वैष्णोदेवी यात्रेचे दर्शन आता अधिक सोपे होणार

जम्मू : वृत्तसंस्था :  ‘माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड’ने यात्रेकरूंचा प्रवास सोयीस्कर आणि जलद करण्यासाठी रोपवे प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सीईओ’अंशुल गर्ग म्हणाले, की रोपवे प्रकल्प एक गेम चेंजर असेल. ज्यांना मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी १३ किलोमीटरची चढण चढणे आव्हानात्मक वाटते, त्यांना रोप वे झाल्यामुळे दर्शन घेणे सहजशक्य होणार आहे.

ते म्हणाले, की गेल्या वर्षी माता वैष्णोदेवी यात्रेने ९५ लाखांहून अधिक भाविकांचा विक्रम केला. या प्रकल्पाची अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होती आणि यात्रेकरूंना चांगल्या सुविधा देतानाच पुढे जाण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. वृद्ध यात्रेकरूंना आणि जे शारीरिक कमतरतेमुळे किंवा हेलिकॉप्टर सेवेच्या मर्यादित क्षमतेमुळे कठीण प्रवास पूर्ण करू शकत नाहीत, त्यांना ‘रोप वे’चा फायदा होईल. शिवाय प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान स्थानिक भागधारकांच्या चिंतांचाही विचार केला जाईल, यावर बोर्डाने जोर दिला. निर्णय निश्चित झाल्यानंतर लवकरच मैदानाचे काम सुरू करण्याचे बोर्डाचे उद्दिष्ट आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘रोप वे’ तारकोट मार्गाला मुख्य तीर्थक्षेत्र इमारतीशी जोडेल. ते म्हणाले, की पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी भक्तांना त्रिकुटा टेकड्यांचे नेत्रदीपक दर्शन देऊन, आध्यात्मिक आणि निसर्गरम्य अनुभवाची भर पडावी यासाठी काळजीपूर्वक नियोजन करण्यात आले आहे. ‘रोप वे’ने दररोज हजारो भाविक जा-ये करू शकतात. त्यामुळे पारंपरिक पदपथावरील गर्दी लक्षणीयरीत्या कमी होईल. तासाभराच्या प्रवासाच्या तुलनेत हा प्रवास काही मिनिटांत होणार आहे.

Related posts

pooja khedkar: पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Sheikh Hasina : शेख हसीनांना आमच्याकडे सोपवा

Rahul gandhi : सोमनाथची पोलिसांकडूनच हत्या