कोचिंग क्लासेसच्या फसव्या जाहिरातींवर बंदी

नवी दिल्लीः केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कोचिंग सेंटरद्वारे जारी केलेल्या दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या जाहिरातींवर बंदी घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना जाहिरातींद्वारे दिशाभूल करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून वाचवणे हा आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय, लालबहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्ली, कायदा संस्था आणि उद्योग संघटना यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्यात आली होती.

समितीने निर्णय घेतला आहे, की कोचिंग सेंटर्सने जारी केलेल्या जाहिरातींमध्ये विद्यार्थ्यांची दिशाभूल होऊ शकेल असे कोणतेही दावे नसावेत. आता या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे सर्व कोचिंग सेंटरसाठी अनिवार्य असेल. कोणत्याही कोचिंग सेंटरने या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. ऑफर केलेले अभ्यासक्रम, त्यांचा कालावधी, विद्याशाखा पात्रता, फी आणि परतावा धोरणे, निवड दर, यशोगाथा, परीक्षा क्रमवारी आणि नोकरी सुरक्षा आश्वासने यांचा त्यात समावेश आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये हमखास प्रवेश किंवा पदोन्नतीसंदर्भातील अशा सर्व जाहिरातींवर आता बंदी घालण्यात आली आहे. कोचिंग संस्थांनी गुणवत्तेची अतिशयोक्ती न करता त्यांच्या पायाभूत सुविधा, संसाधने आणि सुविधांचे अचूक वर्णन केले पाहिजे. विद्यार्थ्यांची लेखी परवानगी मिळाल्याशिवाय, कोचिंग सेंटर विद्यार्थ्यांचे नाव, फोटो किंवा त्यांना मिळालेले कोणतेही प्रमाणपत्र जाहिरातीत वापरू शकत नाही आणि विद्यार्थ्याची कोणत्याही परीक्षेत निवड झाल्यानंतर ही संमती घेतली जाईल. प्रवेशादरम्यान विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारच्या दबावापासून संरक्षण करणे, हाही त्याचा उद्देश आहे.

कोचिंग सेंटर्सना जाहिरातीत विद्यार्थ्याच्या छायाचित्रासह नाव, रँक आणि कोर्स अशी महत्त्वाची माहिती द्यावी लागेल. त्या अभ्यासक्रमासाठी यशस्वी विद्यार्थ्याने किती फी भरली हेदेखील नमूद करावे लागेल. फाइन प्रिंटमुळे विद्यार्थ्यांची दिशाभूल होणार नाही, याची खात्री करण्यासाठी ही सर्व माहिती मोठ्या अक्षरात द्यावी लागेल. जागांची कमतरता, वेळ कमी, आजच प्रवेश घ्या अशा जाहिरातींवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. कोचिंग सेंटर्स अशा जाहिराती प्रसिद्ध करण्यापूर्वी पूर्ण पारदर्शकता ठेवतील.

ज्यात कमी जागा किंवा कमी वेळ सांगून विद्यार्थ्यांना लवकर प्रवेश घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. कोचिंग सेंटर्सना राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनशी जोडावे लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि अनुचित व्यापार पद्धतींबद्दल माहिती देणे किंवा तक्रारी नोंदवणे सोपे होईल. कोणत्याही कोचिंग सेंटरने या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास, ग्राहक संरक्षण कायदा २०१९ च्या तरतुदींनुसार त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. केंद्रीय प्राधिकरणास दंड आकारणे, जबाबदारी सुनिश्चित करणे आणि अशा फसव्या पद्धतींच्या घटना रोखणे यासह गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार असतील. या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश विद्यार्थ्यांचे शोषण रोखणे आणि खोटी आश्वासने आणि खोट्या जाहिराती देऊन विद्यार्थ्यांची दिशाभूल होणार नाही किंवा कोचिंग संस्थेला मान्यता देण्यासाठी विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव टाकला जाणार नाही, याची खात्री करणे हा आहे.

कोचिंग संस्थांना ५५ लाखांचा दंड

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कोचिंग सेंटर्सच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर स्वतःहून कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत वेगवेगळ्या कोचिंग सेंटर्सना ४५ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर १८ कोचिंग संस्थांना ५४ लाख ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, त्यांना दिशाभूल करणाऱ्या जाहिराती बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Related posts

pooja khedkar: पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Sheikh Hasina : शेख हसीनांना आमच्याकडे सोपवा

Rahul gandhi : सोमनाथची पोलिसांकडूनच हत्या