नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हळहळला आहे. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रद्धाजंली वाहिली. सोशल मिडियावर श्रद्धाजंली वाहताना पंतप्रधान मोदी यांनी अजित पवारांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत या दु:खाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबियांना शक्ती, धैर्य मिळो अशी भावना व्यक्त केली आहे.
तळागाळाशी मजबूत नाळ असलेले नेते : नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करताना असे म्हटले आहे की , “महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामुळे मी अत्यंत दुःखी आहे. या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबांना शक्ती आणि धैर्य मिळो, ही प्रार्थना करतो. अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना.” असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. (President Murmu, Prime Minister Modi pay tribute to Ajit Pawar)
सहकारातील योगदान कायम स्मरणात राहील : द्रोपदी मुर्मु
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी अजित पवारांच्या निधनाबद्दल श्रद्धाजंली वाहिली. त्यांनी शोकसंदेशात असे म्हटले आहे की, “महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक जणांच्या मृत्युची बातमी ऐकून खूप दुःख झाले आहे. अजित पवार यांचे अकाली निधन हे एक कधीही भरून न येणारे नुकसान आहे. महाराष्ट्राच्या विकासात, खासकरून सहकार क्षेत्रात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ते नेहमीच स्मरणात राहतील. मी त्यांच्या कुटुंबियांना, समर्थकांना आणि चाहत्यांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबियांनाही देव हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.” असे म्हणत आदरांजली वाहिली आहे. (President Murmu, Prime Minister Modi pay tribute to Ajit Pawar)
महाराष्ट्राच्या राजकारणातील अढळ स्थान : नितीन गडकरी
“महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक, दुर्दैवी आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. गेली अनेक वर्षं राज्याच्या विधिमंडळात सोबत काम करताना अजितदादांशी अतिशय जवळचा संबंध राहिला आहे. त्यांचे प्रशासनिक कौशल्य, विकासात्मक दृष्टिकोन आणि लोकांना जोडण्याची हातोटी यांमुळे अजितदादांचे कायमच महाराष्ट्राच्या राजकारणात एक अढळ स्थान राहिले आहे. महाराष्ट्राच्या विकासाची आकांक्षा असलेल्या या लोकनेत्याचे अकाली निधन होणे, ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची कधीही भरून न निघणारी हानी आहे. या दुःखद प्रसंगी संपूर्ण पवार कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो.” अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. (President Murmu, Prime Minister Modi pay tribute to Ajit Pawar)