Banu Mushtaq : बानू मुश्ताक यांना प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार

Banu Mushtaq

नवी दिल्ली : भारतीय लेखिका, वकील आणि कार्यकर्त्या बानू मुश्ताक यांना त्यांच्या ‘हार्ट लॅम्प’ या कथासंग्रहासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचा बुकर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या कन्नड भाषेतील पहिल्या लेखिका ठरल्या आणि त्यांनी इतिहास रचला. (Banu Mushtaq)

हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकणारा हा पहिला लघुकथा संग्रह आहे. न्यायाधीशांनी तिच्या पात्रांचे ‘‘जगण्याची आणि लवचिकतेची आश्चर्यकारक चित्रे,’’ म्हणून कौतुक केले.

१९९० ते २०२३ दरम्यान मुश्ताक यांनी लिहिलेल्या १२ लघुकथांचा समावेश असलेला हार्ट लॅम्प हा कथासंग्रह दक्षिण भारतातील मुस्लिम महिलांचे कष्ट आणि यातनांचे मार्मिक दर्शन घडवतो. (Banu Mushtaq)

या कथा कन्नडमधून इंग्रजीत अनुवादित करण्यात आल्या आहेत. दीपा भास्थी यांनी त्यांचे भाषांतर केले आहे. या ५० हजार पौंडच्या पुरस्कारातील रक्कम त्यांनाही विभागून देण्यात येईल.

वाचकांनी आपल्या शब्दांना त्यांच्या हृदयात स्थान दिल्याबद्दल मुश्ताक यांनी वाचकांचे आभार मानले.

‘‘कोणतीही कथा कधीही लहान नसते या विश्वासातून हे पुस्तक जन्माला आले आहे,’’अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

‘‘ज्या जगात आपल्यात अनेकदा फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो, तिथे साहित्य हे शेवटचे पवित्र स्थान आहे जिथे आपण एकमेकांच्या मनात राहू शकतो, अगदी काही पानांसाठीच का होईना,’’ असे त्या पुढे म्हणाल्या. (Banu Mushtaq)

‘हार्ट लॅम्प’च्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय बुकर जिंकणाऱ्या दीपा भास्थी या पहिल्या भारतीय अनुवादक ठरल्या आहेत. त्या म्हणाल्या की, या विजयामुळे कन्नड आणि इतर दक्षिण आशियाई भाषांमधून आणि त्यामधील अधिक भाषांतरांना प्रोत्साहन मिळेल अशी आशा आहे.

बानू मुश्ताक यांच्याविषयी…

मुश्ताक कर्नाटक राज्यातील हसन या शहरात मुस्लिम वस्तीत वाढल्या. त्यांच्या आजूबाजूच्या असलेल्या बहुतेक मुलींप्रमाणे त्यांनीही शाळेत उर्दू भाषेतून कुराण शिकले. (Banu Mushtaq)

त्यांचे वडील सरकारी कर्मचारी होते. त्यांनी त्यांना चांगले शिक्षण द्यायचे होते. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी मुश्ताक यांना एका कॉन्व्हेंट शाळेत दाखल केले. तिथेही शिक्षणाचे माध्यम राज्याची अधिकृत भाषा – कन्नड होती.

मुश्ताक बानू यांनी कन्नड अस्खलित होण्यासाठी कठोर परिश्रम केले. ही भाषाच त्यांनी साहित्यिक अभिव्यक्तीसाठी निवडली.

शाळेत असतानाच त्यांनी लिहायला सुरुवात केली. त्यांच्या समवयस्कांचे लग्न झाले. संसार आणि मुलाबाळांत रमले. मुश्ताक यांनी मात्र  महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या कथा प्रकाशित व्हायला अनेक वर्षे लागली.

२६ व्या वर्षी त्यांनी त्यांच्या पसंतीच्या तरुणासोबत लग्न केले. त्यानंतर एका वर्षानंतर एका स्थानिक मासिकात त्यांची कथा प्रकाशित झाली. त्यांचा लग्नाच्या सुरुवातीच्या काळातही संघर्ष आणि कलहांनी भरलेला होता. याबद्दल त्या अनेक मुलाखतींमध्ये उघडपणे बोलल्या आहेत. (Banu Mushtaq)

बानू मुश्ताक यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू

हार्ट लॅम्पमधील कथांमधील त्यांची स्त्री पात्रे प्रचंड कष्ट, संघर्ष आणि प्रतिकार करणारी आहेत. महिलांच्या लढाऊ बाणा आणि त्यांच्या भावनांचे प्रतिबिंब यात दिसते.

‘‘भारतीय साहित्याच्या मुख्य प्रवाहात, मुस्लिम महिलांना अनेकदा रूपकांमध्ये गुंतवले जाते. मुश्ताक दोन्ही नाकारतात. त्यांची पात्रे सहनशील आहेत, जीवनात वाटाघाटी करणारी आहेत, त्यातून ती कधीकधी मागे हटतात. वृत्तपत्रातील मथळ्याच्या अट्टहासापोटी नव्हे, तर संघर्ष करत करत ती जीवनाला सामोरी जातात,’’ असे इंडियन एक्स्प्रेसने म्हटले आहे.

मुश्ताक यांनी एका प्रमुख स्थानिक टॅब्लॉइड वृत्तपत्रातही रिपोर्टर म्हणून काम केले. तसेच साहित्य आणि सक्रियतेद्वारे सामाजिक आणि आर्थिक शोषणाविरूद्ध लढणाऱ्या बंदाया चळवळीच्याही त्या सक्रीय कार्यकर्त्या होत्या.

एक दशकानंतर पत्रकारिता सोडून त्यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी वकिली सुरू केली. (Banu Mushtaq) अनेक दशकांच्या त्यांच्या ऐतिहासिक कारकिर्दीत, त्यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या नावावर सहा लघुकथा संग्रह, एक निबंध संग्रह आणि एक कादंबरी आहे, त्यांच्या परखड लेखनामुळे त्यांना अनेकांच्या द्वेषाचे धनीही व्हावे लागले.

Related posts

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या स्थानी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर