Home » Blog » अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर

by प्रतिनिधी
0 comments
Anant Dixit Award Announced for P. Sainath

कोल्हापूर : प्रतिनिधी : जेष्ठ संपादक अनंत दीक्षित स्मृती समितीच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार ज्येष्ठ संपादक पी. साईनाथ आणि मोहन मस्कर स्मृती पुरस्कार मुंबई तकचे पत्रकार अभिजीत करंडे यांना सोमवारी जाहीर झाला. अनुक्रमे २५ हजार आणि ११ हजार रुपये, गौरवचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरुप आहे. कोल्हापुरात ६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता शाहू स्मारक भवनात पुरस्कारांचे शानदार सोहळ्यात वितरण होणार असल्याची माहिती समितीच्यावतीने जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे, आदिनाथ चव्हाण यांनी दिली.

खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान समारंभ होईल. पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी हे दोन पुरस्कार देण्यात येतात. ज्येष्ठ संपादक दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारिता केलेल्या विजय चोरमारे, आदिनाथ चव्हाण, सम्राट फडणीस, विश्वास पाटील, राध्येशाम जाधव, धनंजय बिजले आदींनी एकत्र येऊन त्यांच्या स्मृती जपण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. (Anant Dixit Award Announced for P. Sainath)

दिवंगत मोहन मस्कर हे नव्या पिढीतील आश्वासक पत्रकार होते. ग्रामीण पत्रकारितेमध्ये त्यांनी मौलिक काम केले. त्यांचीही स्मृती यानिमित्ताने जपण्यात येत आहे. प्रतिवर्षी एका ज्येष्ठ पत्रकारास संपादक अनंत दीक्षित यांच्या नावाने आणि आश्वासक पत्रकारास मोहन मस्कर यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो. यंदा पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे. गतवर्षी ज्येष्ठ संपादक कुमार केतकर आणि नव्या पिढीतील व्यंगचित्रकार आलोक यांना सन्मानित करण्यात आले होते.

पी. साईनाथ हे सुमारे साडेचार दशकांहून अधिक काळ पत्रकारितेमध्ये आहे. ‘द हिंदू’ या दैनिकाचे ते ग्रामीण विभागाचे संपादक होते. शेती आणि शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था, जातवास्तव हे त्यांच्या आस्थेचे विषय आहेत. ‘इव्हरीबडी लव्हज् अ गुड ड्रॉट’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध असून ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ हा त्याचा मराठी अनुवादही वाचकप्रिय ठरला आहे. रेमन मॅगेसेसे पुरस्कारासह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. (Anant Dixit Award Announced for P. Sainath)

पीपल्स अर्काईव्ह  ऑफ रुरल इंडिया (परी) या डिजिटल प्लॅटफॉर्मचे ते संस्थापक असून त्यामार्फत आर्थिक विषमता, ग्रामीण भागातील प्रश्न, गरिबी, शेतक-यांच्या समस्या आदी विषयांची मांडणी करीत असतात.

अभिजीत करंडे हे गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारितेमध्ये असून सध्या इंडिया टुडे ग्रूपच्या मुंबई तक` या डिजिटल वाहिनीवर संपादक (अन्सानमेंट) आहेत. त्यांनी यापूर्वी एबीपी माझा` या वृत्तवाहिनीसाठीही काम केले आहे. वर्तमान प्रश्नांना थेट भिडतानाच सत्तेला प्रश्न विचारणा-या मोजक्या पत्रकारांमध्ये त्यांचा समावेश होतो. या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. (Anant Dixit Award Announced for P. Sainath)

You may also like

error: Content is protected !!