Home » Blog » लोकशाही टिकवण्यासाठी टोकाचा संघर्ष करावाच लागेल

लोकशाही टिकवण्यासाठी टोकाचा संघर्ष करावाच लागेल

डॉ. विजय चोरमारे यांना भाई माधवराव बागल पुरस्कार प्रदान

by प्रतिनिधी
0 comments
An extreme struggle will be absolutely necessary to preserve democracy

कोल्हापूर : प्रतिनिधी : आपली लोकशाही अतिदक्षता विभागात आहे. घटनात्मक संस्था सरकारच्या बटिक झाल्या आहेत. न्यायव्यवस्थेने सत्तेपुढे शरणागती पत्करली आहे. केवळ सोशल मिडियावर संताप व्यक्त करुन चालणार नाही तर लोकशाही टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरून टोकाचा संघर्ष करावा लागेल. या लढाईचे नेतृत्व करण्याची क्षमता कोल्हापूरमध्ये आहे `, असे मत महाराष्ट्र दिनमानचे मुख्य संपादक डॉ. विजय चोरमारे यांनी व्यक्त केले. भाई माधराव बागल विद्यापीठाच्यावतीने देण्यात येणा-या भाई माधवराव बागल पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. (Madhavrao Bagal Award ceremony)

भाई माधवराव बागल विद्यापीठाच्यावतीने विजय चोरमारे यांना शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते भाई माधवराव बागल पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, मानचिन्ह, रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी डॉ. चोरमारे यांच्या पत्नी अस्मिता चोरमारे, बागल विद्यापीठाचे अध्यक्ष अशोकराव साळोखे, कार्याध्यक्ष टी.एस.पाटील, कॉ. चंद्रकांत यादव, तनुजा शिपुरकर, रवी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. (Madhavrao Bagal Award ceremony)

बाबासाहेबांचा पहिला पुतळा

सत्कारानंतर डॉ. चोरमारे यांनी भाई माधवराव बागल यांचे मोठेपण अधोरेखित केले. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे थोरपण सर्वात आधी जाणणारे भाई माधवराव बागल होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत त्यांचा जगातील पहिला पुतळा उभारणाऱ्या भाई बागलांची दुरदृष्टी दिसून येते. प्रबोधन परंपरेतील एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. ते तत्वनिष्ठ होते. राजर्षी शाहू महाराजांच्यानंतर कोल्हापूरचे आणि महाराष्ट्राचे तोलामोलाचे व्यक्तीमत्व असलेल्या भाई माधवराव बागल यांच्या नावाने दिलेला पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे.

कोल्हापूरच्या कालखंडातील चार टप्पे डॉ.चोरमारे यांनी विषद केले.  राजर्षी शाहू महाराजांच्या आधी १७६० मध्ये करवीरकर महाराणी जिजाबाई यांनी करवीरचे राज्य जप्त करायला आलेल्या पेशव्यांच्या सैन्याचा धुव्वा उडवला. करवीर राज्यावर आलेले संकट परतावून लावले. कोल्हापुरलाही पेशव्याचे पाय लागले असते तर पुढचा सगळा इतिहास बदलला असता. राजर्षी शाहू महाराजही झाले नसते आणि कोल्हापूर ही महाराष्ट्राची पुरोगामी राजधानी असलेली ओळख राहिली नसते याकडे त्यांनी लक्ष वेधले. (Madhavrao Bagal Award ceremony)

कोल्हापूरचा दुसरा टप्पा शाहू महाराजांचा तर तिसरा टप्पा भाई माधवराव बागल यांचा होता. त्यानंतर एन.डी.पाटील आणि गोविंदराव पानसरे यांचा चौथा टप्पा होता हे सांगून चोरमारे यांनी गोविंदराव पानसरे, एन.डी.पाटील यांच्यानंतर कोल्हापूर नेतृत्वहीन झाल्यासारखे वाटले.  पण इंद्रजीत सावंत आणि अलिकडे प्रशांत आंबी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निमित्ताने कोल्हापूरकरांनी जो प्रतिकार केला त्यात कोल्हापूरची ही जिद्द दिसून आले. या जिद्दीलाच संघटित स्वरुप येण्याची आवश्यकता चोरमारे यांनी बोलून दाखवली.  

भाई बागल यांचे विचार समजून घेण्याची गरज

अध्यक्षीय भाषणात शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, आपण सर्व पुरोगामी चळवळीचे सहप्रवासी आहोत. इथे भाई माधवराव बागल यांच्या विचारांच्या परंपरेचा, संघर्षाचा गौरव करण्यासाठी आलो आहोत. भाई बागल यांचे विचार समजून घेण्याची आजच्या काळात गरज आहे. भाई बागल यांच्या कार्यबद्दल डॉ. साळुंखे यांनी बागल यांच्या व्यक्तीमत्वाचे पैलू उलगडून दाखवले. भाई बागलांनी सत्यशोधक चळवळीतील सामाजिक क्षमता, गांधीवादातील नैतिकता, मार्क्सवादातील सर्वसामान्यांचे आर्थिक स्थान आत्मसात केले होते. भाई बागल यांनी आपले कार्य हे महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारसरणीला श्रद्धा ठेऊन केले. त्यांनी जातिव्यवस्थेला प्रखर विरोध केला. सामाजिक न्यायासाठी अखेरपर्यंत ते कार्यरत राहिले.

बागल विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. टीएस.पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अनिल घाटगे यांनी केले तर आभार रवी जाधव यांनी मानले. यश आंबोळे यांनी भाई बागल वंदन गीत आणि साने गुरुजींचे ‘आता उठवू सारे रान, आता उठवू पेटवू सारे रान’ ही गीते सादर केली. (Madhavrao Bagal Award ceremony)

कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी. पी. साबळे, डॉ. भालबा विभूते, शामरावअण्णा पाटील, डॉ. राजन गवस, श्रीमती वसुधाताई जयसिंगराव पवार, सुरेश शिपूरकर, डॉ. गौतमीपुत्र कांबळे, कृष्णात खोत, भीमराव धुळुबुळू, डॉ. विनोद कांबळे, नामदेव माळी, आलोक जत्राटकर, प्रा. अनिल भीमराव पाटील, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, संजय पाटोळे, मनोज साळोखे, विश्वास पाटील, जयसिंग पाटील, शिवाजी पाटील, शिवराज काटकर, प्रवीण शिंदे, वसंतराव मुळीक, संभाजी बिरांजे, सारीपुत्र तुपेरे, एकनाथ पाटील, श्यामसुंदर मिरजकर, धर्मवीर पाटील, डॉ. अभय जाधव, प्रा. जे. के. पवार, डॉ. जी. पी. माळी, डॉ. पी. जी. कुलकर्णी आदी विविध क्षेत्रातील नामवंतांची उपस्थिती होती.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00