भारताची तन्वी पत्री आशियाई बॅडमिंटन विजेती

नवी दिल्ली 

चीनमधील चेंग्दू येथे झालेल्या अंतिम सामन्यात व्हिएतनामच्या थी थू हुयेन गुयेनला सरळ गेममध्ये नमवीत भारताच्या तन्वी पत्री हिने आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या १५ वर्षांखालील गटाचे अजिंक्यपद मिळवले. भारताने या स्पर्धेत एक सुवर्ण व एक कांस्यपदकाची कमाई केली. जी. दत्तूने १७ वर्षांखालील मुलांच्या गटात कांस्यपदक मिळवले.  चौतीस मिनिटे चाललेल्या सामन्यात अग्रमानांकित तन्वीने दुसऱ्या मानांकित गुयेनवर २२-२०, २१-११ असा विजय नोंदवला. तन्वीच्या या कामगिरीनंतर तिचा सामिया इमाद फारुकी व तस्नीम मीर यांच्या यादीत समावेश झाला आहे. फारुकी व मीर यांनी २०१७ व २०१९ मध्ये १५ वर्षांखालील मुलींच्या गटाचे जेतेपद मिळवले होते.

तन्वी अंतिम सामन्यातील पहिल्या गेममध्ये ११-१७ अशी पिछाडीवर होती. मात्र व्हिएतनामच्या खेळाडूच्या चुकीचा फायदा उठवत तिने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये तिने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला कोणतीही संधी दिली नाही आणि गेमसह सामन्यात विजय नोंदवला. तन्वीचे आई-वडील रबीनारायण पत्री व शैलबाला पांडा हे सॉफ्टवेयर इंजिनीयर आहेत. ते पूर्वी चीनमध्ये काम करीत होते. तेथेच तन्वीने बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली. करोनादरम्यान ते सर्व जण भारतात परतले.

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत