जमीर काझी : मुंबई : “अजित पवार हे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहीलेले नेते होते. कधीतरी मुख्यमंत्री होईन. पण, कायम उपमुख्यमंत्री राहीन, असे ते कायम म्हणायचे. अजितदादा हे महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री होते”, त्यांच्या जाण्याने राज्यातील राजकारणातील न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, शिस्तबंध पण हळव्या मनाचा असा नेता पुन्हा होणार नाही, अशा शब्दात आदराजंली वाहिली.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आदराजंली वाहण्यात आली. विधानसभा व विधान परिषदेत अजित पवार यांचा शोकप्रस्तावावर बोलताना अनेक नेत्यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत. भावनाकुल अवस्थेत अजितदादाच्या आठवणी, कामाची पद्धतीबद्दल सांगून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. विधानसभेत शोकप्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज मनात वादळ आहे. अजित पवारांचा शोकप्रस्ताव मांडावा लागेल, याची कल्पनाही करवत नाही. सभागृहात उजव्या बाजूला पाहिलं की अजितदादा दिसायचे. कितीही उशीरापर्यंत कामकाज चाललं तरी ते शेवटपर्यंत बसलेले असायचे,” राजकारणात स्थिरावलेले, नेतृत्व सिद्ध केलेला नेता जाणे म्हणजे एक मोठी पोकळी निर्माण होणे आहे. आता दुसरे ‘अजितदादा’ होणं शक्य नाही.” (Ajitdada is the best CM Maharashtra has never had’)
मंत्रालयाची सुरुवात अजितदादांच्या उपस्थितीने व्हायची
अजित पवारांच्या निधनाच्या एक दिवस आधी झालेल्या कॅबिनेट बैठकीची आठवण सांगताना ते म्हणाले,“बैठकीनंतर पायाभूत सुविधांवरील चर्चा झाली. त्यांच्या सिग्नेचर स्टाईलनं त्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. प्रत्येक मुद्दा कागदावर नोंदवलेला असायचा. त्यानंतर आम्ही पाऊण तास गप्पा मारल्या. पण ती शेवटची भेट ठरेल, याची पुसटशीही कल्पना नव्हती. एक दशकापेक्षा अधिक काळ आमची मैत्री होती. निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना आणण्याचे ठरवले. मंत्रिमंडळात हा विषय चर्चेला आला. ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मंत्रिमंडळात चिंता व्यक्त झाली होती. पण अजित पवारांनी आर्थिक नियोजन करून ती योजना त्यांनी प्रत्यक्षात आणली.” विकास प्रकल्पांबाबत त्यांची दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता अधोरेखित करताना ते म्हणाले, “फाईलींचा ढीग त्यांच्या टेबलावर कधी दिसला नाही. अधिकारी थेट बोलावून घेत, योग्य ते निर्णय घेत. त्यांची पाठराखण करत. वक्तशीरपणा हा त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग होता. “मंत्रालयात अधिकारी येण्याआधी अजितदादा पोहोचायचे. मंत्रालयाची सुरुवातच त्यांच्या उपस्थितीने व्हायची. कुठल्याही मुख्यमंत्र्याला अर्थमंत्री कसा पाहिजे, तर तो अजित पवारांसारखा पाहीजे. जो वास्तविकचा आरसा दाखवणारा पाहिजे.,असेही त्यांनी सांगितले.
अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना उपमुख्यमंत्री शिंदे भावूक
लाखांचा पोशिंदा जावा आणि लाखो लोक अनाथ व्हावेत, अशीच काहीशी अवस्था अजितदादांच्या जाण्याने झाली आहे. दादा, राजकारणात आपण घेतलेले अनेक निर्णय अचूक होते हे जनतेच्या न्यायालयाने सिद्ध केले आहे, पण तुमचा हा जगाचा निरोप घेण्याचा निर्णय मात्र चुकला आहे. तो मागे घ्या आणि परत या, अशा भावूक शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना विधान परिषदेत श्रद्धांजली वाहिली.
अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मी, देवेंद्रजी आणि अजितदादा म्हणजे राज्याच्या स्थैर्याचा एक भक्कम ‘ट्रँगल ऑफ स्टॅबिलिटी’ होतो. आम्ही तिघे एकत्र आलो म्हणून महाराष्ट्राची भूमिती आणि प्रगती वेगाने सुरू होती. २८ जानेवारीच्या त्या काळ्या दिवसाने आमचा हा आधार हिरावून नेला. दादा वेळ कधीच चुकवत नसत, पण त्या दिवशी नियतीने मात्र घात केला. टीव्हीवर त्या अपघाताची दृष्ये पाहिली आणि मनाचा थरकाप उडाला, अशी आठवण त्यांनी सांगितली.
अजितदादांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना शिंदे यांनी सांगितले की, प्रशासनावर त्यांची जबरदस्त पकड होती. फाईल हातात घेतल्यावर काही सेकंदात त्यांची नजर कागदावरून स्कॅन व्हायची आणि त्यातील चुका ते चटकन शोधायचे. दादा बाहेरून फणसासारखे कडक वाटत असले तरी आतून ते अत्यंत मृदू मनाचे होते. लाडकी बहीण योजनेसाठी ४६ हजार कोटींची तरतूद करताना त्यांनी अर्थकारणाचा समतोल उत्तम राखला होता.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मैत्रीतील काही किस्सेही सांगितले. हॉटेल हयात मधील बैठकीत जेव्हा मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा होती, तेव्हा अजितदादांनीच ‘एकनाथराव असतील तर आम्हाला चालेल’ असे ठामपणे सांगितले होते. तसेच, दादा मला नेहमी रात्री उशिरापर्यंत काम न करण्याचा आणि आरोग्याची काळजी घेण्याचा वडिलकीचा सल्ला द्यायचे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना धीर देताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आभाळाएवढे दुःख समोर असतानाही ताई खंबीरपणे उभ्या आहात. आम्ही दोन्ही भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. दादांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ‘विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही’ ही दादांची घोषणा आम्ही सत्यात उतरवू, असा निर्धार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शेवटी व्यक्त केला. (Ajitdada is the best CM Maharashtra has never had’)
विश्वासू मित्र गमावला : उद्धव ठाकरे
विधान परिषदेत भावना व्यक्त करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, माणसे असताना त्यांचे खरे महत्त्व कळत नाही. अनेकांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात दादांसोबत झाली. तर माझी आणि दादांची कारकीर्द मात्र विरोधी विचारांच्या वाटेनं चालत होती. एक सकाळ त्यांच्या एका निर्णयामुळे धक्का देणारी ठरली होती. तर दुसरी सकाळ त्यांच्या निधनाच्या बातमीनं अंत:करण हादरवून गेली. आम्ही अनपेक्षितपणे एकत्र सरकारमध्ये आलो. मला सरकार चालवण्याचा अनुभव नव्हता. मात्र, हळूहळू लक्षात आलं की दादांसारखा विश्वासू मित्र माझ्यासोबत आहे. आज तो मित्र मी गमावला आहे. विषयांचा सखोल अभ्यास करणारा नेता विरळच असतो. मोठ्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. ७० हजार कोटीचे आरोप करून त्यांच्या जीवावर उठले पण त्याला न घाबरता धैर्याने सामोरे गेले. त्यांच्यावर आरोप करणारे आता ते जवळचे असल्याचे सांगत आहेत, असे सांगून त्यांनी भाजपाला टोला लागवला.
अजितदादांच्या अपघाताची चौकशी करा
ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव म्हणाले, अजित पवारांसारख्या नेत्याचा अपघात होणे शक्य वाटत नाही. मनात आजही संशय आहे. कोणतीही चौकशी करा. पण सत्य महाराष्ट्राच्या समोर आले पाहिजे” रोहित पवार हे अजित पवार यांच्या अपघाताचा मुद्दा लावून धरत आहेत. काहीजण म्हणतायेत, शरद पवार आणि रोहीत पवार यांच्या बोलण्यामध्ये विसंगती आहे. पण अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांचा व्हिडीओ आला होता. त्यात त्यांच्या हातात एक कागद होता. त्यांनी एक ओळ वाचली, हा घातपात नसून ,अपघात आहे याला कोणताही वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे शरद पवार म्हणाले होते. पण, तेव्हाची परिस्थिती नाजूक होती. जर ठिणगी पडली असती तर काय घडलं असतं, याची जाणीव असल्याने त्यांनी हे वक्तव्य केले होते. पण, अपघाताची चौकशी झाली पाहिजे”,असे सांगितले.
कामाची शिस्त, सामान्यांच्या प्रश्नांची जाण हा सर्वांसाठी एक वस्तुपाठ
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ म्हणाले,’ दादांच्या कामाची शिस्त, वक्तशीरपणा आणि सामान्यांच्या प्रश्नांची जाण हा सर्वांसाठी एक वस्तुपाठ होता. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ‘आधारवड’ आज उन्मळून पडला आहे. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. १९८५ पासून आजवर अनेक दिग्गजांना निरोप दिला, पण दादांसाठी शोकप्रस्ताव मांडावा लागेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
प्रशासनावर जरब आणि कामाचा वेग ही ओळख जनमानसात कोरली गेली
अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक पुरोगामी नेतृत्व हरपले,असे सांगून काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले,’ महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत शिस्तप्रिय, कार्यक्षम आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले कणखर नेतृत्व, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक पर्व संपुष्टात आले. प्रशासनावर जरब आणि कामाचा वेग ही त्यांची ओळख कायमची जनमानसात कोरली गेली आहे, दादा खऱ्या अर्थाने ‘अजातशत्रू’ नेते होते. आपल्या पक्षातील नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप झाले तरी त्यांना सांभाळून घेणारे अजितदादा पवार होते ही आठवण वडेट्टीवार यांनी सांगितली.
रोहित पवार, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर
अजित दादाना श्रद्धांजली वाहताना, त्यांच्या आठवणी सांगताना अनेकजण भावुक झाले होते. रोहित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, अदिती तटकरे यांना तर आपले अश्रू आवरता आले नाहीत. (Ajitdada is the best CM Maharashtra has never had’)