हे ब्लॅकमेलिंग नाही तर काय आहे?

Modi and Hardeep Singh Puri are mentioned in the Epstein file

  • राकेश कायस्थ


कोणताही देश बदललेल्या परिस्थितीनुसार आपले परराष्ट्र धोरण बदलू शकतो. तो नवे मित्रदेश तयार करू शकतो. आणि जुन्या मित्रदेशांपासून हळूहळू दूरही जाऊ शकतो. पण आंतरराष्ट्रीय घडामोडींना पूर्णपणे दुर्लक्ष करून त्यापासून पळ काढू शकत नाही. विशेषतः भारतासारखा मोठा देश तर अजिबात नाही. (Blackmailing of Modi)

इराणच्या बाबतीत पंतप्रधान मोदी जे करत आहेत, ते आश्चर्यकारक आणि लाजिरवाणे आहे.

इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनेई यांच्या हत्येची निंदा करणे तर दूरच, पण भारताने सुरुवातीला साधा शोकसंदेशसुद्धा जारी केला नाही. त्यासाठी बराच कालावधी घेतला. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये हा एक सामान्य मुत्सद्देगिरीचा शिष्टाचार मानला जातो. (Blackmailing of Modi)

याच आयतुल्ला खामेनेई यांना मोदी भेटले तेव्हा मोदींनी त्यांना ७०० वर्षे जुनी कुरआन शरीफची प्रत भेट दिली होती. त्यावेळी मोदी म्हणाले होते की, भारत आणि इराण यांचे संबंध जगाच्या इतिहासाइतके जुने आहेत.

इराण हा जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात असलेला छोटासा देश नाही. तो एक प्रकारे भारताचा शेजारीच आहे. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे १५ टक्के तेल इराणकडून आयात करत होता, तेही अतिशय स्वस्त दरात. पण अमेरिकेच्या दबावामुळे भारताला ही आयात थांबवावी लागली.

याशिवाय, रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या चाबहार बंदरावर भारताने जवळपास १० हजार कोटी रुपये गुंतवणूक केली होती. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामुळे भारताने या प्रकल्पातूनही हात काढून घेतला.

याच चाबहार बंदराचा करार झाल्यावर पंतप्रधान मोदींनी त्याला आपला मोठा कूटनीतिक विजय म्हणून डांगोरा पिटला होता. (Blackmailing of Modi)

२०२४ च्या निवडणुकांदरम्यान दिलेल्या जवळजवळ प्रत्येक मुलाखतीत मोदी म्हणत होते की, त्यांचे सरकार निर्णय घेताना कोणता तिसरा देश काय विचार करेल याची पर्वा करत नाही. पण सध्याची परिस्थिती त्या दाव्याच्या पूर्ण उलट दिसते.

मग प्रश्न असा आहे की अचानक असे काय घडले की पंतप्रधान मोदींना देशाची प्रतिमा खालावणारे हे मौन पाळावे लागले?

याचे उत्तर देशाला माहीत आहे. हे सरळसरळ ब्लॅकमेलिंगचे प्रकरण आहे—आणि तेही साधे नाही. (Blackmailing of Modi)

डोनाल्ड ट्रंप हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात खालच्या दर्जाचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि बेंजामिन नेत्यान्याहू त्यांचे निकृष्ट समर्थक आहेत. आणि नरेंद्र मोदींनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाला दुसऱ्याच्या मागे उभे राहणारा देश बनवून ठेवले आहे.

जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला, तेव्हा पंतप्रधान मोदींनी नेत्यान्याहू यांना फोन करून आपला पाठिंबा व्यक्त केला. नंतर नेत्यान्याहू यांनी एखादे प्रमाणपत्र असल्यासारखा हा पाठिंबा जगासमोर मिरवला.

त्याआधी दोन दिवस मोदी इस्रायल दौऱ्यावरून परतताना नेत्यान्याहू यांना मिठी मारताना भावूक झाले होते. मुलगी सासरी जाताना वडिलांना मिठी मारते, तशी मिठी मारत होते. (Blackmailing of Modi)

मोदींना इस्रायलमध्ये एक नवीन ‘राजकीय आधार’ सापडला असून त्यासाठी त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे जुने भाषण ऐकायला हवे होते, कारण त्यातून त्यांना समजले असते की त्यांच्या पूर्वीच्या नेत्यांची इस्रायलविषयी काय भूमिका होती.

लेखक हरिशंकर परसाई यांचे वाक्य अशावेळी आठवते – “काही प्रभावशाली लोकांचे एकापेक्षा जास्त ‘बाप’ असतात.”

भारताच्या परराष्ट्र धोरणाची एक गौरवशाली परंपरा आहे. कितीही कठीण परिस्थिती आली तरी भारताने कधीही मान खाली घालून संवाद केलेला नाही.
पण एखाद्या नेत्याच्या वैयक्तिक कारणांमुळे जर तो ब्लॅकमेल होत असेल आणि त्याचे निर्णय जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाला ‘बनाना रिपब्लिक’ (कमकुवत आणि परावलंबी देश) बनवत असतील, तर देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या स्वाभिमानाला धक्का बसतो.

तरीही काही दलाल पत्रकार आणि स्वतःची बुद्धी गहाण ठेवलेले काही नागरिक असेच म्हणत राहतील—
“मोदीजींनी केले असेल तर काहीतरी विचार करूनच केले असेल.”

(लेखक हिंदीतील नामवंत पत्रकार आहेत.)

Related posts

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?

नरेंद्र मोदींना हरवता येऊ शकतं… !