बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी सहा आरोपींची ओळख पटवली असून त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर तीन जण अद्याप फरार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पटियाला जेलमधील लॉरेन्स बिश्नोई गँगच्या काही लोकांनी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट रचला होता. हत्येच्या कटात मोहम्मद झिशान अख्तरचे नाव पुढे आलं होतं. त्याने हे सर्व प्लॅनिंग केल्याचं म्हटलं जात आहे. (Baba Siddique)

गोळीबार केलेल्या संशयित गुरमेल सिंह, धर्मराज कश्यप आणि शिव कुमार यापैकी धर्मराज आणि गुरमेलला अटक करण्यात आली आहे, तर झिशान अख्तर, शुभम लोणकर आणि शिव कुमार फरार आहेत. त्यानंतर प्रवीण लोणकरलाही पोलिसांनी अटक केली. प्रवीण आणि शुभम हे भाऊ आहेत.

कसा रचला होता हत्येचा कट?

झिशानला (वय २१) याला जालंधर पोलिसांनी २०२२ मध्ये हत्या आणि दरोड्याच्या आरोपाखाली अटक केली होती. तो पटियाला जेलमध्ये बंद होता, जिथे तो लॉरेन्स बिश्नोई गँगच्या काही लोकांना भेटला, ज्यांनी त्याला बाबा सिद्दिकी यांना मारण्याची सुपारी दिली. या वर्षी सात जून रोजी तुरुंगातून बाहेर आल्यावर झिशानने हरियाणातील कैथलमध्ये गुरमेल सिंह यांची भेट घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झिशान गुरमेल, धर्मराज कश्यप आणि शिव कुमार यांना सिद्दिकी यांच्या हत्येचा कट रचण्याचे निर्देश देत होता.

चाळीस दिवस मुंबईत

बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळी झाडली तेव्हा झिशानच शूटर्सना सिद्दीकींच्या लोकेशनची माहिती देत होता. शूटर्सना भाड्याने खोली देण्यापासून ते इतर सर्व व्यवस्था त्यानेच केली होती. हत्या करण्याआधी चार आठवड्यांपासून हे लोक सिद्दिकी यांच्या घराची आणि मुलाच्या कार्यालयाची रेकी करत होते. ते जवळपास ४० दिवस मुंबईत राहिले.

असा केला हत्येचा कट

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अटकेत असलेले शिव कुमार आणि धर्मराज कश्यप हे पुण्यात भंगार विक्रेते म्हणून काम करायचे, तर तिसरा आरोपी प्रवीण लोणकर हा डेअरीमध्ये काम करायचा. शिवकुमार आणि धर्मराज हे दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी असून दोघांनाही प्रवीण आणि त्याचा भाऊ शुभम लोणकर यांनी सिद्दिकींच्या हत्येसाठी तयार केलं होतं.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर एका दिवसाने शुभम लोणकरच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. याप्रकरणी गुरमेल सिंह, प्रवीण लोणकर आणि धर्मराज कश्यप यांना अटक करण्यात आली आहे, तर तिघे अद्याप फरार आहेत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पेपर स्प्रे खरेदी केला होता आणि बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी पेपर स्प्रेने हल्ला करण्याचा त्यांचा प्लॅन होता. (Baba Siddique)

घडलेला घटनाक्रम

दसऱ्याच्या दिवशी १२ ऑक्टोबरला वांद्रे येथील बाबा सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर लोक फटाके फोडत होते. त्यानंतर रात्री ९ वाजून २० मिनिटांनी बाबा सिद्दिकी आपल्या मुलाच्या कार्यालयातून बाहेर आले त्याचवेळी फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. तोंडाला रुमाल बांधलेले तीघे जण आले आणि त्यांनी एकापाठोपाठ सहा राऊंड फायर केले. यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांना लागल्या. गोळी लागताच बाबा सिद्दिकी जमिनीवर कोसळले. उपचारासाठी त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बाबा सिद्दिकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी घटनेनंतर गुरमेल बलजीत सिंह आणि धर्मराज राजेश कश्यप यांना ताब्यात घेण्यात आले होते. मुंबई क्राइम ब्रँचने या दोघांना रविवारी संध्याकाळी कोर्टात हजर केलं होतं, तिथे धर्मराज कश्यपने आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. कोर्टाने गुरमेलला २१ ऑक्टोबरपर्यंत ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर धर्मराजचं खरं वय जाणून घेण्यासाठी बोन ऑसिफिकेशन टेस्ट करण्यात येणार आहे. (Baba Siddique)

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ