्यास मिळणार आहेत. (book exhibition)

प्रदर्शनात शिवाजी विद्यापीठातर्फे प्रकाशित निवडक २५ ग्रंथ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित १५ ग्रंथ, साहित्य अकादमीकडून प्रकाशित ९० ग्रंथ तसेच ३५ दुर्मिळ संदर्भ ग्रंथ मांडले आहेत. यामध्ये विश्वकोश, नकाशे आणि इतर संदर्भ ग्रंथांचा समावेश आहे. प्रदर्शनस्थळी निवडक वाचनीय शंभर पुस्तकांची यादीही वाचकांच्या सोयीसाठी प्रदर्शित करण्यात आली आहे.(book exhibition)

दुर्मिळ ग्रंथ विभागात एकूण १५३ दुर्मिळ ग्रंथ मांडले आहेत. यामध्ये ग्रंथांखेरीज हस्तलिखिते, ताम्रपट तसेच कोल्हापूर परिसरात झालेल्या उत्खननावेळी मिळालेल्या वस्तूही ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर विद्यापीठ ग्रंथालयात दाखल झालेले रसायनशास्त्राचे पहिले पुस्तकही पाहता येणार आहे. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची स्वाक्षरी असलेली ‘अग्निपंख’ पुस्तकाची प्रतही प्रदर्शनामध्ये आहे. भारतीय राज्यघटनेची दुर्मिळ मूळ प्रतही वाचकांना येथे पाहता येणार आहे.(book exhibition)

ग्रंथ प्रदर्शन १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत सुरू राहणार आहे. ते सर्वांसाठी खुले आहे. या कालावधीत बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्रातील पुस्तके तेथेच बसून वाचण्यासाठी विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वाचकांनी केंद्राला भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी करावी, तसेच त्यांना हव्या त्या पुस्तकांचे वाचन करावे. जास्तीत जास्त वाचकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक डॉ. धनंजय सुतार यांनी केले आहे.

शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह नागरिकांनी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्रात आयोजित ग्रंथ प्रदर्शन, मोफत वाचन यांसह आयोजित विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी उद्घाटन समारंभात केले. यावेळी ग्रंथालयशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील, डॉ. शिवराज थोरात यांच्यासह ज्ञानस्रोत केंद्रातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

 

मंगळ दहा हजारपटीने चमकणार

 

Related posts

Triple Talaq: व्हिडीओ कॉलद्वारे दिला तलाक

विलासकाका उंडाळकरः `चव्हाण स्कूल’चा लास्ट स्टुडंट..! (Vilaskaka Undalkar)

Devendra Fadnavis : देशमुख हत्येच्या खटल्यात उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची तयारी