Rooster Fight : कोंबड्यांच्या झुंजींवर कोटींचा सट्टा

rooster

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ अशा स्नेहपूर्ण शुभेच्छा देऊन मकर संक्रात साजरी केली जाते. गुजरातमध्ये पतंगोत्सव साजरा होतो. दक्षिणेत पोंगल साजरा करताना बैलांचा जलीकट्टू या पारंपरिक खेळांचे आयोजन केले जाते. आंध्र प्रदेशातील तीन जिल्ह्यांत मकर संक्रांतीला कोंबड्यांच्या झुंजी होतात. या झुंजीकडे आजूबाजूच्या राज्यांचेही लक्ष असते. विशेष म्हणजे क्रिकेटच्या बेटिंगप्रमाणे करोडो रुपयांचा सट्टाही या झुंजींवर लागतो. कोंबड्यांच्या झुंजींना कायद्याने बंदी असली तरी पारंपरिक उत्सव, पारंपरिक खेळ म्हणून प्रशासन त्याकडे कानाडोळा करते. या झुंजीमध्ये अत्याधुनिकता आली असून थर्ड अंपायरप्रमाणे रिप्लेचा वापरही केला जातो. (Rooster Fight)

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात काही जिल्ह्यांत तीन दिवस मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. येथे कोंबड्यांच्या झुंजींना ‘कोडी पेंडम’ या नावाने ओळखले जाते. पूर्वी गावागावांत हा पारंपरिक खेळ पाहण्यासाठी गर्दी होत असे. आता या खेळाचे स्वरुप बदलले आहे. मोठ्या मैदानावर या झुंजी होतात. मैदानावर मोठा मंडप घातला जातो. राजकीय नेतेही स्पर्धांना उपस्थिती लावतात.(Rooster Fight)

कायद्याने बंदी असलेल्या कोंबड्याच्या झुंजीवर कोटी रुपयांचा सट्टा लागतो. स्पर्धा पाहण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करावे लागते. कोंबडीच्या झुंजीवर सट्टा लावण्यासाठी राजकीय नेते, आयटी इंजीनिअर, फिल्म स्टार्स, उद्योगपतीही सहभागी होतात. काही लढतीवर २५ ते ३० लाखांच्या पैजा लागतात. घोड्याच्या रेसप्रमाणे कोणत्या कोंबड्यावर सट्टा लावायचा याचे अंदाजही बांधले जातात. गतवर्षी एका कोंबड्यावर तीन लाखाचा सट्टा लागला होता. सर्व लढतीमध्ये दोनशे ते तीनशे कोटींची उलाढाल होते. वेगवेगळे सट्टेबाज वेगवेगळ्या ठिकाणी गुप्तपणे कोंबड्यांच्या झुंजीचे आयोजन करतात. या लढतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते. झुंजी सुरु असताना कोणत्याही चुकीच्या गोष्टी होऊ नये म्हणून कॅमेरेही लावले जातात. क्रिकेट, फुटबॉलप्रमाणे रिव्ह्यूच्या नियमांचा वापरही काही ठिकाणी केला जातो.

ग्रामीण भागात मात्र खुलेआम कोंबड्यांच्या झुंजी होतात. त्या ठिकाणी झुंजीवर सट्टा लागतो. हा सट्टा लाखोंच्या घरात असतो. गोदावरी आणि कृष्णा जिल्ह्यात झुंजी लावण्यासाठी देशाच्या विविध भागातील सट्टेबाज येतात. त्याशिवाय सट्टा लावण्यासाठी आणि झुंजी पाहण्यासाठी देशभरातून लोक येतात. ग्रामीण भागात भव्य प्रमाणात झुंजीचे आयोजन करताना कोंबड्यांचे मालक, सट्टेबाज आणि झुंजी पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या वाहनांसाठी पार्किंगची मोठी सोय करावी लागते. यु ट्यूब, सोशल मीडियावर लाइव्ह प्रक्षेपण केले जाते.(Rooster Fight)

भारतामध्ये बंदी

१९६० च्या पशुक्रुरता कायद्यानुसार (प्रिव्हेंटेशन ऑफ क्रुयॅलिटी टू अनिमल अक्ट १९६०) कोंबड्यांच्या झुंजीवर बंदी आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मद्रास हायकोर्टाने कोंबड्यांच्या झुंजीवर बंदी घालण्याचे आदेश वेळोवेळी दिले आहेत. कोंबड्यांच्या झुंजीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन दक्ष असते, पण कोंबड्यांच्या झुंजीची लोकप्रियता असल्याने अनेक ठिकाणी पोलिस प्रशासन कानाडोळा करते.(Rooster Fight)

कुठून झाली सुरुवात

कोंबड्यांच्या झुंजीचा खेळ परदेशातील असून तो हळूहळू भारतात आला. इंग्लंडमध्ये राजघराण्यात हा खेळ सुरू झाला. इंग्लंडमधील अनेक राजांना या खेळाची आवड होती. भारतातही मध्ययुगीन काळात कोंबड्यांच्या झुंजीचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जात असे. महाराष्ट्रात काही ठिकाणी जत्रा आणि उरसाच्या वेळी कोंबड्यांच्या झुंजीचे आयोजन केले जाते. पण पोलिस कारवाईमुळे महाराष्ट्रात प्रमाण कमी झाले आहे. झुंजीमध्ये कोंबडे रक्तबंबाळ होतात. हल्ली काही झुंजीमध्ये कोंबड्याच्या नखांना धारदार पातीही लावतात.

कोंबड्यांचा खुराक

कोंबड्याच्या झुंजीसाठी कोंबडे तयार केले जातात. त्यांचा खुराकही असतो. त्यांना शिजवलेले अन्न, उकडलेल्या अंड्यांचे तुकडे, मटणही खायला घातले जाते. त्यांची कातडी कडक करण्यासाठी अल्कोहोल आणि अमेनियाने मालिश करतात. या कोंबड्यांचे वजन दोन ते तीन किलो असते. उंचीनेही मोठे असतात. झुंजीतील कोंबडे कापून खाल्ले जातात.

 

Related posts

Rahul Slams Modi : महागाई रोखण्यात मोदी अपयशी

Sanvidhan Bachao : काँग्रेसचे ‘संविधान वाचवा’ अभियान

Tirupati : तिरुपती मंदिरामध्ये आग