मुंबई वृत्तसंस्था : अनिल धीरुभाई अंबानी ( Anil Ambani ) समूहाच्या ‘रिलायन्स एनर्जी पॉवर’ या कंपनीने ‘सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ला (एसईसीआय) बनावट बँक गॅरंटी देण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. त्यानंतर ‘सेकी’ने रिलायन्स पॉवर आणि तिची उपकंपनी ‘रिलायन्स एनयू बेस’ ला निविदा प्रक्रियेत भाग घेण्यापासून बंदी घातली आहे. ही बंदी ३ वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे.
Anil Ambani : बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम
‘सेकी’ च्या वतीने २००० मेगावॉट क्षमतेची ‘बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम’ उभी करायची आहे. त्यासाठी ‘रिलायन्स एनयू बेस’ ने निविदा भरली होती; पण ही निविदा भरताना दिलेली बँकहमी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ‘सेकी’ने या कंपनीवर तसेच ‘रिलायन्स पॉवर’ या कंपनीवर निर्बंध लादल्याची घोषणा केली. ‘सेकी’चे म्हणणे आहे, की या कंपनीने निविदांच्या नियमांचे उल्लंघन केलेले आहे. त्यामुळे भविष्यातील निविदा प्रक्रियेत कंपनीला भाग घेण्यास बंदी घातली आहे. या निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक क्षमता ‘रिलायन्स एनयू बेस’ला मातृ कंपनी असलेल्या ‘रिलायन्स पॉवर’कडून मिळाली होती. त्यामुळे ‘रिलायन्स एनयू बेस’ कंपनीने घेतलेले धोरणात्मक निर्णय हे मूलतः मातृ कंपनीचे होते. त्यामुळे ‘रिलायन्स पॉवर लिमिटेड’ या कंपनीवरही भविष्यातील निविदा प्रक्रियेत भाग घेण्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘रिलायन्स पॉवर लिमिटिडे’ने हा निर्णय अनुचित असल्याचे म्हटले आहे. कंपनी या निर्णयाला आव्हान देणार आहे. रिलायन्स पॉवर आणि त्याच्या सहकंपनीने प्रामाणिक काम केले आहे. आमची कंपनीच धोक्याचा बळी ठरली आहे. कथित बनावट बँक हमीची व्यवस्था करणाऱ्या संस्थेविरोधात १६ ऑक्टोबरला पोलिसांत तक्रार दिली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा