अमेरिकेचा युक्रेनमधील दूतावास बंद

कीव; वृत्तसंस्था : रशियन हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर घेतला निर्णय युक्रेन-रशिया युद्ध अधिक धोकादायक होत आहे. जो बायडेन यांनी युक्रेनला घातक क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिल्यानंतर युक्रेनने रशियावर अमेरिकन ‘एटीएसीएमएस’ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला, त्यानंतर अमेरिकेने आज सुरक्षेच्या कारणास्तव कीवमधील आपला दूतावास बंद केला आहे.

‘यूएस डिपार्टमेंट ऑफ स्टेट कॉन्सुलर अफेयर्स’ने एका निवेदनात म्हटले आहे, की संभाव्य हवाई हल्ल्याच्या चिंतेमुळे बुधवारी (ता. २०) कीवमधील अमेरिकन दूतावास बंद करण्यात आला आहे. कीव दूतावासाच्या वेबसाइटवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की खूप सावधगिरी बाळगून, दूतावास बंद करण्यात येत आहे आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, निवेदनात, अमेरिकन नागरिकांना हवाई सतर्कतेची घोषणा झाल्यास त्वरित सुरक्षित ठिकाणी जाण्यास तयार राहण्यास सांगितले आहे. एक दिवस आधी युक्रेनने रशियावर अमेरिकन ‘एटीएसीएमएस’ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता.

बायडेन यांनी युक्रेनला त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवसांत प्राणघातक अमेरिकन शस्त्रे वापरण्याची परवानगी दिल्यानंतर या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला आहे. युद्धाने नव्या युगात प्रवेश केला आहे. रशियाने अमेरिकेच्या ‘एटीएसीएमएस’ क्षेपणास्त्र हल्ल्याला युद्धातील एक मोठा बदल म्हणून घेतले असून युद्ध एका नव्या टप्प्यात दाखल झाल्याचे म्हटले आहे. पुतीन यांनी यापूर्वीच रशियावर कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा दिला असून, त्यांनी थेट ‘नाटो’ देशांना लक्ष्य करण्याची धमकीही दिली आहे.

युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की हे रशियाबरोबरच्या युद्धात अमेरिकेने बनवलेल्या क्षेपणास्त्रांच्या वापरावरील निर्बंध कमी करण्यासाठी बायडेन प्रशासनावर बराच काळ दबाव आणत आहेत. त्याची परवानगी मिळाल्यानंतर, झेलेन्स्की म्हणाले, की युक्रेनसाठी त्यांच्या विजय योजनेचा’ हा एक महत्त्वाचा भाग आहे.

मोठ्या युद्धाचे संकेत

पुतीन प्रशासनानेही रशियाच्या आण्विक सिद्धांतातील बदलांना मंजुरी दिली. देशात अण्वस्त्रविरोधी मोबाइल निवारे बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे. युद्धातील या विस्तारावरून असे दिसते, की कधीही मोठे युद्ध होऊ शकते.

Related posts

Python near Hostel: शंभर किलो अजगराचा गर्ल्स होस्टेलजवळ डेरा

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित