फलटणकरांच्या नाड्या दोन्ही पवारांच्या हातात

  • चैतन्य दिलीप रुद्रभटे

स्वातंत्र्यापूर्वी फलटण संस्थानचे भूतपूर्व अधिपती कै. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी आपटे आणि मफतलाल यांना प्रोत्साहन देत न्यू फलटण शुगर वर्क्स हा खाजगी साखर कारखाना १९३० च्या दशकात साखरवाडी येथे सुरु केला. स्वातंत्र्यानंतर १९५७ साली श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून श्रीमंत मालोजीराजेंनी निरा खोऱ्यात सहकारी चळवळ उभी केली. आणि खऱ्या अर्थाने फलटण तालुक्याचा संपन्नतेच्या दिशेने प्रवास सुरु झाला. फलटणच्या विकासाचे हे मॉडेल आजूबाजूच्या तालुक्यात राबवायला सुरुवात झाली. लगत असलेल्या बारामती तालुक्यात माळेगाव आणि सोमेश्वर येथेही कारखाने उभे झाले. हे कारखाने उभारण्यात श्रीमंत मालोजीराजे यांनी मदतच केली. पण, येथेच बारामती आणि फलटण तालुक्याच्या विकासाची स्पर्धा सुरु झाली.

आणखी वाचा –  महाराष्ट्रचा अंगार सहजासहजी विझवता येणार नाही!

कालांतराने पुलाखालून बरेच पाणी गेले. यशवंतराव चव्हाणांच्या राजघराण्यांना विरोध करण्याच्या भूमिकेमुळे फलटणचे श्रीमंत मालोजीराजे यांना राजकीय साठमारीचा फटका बसला. पण, तिकडे बारामती तालुक्यात शरद पवार यांचं राजकारण बहरत गेलं. तसाच बारामतीचा विकासही बहरत गेला. दरम्यानच्या काळात श्रीमंत मालोजीराजे यांच्यानंतर फलटणला माजी आमदार कै. हरिभाऊ निंबाळकर, माजी आमदार कै. कृष्णचंद्र भोईटे, माजी आमदार कै. श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार कै. चिमणराव कदम यांनी फलटणची धुरा सांभाळली. बारामतीच्या विकासाला आणि शरद पवारांना विरोध करत फलटणचे माजी आमदार चिमणराव कदम यांनी विधानसभा गाजवली. पण, फलटणचा विकास हा जेवढा श्रीमंत मालोजीराजे यांनी केला होता तेवढाच राहिला. आणि बारामती तालुका हा प्रचंड पुढे गेला.

फलटण-बारामतीचे वैर संपुष्टात

१९९५ साली श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर बारामती आणि फलटणमधील हे विळ्या भोपळ्याच वैर बाजूला केलं. शरद पवारांशी जुळवून घेतलं. याच दरम्यान १९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत फलटणचे कै. हिंदुराव नाईक निंबाळकर हेदेखील खासदार म्हणून निवडून गेले. त्यांनी बारामती, फलटण, लोणंद रेल्वे मार्गाची संकल्पना समोर आणली. या रेल्वे मार्गाच्या पहिल्या संकल्पनेला बारामतीकरांचा विरोध होता. बारामतीतील बागायती जमीन यात जात आहेत, हे कारण पवारांनी त्याला दिलं होत. पण, बारामतीकरांच्या उरावरुन रेल्वे नेणार, अस म्हणत कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी बारामतीच्या जिरायती भागातून रेल्वे मार्ग काढला. आणि त्याचे काम आत्ता सुरु आहे. त्यांनी निरा देवघर सिंचन प्रकल्पासाठी पदयात्रा काढली. याच काळात आमदारकी मिळवल्यानंतर श्रीमंत रामराजे यांची फलटण विधानसभा मतदार संघावर पकड वाढली.

आणखी वाचा – शरद पवारांच्या राजकारणाचे काय होणार?

श्रीमंत रामराजेंनी शरद पवारांच्या मदतीने धोम बलकवडी, निरा देवघर या फलटणला वरदायिनी ठरलेल्या धरणांची उभारणी केली. कमिन्ससारखी मल्टीनॅशनल कंपनी येथे औद्योगिक वसाहतीत आली. कमिन्स फलटणला आल्यावर देखील सुप्रिया सुळे नाराज झाल्या होत्या. कमिन्सच्या उदघाटनप्रसंगी सुप्रिया सुळेंनी ही कंपनी बारामती तालुक्यात आली नसल्याची जाहीर नाराजी देखील बोलून दाखवली होती. मागून येऊन का होईना बारामती एवढी नाही पण धिम्या गतीने फलटणच्या विकासाची घोडदौड सुरु झाली होती. २०१४ नंतर देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीने आपला वरचष्मा राखून ठेवला. २०१९ नंतर तर राज्याच्या राजकारणात अनाकलनीय बदल झाले. आणि फलटण तालुक्यातही तितकेच बदल झाले. बारामतीचे विरोधक कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पक्षातून खासदार झाले. शरद पवारांना विरोध करणारा मोदींचा पठ्ठ्या म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्लीत आपली ओळख तयार केली. राज्यात आणि देशात शरद पवारांचे कट्टर विरोधी म्हणून ओळख असणाऱ्या रणजितसिंह यांना दिल्लीतून आणि नागपूरमधून ताकद मिळू लागली.

आणखी वाचा – अजित पवारांची कसोटी

२०१९ नंतर राज्यात तयार झालेल्या विचित्र राजकीय परिस्थितीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचीही द्विधा मनस्थिती झाल्याची प्रचिती अनेकांना आली. त्याला कारणही तसच होत, सत्तेच्या माध्यमातून फलटण तालुक्यात श्रीमंत रामराजे यांचे विरोधक रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपले पाय पसरवायला सुरुवात केली होती. पण, दस्तुरखुद्द अजित पवारांनी भाजपच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे निमित्तच श्रीमंत रामराजेंना मिळाले. आणि श्रीमंत रामराजे अजित पवारांसोबत भाजपकडे वळले.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी रणजितसिंह यांचा पराभव केला. हा पराभव करण्यात श्रीमंत रामराजे यांनी महत्वाची भूमिका बजावली. तालुक्यातील स्थानिक विरोधक नेस्तनाबूत करण्याची संधी श्रीमंत रामराजे यांनी सोडली नाही. पण, हा पराभव फक्त रणजितसिंह यांनाच नव्हे तर भारतीय जनता पार्टीच्या देखील जिव्हारी लागला. इथेच खरी राजकीय टस्सल सुरु झाली.

रामराजेंविरोधात नागपूरहून रसद

झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी रणजितसिंह पुढे आलेच पण, श्रीमंत रामराजे यांच्या वर्चस्वाला संपवण्यासाठी सध्या थेट नागपूरहून रसद पुरविली जाऊ लागली आहे. या वचपा काढण्याच्या प्रयत्नात भारतीय जनता पार्टीने मायक्रो प्लॅनिंग करत फलटण तालुका पोखरण्याचे काम सध्या सुरु केले आहे. ज्यांनी मदत केली, त्या प्रल्हादराव साळुंखे पाटील, महायुतीतील घटक पक्षाचे श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांच्यापासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकाला राज्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी ताकद देण्याचे काम सुरु केले आहे. एव्हाना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांना भारतीय जनता पार्टीत घेऊन आम्ही काय करु शकतो, याची जाणीव सुद्धा श्रीमंत रामराजे यांना करुन दिली आहे. मात्र, फलटण आणि बारामतीमधील जी विकासाची स्पर्धा सुरु होती, ती या वचपा काढण्याच्या प्रयत्नात कुठेतरी थांबणार तर नाही ना? असा सवाल आता उपस्थित होत आहे. सध्या फलटणला जी वर्चस्ववादाची लढाई सुरु झाली आहे. त्या लढाईला माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार आणि उपमख्यमंत्री ना. अजित पवार खतपाणी घालणार की निरा खोऱ्यात सुरु असलेले विकासात्मक राजकारण पुढे आणणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण आगामी काळात फलटणच्या राजकारणासाठी आणि भवितव्यासाठी या दोघांचीही भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी