– प्रा. विराज जाधव
आपल्या आयुष्यात पर्सनल फायनान्स मॅनेजमेंटचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. या विषयाची सुरुवात आपल्या जीवनातील आर्थिक समस्येपासून केली पाहिजे. विशेषत: आपले निवृत्तीनंतरचे जीवन सुखकर होण्यासाठी पर्सनल फायनान्स महत्त्वाचे ठरते. ते वेळीच समजून घेतले तर भविष्य काळवंडणार नाही.
आपल्यापैकी अनेकजण नुकतेच नोकरीला लागले असतील, नवीन व्यवसाय सुरू केला असेल. अनेक जण बरीच वर्षे नोकरीत अथवा व्यवसायामध्ये असतील. आपण आपल्या कारकिर्दीच्या कुठल्याही टप्प्यावर असलो तरी, प्रत्येकाला शेवटी यशस्वी आणि आनंदी सेवानिवृत्ती हवी असते. निवृत्तीनंतर आपल्या आवडीचे आयुष्य जगता यावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी निवृत्तीच्या वेळी आपल्याकडे इतके पैसे असायला हवे की आपल्याला पैशाबाबत आणि आपल्या राहणीमानामध्ये कोणतीही तडजोड करावी लागणार नाही.
आता हाच मुद्दा आपण आकड्यांच्या माध्यमातून समजून घेऊ. समजा तुम्ही आणखी २५ वर्षे काम करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला निवृत्त व्हायचे आहे. निवृत्तीनंतर तुम्ही आणखी २० वर्षे जगाल असे तुम्हाला वाटते. तुमचा सध्याचा मासिक खर्च ३०,००० रुपये आहे. यामध्ये घरभाडे, घर कर्जाचा हप्ता, वाहन कर्ज हप्ता, किराणामाल, भाजीपाला, लाईट बिल, फोन बिल, हॉटेलिंग आदींचा खर्च धरला आहे. यामध्ये विमा हप्ता, कर, सहल, शैक्षणिक शुल्क आणि इतर महत्त्वाच्या खर्चांचा समावेश नाही, ज्यासाठी तुम्ही पैसे वेगळे ठेवले असतील असे गृहीत धरतो. हा फक्त तुमच्या जीवनशैलीचा खर्च आहे. तर, आतापासून २५ वर्षांनी, पुढील २० वर्षांसाठी तुम्हाला दरमहा ३०,००० रुपये म्हणजेच वर्षाला ३,६०,००० रुपये लागतील. ही रक्कम तुम्हाला कमी-जास्त वाटू शकते. परंतु सध्या ही रक्कम पकडून आपण पुढे जाऊ. तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर येथे तुम्हाला दोन प्रश्न पडू शकतात. एक म्हणजे निवृत्तीवेळी म्हणजे २०५० सालच्या सुरुवातीला किती रक्कम (निवृत्ती निधी) साठली पाहिजे? आणि दुसरा प्रश्न म्हणजे निवृत्तीनंतरचे समाधानी जीवन जगण्यासाठी लागणारी ही रक्कम कशी साठवावी?
तुमच्यापैकी बरेच जण लगेच पहिल्या प्रश्नाचे उत्तर देतील.
३,६०,००० रुपये वार्षिक आवश्यक आहे (१२ महिन्यांसाठी ३०,००० रुपये मासिक) आणि रक्कम २० वर्षांसाठी आवश्यक आहे. नंतर ३,६०,००० * २० = म्हणजेच ७२ लाख रुपये. याचा अर्थ, जर आपण पुढील २५ वर्षांत ७२ लाख रुपये जमा केले तर आपण ही रक्कम निवृत्तीच्या पुढील २० वर्षांसाठी म्हणजे २०७० पर्यंत सहज खर्च करू शकू. पण हे दिसते तितके सोपे नाही. कारण, या गणितामध्ये आपण महागाई दर पकडला नाही आहे. त्यामुळे महागाई नसती तर हे कॅल्क्युलेशन योग्य ठरले असते. पण महागाई हे जीवनाचे वास्तव आहे आणि त्याचा आपल्या बचतीवर आणि गुंतवणुकीवर खूप परिणाम होत असतो.
महागाई आणि रुपयाचे मूल्य
उदाहरणार्थ, आज ५० रुपयांना उपलब्ध असलेली एखादी वस्तू पुढील वर्षी ५५ रुपये मोजावी लागू शकते. अशाप्रकारे, मागील वर्षी खरेदी केलेल्या वस्तूंपेक्षा या वर्षी तुम्हाला त्याच रकमेत कमी माल मिळेल. म्हणजे रुपयाचे मूल्य कमी होईल. सत्य हे आहे, की आजचा पैसा उद्या कमी किमतीचा असेल. त्यामुळे घरातील थोरामोठ्यांकडून २० वर्षांपूर्वी ५० रुपयांत पोटभर जेवण मिळायचे, असे किस्से आपल्याला ऐकायला मिळतात. याचा अर्थ असा की आजचे ३०,००० रुपयांचे मूल्य उद्या तेवढेच राहणार नाही तर कमी होईल. म्हणूनच वर्षांच्या संख्येला ३०,००० ने गुणून आपण निवृत्ती निधीच्या योग्य रकमेपर्यंत येऊ शकत नाही. त्यामुळे पहिल्या प्रश्नाचे अचूक उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला २५ वर्षांनंतर ३०,००० रुपयांचे मूल्य शोधावे लागेल. तुम्ही नीट पाहिले तर तुम्हाला कळेल की सेवानिवृत्तीचे पहिले वर्ष २०५० आहे जे २५ वर्षांनंतरचे आहे आणि त्यावेळी ३,६०,००० रुपये लागतील. निवृत्तीचे दुसरे वर्ष म्हणजे २०५१ हे आतापासून २६ वर्षे दूर आहे आणि हा क्रम असाच सुरू आहे. तर, आता आपले पुढचे काम म्हणजे महागाई दराने २५ वर्षांनी, २६ वर्षांनी, २७ वर्षांनी आणि त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी ३०,००० रुपयांचे मूल्य काय असेल हे शोधणे.
रुपयाचे भविष्यातील मूल्य
निवृत्तीच्या पहिल्या वर्षी म्हणजे २०५० मध्ये आपल्याला किती पैसे लागतील हे शोधण्यासाठी आपल्याला दीर्घकालीन महागाईचा दर शोधावा लागेल. इथे आपण गृहीत धरूया की दीर्घकाळात महागाईचा दर ४ ते ५ टक्क्यांच्या दरम्यान असेल. तर आता पुढचा प्रश्न असा आहे की या दराने २५ वर्षांनी, २६ वर्षांनी किंवा त्यानंतरच्या वर्षांनी ३,६०,००० रुपयांची किंमत काय असेल. अशाप्रकारे आपल्याला ही किंमत २० वर्षांसाठी मोजावी लागेल. जेव्हा आपण प्रत्येक वर्षाचे भविष्यातील मूल्य मोजतो, तेव्हा ते जोडून आपल्याला सेवानिवृत्तीच्या वेळी किती रक्कम लागेल हे कळू शकते.
भविष्यातील रुपयाचे मूल्याचे सूत्र :
फ्यूचर वैल्यू = P x (1+R)^(n)
येथे,
- P = मुद्दल येथे रु. ३,६०,०००
- R = महागाई दर येथे ५%
- n = कालावधी येथे २५ वर्षे
जर आपण ही संख्या सूत्रात ठेवली ३,६०,००० x (१+५%)^(२५) = रु.१२,१९,०८७
याचा अर्थ जर तुमचा आजचा वार्षिक खर्च जर ३,६०,००० रुपये असेल तर २५ वर्षांनंतर त्याचे मूल्य रु.१२,१९,०८८ इतके असेल.
दुसऱ्या वर्षासाठी – ३,६०,००० x (१+५%)^(२६) = रु.१२,८०,०४२
याचा अर्थ जर तुमचा आजचा वार्षिक खर्च जर ३,६०,००० रुपये असेल तर २६ वर्षांनंतर त्याचे मूल्य रु. १२,८०,०४२ इतके असेल.
त्यामुळे निवृत्तीच्या पुढील २० वर्षांसाठी म्हणजे २०७० पर्यंत सुखी व समाधानी आयुष्य जगण्यासाठी ४.३५ कोटी रुपये लागतील. आपण महागाईचे आकडे बदलले किंवा आपली जीवनशैली बदलली तर ही रक्कम बदलू शकते. जर कोणाला या कॅल्क्युलेशनची एक्सेल शीट हवी असेल तर माझ्याशी संपर्क साधू शकता.
इथे काही गोष्टी अतिशय सोप्या पद्धतीने तर काही गोष्टी अतिशयोक्तीने सांगितल्या आहेत. उदाहरणार्थ, प्रत्येक महिन्याला ३०,००० रुपयांची गरज काहीशी अधिक वाटू शकते. उतारवयात वयात लोक रोज नवनवीन महागड्या हॉटेलात जाण्यापेक्षा घरीच राहणे पसंत करतात. त्यामुळे अन्न, मनोरंजन, कपडे इत्यादीं वरील खर्च कमी होऊ शकतो. त्या वयात खर्च कमी होतो असे माझे स्वतःचे मत आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर प्रत्येक महिन्याला बहुदा ३०,००० रुपयांची गरज भासणार नाही. त्यानंतर गरजा कमी झाल्या तर उत्तम, नाहीतर तुम्ही तयार आहात.
आता राहिला दुसरा प्रश्न तो म्हणजे निवृत्तीनंतरचे समाधानी जीवन जगण्यासाठी लागणारी ही रक्कम कशी साठवावी?
तर याचे उत्तर आपण बघणार आहोत पुढील लेखात..!!