Home » Blog » सुनीता विल्यम्सचा अंतराळ मुक्काम मार्चपर्यंत वाढला!

सुनीता विल्यम्सचा अंतराळ मुक्काम मार्चपर्यंत वाढला!

स्पेसएक्स क्रू १० मिशनला विलंब

by प्रतिनिधी
0 comments
Sunita Williams

वॉशिंग्टन : अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातील मुक्काम आणखी वाढला आहे. तांत्रिक कारणामुळे विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर मार्च २०२५ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरच (आयएसएस) राहतील, असे अमेरिकेचे अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने स्पष्ट केले आहे. (Sunita Williams)

अमेरिकन अंतराळवीर सुनीता आणि विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकले आहेत. आठ दिवसांच्या छोट्या मोहिमेसाठी ते बोईंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये होते. तथापि, अंतराळयान प्रणालीत तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे योजना बदलण्यात आली. त्यामुळे या दोघांना ‘आयएसएस’वर थांबणे भाग पाडले.

‘नासा’ने स्टारलाइनरला विना क्रुव परत आणण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुनीता आणि विल्मोर हे फेब्रुवारी २०२५ मध्ये स्पेसएक्स मिशनवर परतण्याची योजना होती. परंतु काही कारणांनी उशीर होत गेल्याने जूनपासून किमान नऊ महिने त्यांना अंतराळात राहावे लागत आहे. (Sunita Williams)

‘नासा’ चे स्पेसएक्स क्रू १० मिशन फेब्रुवारीत नियोजित होते. मात्र ते आता मार्च २०२५ पर्यंत ते लांबणीवर गेले आहे. या मोहिमेत चार अंतराळवीरांना आणले जाईल. ‘नासा’ने सांगितले की, या बदलामुळे अंतराळयान तयार करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. नवीन ड्रॅगन अंतराळयान जानेवारी २०२५ पर्यंत तयार होईल. त्याची निर्मिती आणि चाचणीचे काळजीपूर्वक नियोजन करावे लागणार आहे. शिवाय त्यातील बारीकसारीक तपशीलाकडे लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे, असे ‘नासा’चे कमर्शियल क्रू प्रोग्राम मॅनेजर स्टीव्ह स्टिच यांनी स्पष्ट केले. आमच्या महत्त्वाकांक्षी मिशनसाठी स्पेसएक्सने खूप परिश्रम घेतले. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. तसेच क्रूची भूमिकाही महत्त्वाची ठरली आहे, असे ते म्हणाले.

विल्मोर आणि सुनीता हे मुख्यत्वे स्टारलाइनरच्या क्रू चाचणी फ्लाइटचा भाग होते. नियमित मोहिमेसाठी बोईंगचे उड्डाण सुरू करण्याआधी अंतराळ यानाची तयारी किती आहे हे पाहणे महत्त्वाचे होते. त्या हेतूने ही मोहीम आखण्यात आली होती. मात्र थ्रस्टर्समधील समस्यांमुळे योजनेत अडथळे आले आहेत. (Sunita Williams)

सप्टेंबरमध्ये स्टारलाइनर विना क्रू परत आले आणि ‘नासा’ने आपल्या मिशनमध्ये सुधारणा केली. आता क्रू -१० होईपर्यंत अंतराळवीर विल्मोर आणि सुनीता तेथेच राहतील. अंतराळवीरांना घेऊन स्पेसएक्स २०२० पासून नियमितपणे उड्डाण करत आहे. सध्याच्या तांत्रिक अडचणी आहेत. तथापि, बोईंग स्टारलाइनरही ताफ्यात सामील होईल. ‘नासा’च्या भविष्यातील चंद्र आणि मंगळ मोहिमेत दोन्ही अंतराळयाने सहभागी होतील, अशी अपेक्षा नासाने व्यक्त केली आहे.

हेही वाचा : 

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00