Home » Blog » Pandharpur Vari : हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा

Pandharpur Vari : हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा

by प्रतिनिधी
0 comments
Pandharpur Vari

पंढरपूरची वारी का करतात ?  का करायची ? कोणत्या ओढीनं, चालत, मिळेल त्या वाहनानं, महिनाभर कधी जसा वेळ उपलब्ध असेल तसा दोन पावले का असेना वारीत सहभागी होणं  हा खरंच कुतूहलाचा, पण मनाच्या गाभाऱ्यातून विचारला जाणारा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर फक्त भक्ती, परंपरा किंवा श्रद्धा यापुरतं मर्यादित नाही.  त्यामागे अनेक मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि भावनिक स्तर गुंतलेले आहेत. पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ ही  एक आत्मिक आकर्षण असते. (Pandharpur Vari)

  • दीपक कुंभार

वारी करणाऱ्यांसाठी विठोबा म्हणजे केवळ एक देव नव्हे, तर तो ‘आपला’ आहे – आई, वडील, सखा, प्रिय. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी शरीराने चालावं लागतं, पण प्रत्यक्षात मनाची यात्रा होते. संत तुकाराम म्हणतात, ‘‘हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा.’’  वारी म्हणजे हेच विसरवू न देणारी एक सातत्यपूर्ण आठवण.

पंढरपूरला अनेक वारकरी माहेर म्हणतात. ही संकल्पना इतकी उत्कट आहे की जशी एक मुलगी सासरी सर्व जबाबदाऱ्या पार पाडून आईच्या घरी परतते, तसाच वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी शुद्ध अंतःकरणाने आणि ओढीने वारीला निघतो. संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे, ‘भेटेन माहेरा आपुलिया.’ माहेरासारखी भावना, प्रेमाचं आणि आपुलकीचं ठिकाण म्हणजे पंढरपूर. वारीमध्ये चालता बसता, मुक्कामाच्या ठिकाणी अनेक स्त्रिया पांडुरंगाला आपला भाऊ, आई मानून ओव्या गात असलेल्या दिसून येतात. (Pandhapur Vari)

वर्षभर दैनंदिन कामं, जबाबदाऱ्या, ताण-तणाव सहन केल्यानंतर वारी हे एक प्रकारचं ‘मनाचं डिटॉक्स’ आहे. कुठलाही दिखावा नाही, मोबाईल नाही, ऑफिस नाही. फक्त विठ्ठलाचं नामस्मरण आणि पायपीट. यातून मनाला शांती, स्थैर्य आणि स्वतःच्या अंतरात्म्याशी संवाद साधण्याची संधी मिळते. जीवनशैलीतील विश्रांती हा आत्मशुद्धीचा मार्ग असतो. (Pandhapur Vari)

वारीत जात-पात, श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरुष असा कोणताही भेदभाव राहत नाही. सगळे एकत्र चालतात, एकच अभंग म्हणतात. वारीतून संतांनी सांगितलेली समता आणि बंधुभाव प्रत्यक्ष अनुभवता येतो . ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ,’ ही शिकवण इथे चालत चालत अंगवळणी पडते.

वारी म्हणजे रोज १५-२० किलोमीटर चालणं, पावसात, उन्हात, चिखलात, पण त्यात तक्रार नाही. या अनुभवातून संयम, सहकार्य, त्याग, आणि निसर्गाशी सहजीवन शिकता येतं. निसर्गाशी नातं जोडता येतं. हे शिक्षण कुठल्याही विद्यापीठात मिळत नाही. वारी म्हणजे संतांची शिकवण अनुभवणं. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, ते संत निळोबा पर्यंत सर्व संतांचे  विचार केवळ वाचले जात नाहीत, तर चालताना गायले जातात, मनात रुजवले जातात. वारकरी ‘ज्ञानोबा तुकाराम,’ असा गजर करत संतांच्या पावलांवर चालणारे लोक असतात.

वारीमध्ये ना पैसे लागतात, ना प्रसिद्धी. फक्त श्रद्धा आणि चालायची तयारी लागते. यामुळेच ती एका खऱ्या, प्रामाणिक भावनेतून केलेली यात्रा ठरते. कोणत्याही कृत्रिमतेपासून दूर राहून आत्मानुभवाचा प्रवास म्हणजे वारी.

वारी  मनाला विठोबाशी जोडते, समाजाशी एकरूप करते, मनाच्या कोपऱ्यात दडलेलं शांततेचं पाणी उगाळून वर आणते. ती केवळ चालण्याची क्रिया नसून, आत्म्याशी संवाद साधण्याची प्रक्रिया आहे. (Pandhapur Vari)

‘पायी चाललो पंढरीकडे, पण मनात वाट होती अंतरीकडे!’ वारी का करावी हे समजून घ्यायचं असेल, तर एकदाच स्वतः अनुभवून बघा. मग ‘जाणं’ आणि ‘पोहोचणं’ यातला फरकही हरवून जाईल. पंढरपूर वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा एक अमूल्य ठेवा आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी प्रवास करतात. वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून, ती एक जीवनशैली आहे. भक्ती, समानता, संयम आणि शिस्तीचे मूर्त रूप म्हणजे वारी.

वारीची परंपरा ८०० वर्षांहून अधिक जुनी आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांसारख्या संतांनी तिचे आध्यात्मिक अधिष्ठान घातले. विठोबा हे ‘ज्ञान व आकार’ यांचे प्रतीक मानले जातात, आणि वारीचा उद्देश आत्मज्ञानाकडे नेणारा असतो. ‘माझं काही नाही, सगळं विठोबाचं,’ या भावनेने वारकरी आपली अहंता विसरतो आणि भक्तीमध्ये लीन होतो.

१६८५ मध्ये नारायण बाबांनी तुकाराम महाराजांच्या पादुकांसह पालखी सोहळ्याची सुरुवात केली. त्यानंतर हैबतरावबाबांनी १८२० च्या सुमारास वारीला अधिक संघटित स्वरूप दिले. यामुळे वारी केवळ वैयक्तिक भावना न राहता, एक मोठी लोकचळवळ झाली. वारीत जात, धर्म, लिंग याचे बंधन नाही. प्रत्येकजण एकच गजर करतो- ‘ज्ञानोबा तुकाराम.’ वारीमुळे समता, बंधुभाव आणि सहजीवन या मूल्यांची शिकवण मिळते. टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंग आणि कीर्तनांमधून भक्तीचा अनुभव घेत वारकरी आपली श्रद्धा व्यक्त करतात. वारीतील रिंगण, अश्वांची दौड, उडीचा खेळ अशा पारंपरिक उपक्रमांतून आनंद, शिस्त आणि भक्ती यांचा संगम दिसतो. आजही वारीमधून पर्यावरण जतन, व्यसनमुक्ती, स्वच्छता यांसारखे सामाजिक संदेश दिले जातात. वारी ही काळाच्या कसोटीत टिकलेली, पिढ्यानपिढ्या समतेचा, भक्तीचा आणि संस्कृतीचा धागा जपणारी एक प्रेरणादायी परंपरा आहे. ही केवळ पायी यात्रा नसून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा ध्वज आहे. (Pandhapur Vari)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00