मुंबई : प्रतिनिधी : दुष्काळ संहितेत ‘ओला दुष्काळ’ हा शब्द कोठेही नाही असे स्पष्ट करत ओला दुष्काळाची मागणी फेटाळून लावणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्ष नेते असताना ओल्या दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. २०२० मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणारे पत्र समोर आले आहे. त्यामुळे विद्यमान भाजप महायुती सरकारची चांगलीच गोची झाली आहे. (Wet drought)
मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने विरोधी पक्षांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ संहितेत ‘ओला दुष्काळ’ कुठेही नाही असे सांगत, ओला दुष्काळाची मागणी पुरती फेटाळून लावली. पण फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. यासंबंधीचे पत्र आता समोर आले आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यामुळे विरोधी पक्षनेते असताना ओला दुष्काळ ही संकल्पना होती का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Wet drought)
विरोधी पक्षेनेते असताना फडणवीस यांनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १६ ऑक्टोबर २०२० रोजी पत्र लिहिले होते. या पत्राचा विषयच होता की, परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत, आता तरी केवळ घोषणा न करता तातडीने थेट मदत द्यावी. विरोधी पक्षनेते फडणवीसांनी राज्य सरकारला अजूनही पाझर फुटायचे नाव नाही. पंचनाम्याचे आदेश दिलेत, यापलिकडे काहीही शब्द सरकारकडून दिला जात नाही. अन्नदात्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे, असे म्हटले होते. याच पत्रच्या शेवटच्या परिच्छेदात तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की, नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे. आपण तातडीने लक्ष घालावे ही विनंती! असा उल्लेख आहे. (Wet drought)