राहुलला खेळवायचे कुठे?

अडलेड, वृत्तसंस्था : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील अडलेड येथील दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघ कॅनबेरा येथे दोन दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा खेळणार खेळणार असल्याने त्याच्या अनुपस्थितीत सलामीला खेळलेला लोकेश राहुल कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करेल, हा प्रश्न संघव्यवस्थापनास सोडवावा लागणार आहे.

या मालिकेतील पर्थ येथे रंगलेल्या पहिल्या कसोटीत रोहित शर्मा खेळला नव्हता. त्यामुळे राहुलने सलामीस खेळताना दोन्ही डावांत अनुक्रमे २६ आणि ७७ धावा केल्या. परिणामी, पुढील कसोटीसाठी त्याचे संघातील स्थान निश्चित मानले जात आहे. तथापि, रोहित सलामीला खेळल्यास राहुलला कोणत्या क्रमांकावर खेळवावे, हा संघव्यवस्थापनासमोरील प्रश्न आहे. राहुल देवदत्त पडिक्कलऐवजी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येऊ शकतो. तथापि, सध्या अंगठा फ्रॅक्चर झाल्यामुळे संघाबाहेर असणारा भारताचा फलंदाज शुभमन गिल हा वेळेत तंदुरुस्त झाल्यास त्याचाही समावेश पुढील कसोटीसाठी अंतिम अकरामध्ये करण्यात येईल. गिल सामान्यतः तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करत असल्यामुळे मग राहुलला ध्रुव जुरेलच्या जागी सहाव्या स्थानी खेळवले जाऊ शकते.

दरम्यान, राहुलला सलामीस कायम ठेवून रोहितने मधल्या फळीत पाचव्या किंवा सहाव्या स्थानी फलंदाजीस यावे, असाही एक मतप्रवाह आहे. अडलेड कसोटी दिवस-रात्र असल्याने रोहित मधल्या फळीत खेळल्यास तो प्रकाशझोतात फलंदाजीस येईल व त्याचा फायदा त्याला धावा करण्यासाठी होऊ शकतो. कॅनबेरा येथील सराव सामनासुद्धा गुलाबी चेंडूवर येणार असल्यामुळे त्या सामन्यात रोहित कोणत्या क्रमांकावर फलंदाजीस येतो, यावर पुढील कसोटीतील राहुलच्या फलंदाजी क्रमाचा निर्णय अवलंबून असेल. नितीश रेड्डीने पर्थ कसोटीमध्ये गोलंदाजी व फलंदाजीत चमक दाखवली असल्यामुळे पुढील कसोटीसाठी त्याचे संघातील स्थान पक्के आहे.

गंभीर अनुपस्थित

कॅनबेरा येथे ३० नोव्हेंबरपासून रंगणाऱ्या दोनदिवसीय सराव सामन्यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर अनुपस्थित असणार आहेत. गंभीर यांनी वैयक्तिक कारणांस्तव काही दिवस सुट्टी घेतली असून अडलेड येथे ६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पुढील कसोटीपूर्वी ते संघामध्ये रुजू होतील, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांकडून मिळाली.

ऑस्ट्रेलिया संघात बदल नाही

पर्थ कसोटीत भारताकडून दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतरही पुढील अडलेड कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याची माहिती संघाचे प्रशिक्षक आणि निवडकर्ते अँड्य्रू मॅक्डोनाल्ड यांनी दिली. पर्थ कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाने १३ खेळाडूंचा संघ जाहीर केला होता. त्यापैकी, फलंदाज जोश इंग्लिस व वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंड यांना अंतिम संघात स्थान मिळाले नव्हते. ऑस्ट्रेलिया संघातील मिचेल मार्शच्या फिटनेसविषयी चिंता व्यक्त करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, ‘सध्या आम्ही थांबा आणि वाट पाहा हे धोरण स्वीकारले आहे. अंतिम संघनिवडीचा निर्णय कसोटीच्या एक दिवस आधी घेतला जाईल,’ असे मॅक्डोनाल्ड म्हणाले.

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत