Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

संभल : उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील चंदौसी शहरामध्ये सुरू असलेल्या उत्खननात १५० वर्षांपूर्वीची विहीर आढळली आहे. त्याचप्रमाणे, बांके बिहारी मंदिराला जोडणारे भुयारही उत्खननात सापडले असून त्याचा वापर १८५७ च्या उठावामध्ये झाल्याचे सांगितले जाते. (Sambhal)

चंदौसीमधील लक्ष्मणगंज भागामध्ये शनिवारपासून उत्खननास सुरुवात झाली. रविवारी या उत्खननामध्ये सुमारे १५० वर्षांपूर्वीची बारव प्रकारातील विहीर आढळली. रविवारी जिल्हाधिकारी राजेंदर पेन्सिया आणि पोलिस अधीक्षक क्रिशन कुमार बिश्नोई यांनी या उत्खननस्थळाची पाहणी केली. महसूल खात्याच्या दस्तावेजांमध्ये या ठिकाणी ४०० चौरस मीटर जागेत बारव असल्याचे सूचित करण्यात आले आहे. त्याची नोंदणी ‘तळे’ अशी करण्यात आल्याची माहिती पेन्सिया यांनी दिली. बांके बिहारी मंदिरापासून नजीकच ही बारव आहे. (Sambhal)

या विहिरीचे बांधकाम बिलारीच्या राजघराण्याच्या कालखंडामध्ये करण्यात आल्याचे स्थानिक सांगतात. तीन स्तरांमध्ये बांधण्यात आलेल्या या विहिरीचे खालचे दोन स्तर संगमरवरी असून सर्वांत वरच्या स्तराचे बांधकाम विटांचे आहे. येथे चार भूमिगत खोल्याही आहेत. या विहिरीपासून बांके बिहारी मंदिरापर्यंत जाणारे भुयारही उत्खननात सापडले. या भुयाराचा वापर १८५७ च्या उठावामध्ये क्रांतिकाऱ्यांनी केल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते. ब्रिटीश राज्यकर्ते उठाव दडपण्याच्या प्रयत्नात असताना क्रांतिकाऱ्यांनी या भुयाराचा व भूमिगत खोल्यांचा वापर पळून जाण्यासाठी केला होता. (Sambhal)

“बांके बिहारी मंदिराचे पुनरुत्थान व नुतनीकरण करण्यात येईल व मंदिराच्या आसपासची अतिक्रमणे हटवण्यात येतील. या वास्तूचा कालखंड निश्चित करण्यासाठी गरज भासल्यास पुरातत्व खात्याचीही (एएसआय) मदत घेण्यात येईल,” असे पेन्सिया यांनी नमूद केले. (Sambhal)

हेही वाचा :

Related posts

अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित