रिवणावायली मुंगी हा राजन गवस यांचा कथासंग्रह. हा २००१ मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित झाला. यातील कथांचा लेखन काळ १९८१ ते १९९९ आहे. यातील कथा अतिशय सुंदर आहेत. (Rajan Gavas’s stories)
-उदय कुलकर्णी (मुंबई)
या कथासंग्रहातील पहिलीच कथा रिवणावायली मुंगी ही खूप छान आहे. इथे एक तरुण नायिकाच निवेदन करत आहे. जातीचा संदर्भ आहे आणि अगदी बारीक बारीक ते आहेत. हिचे कूळ ९६ कुळीपैकी. प्रथा सांगितल्या आहेत त्या कथेच्या ओघातच उदाहरणार्थ, या मुलीने एकदा डोक्यावर घागर घेतली तर आपल्याकडे अशी डोक्यावर घेत नाहीत फक्त कंबरेवरच घ्यायची यावरून ओरडा झाला. नऊवारीचा कासोटा कसा घालायचा याचेही नियम. लग्न जमवताना कुळीला कुळी, पदरला पदर जुळले पाहिजे. मुलगी कॉलेजात शिकायला जाते परिवर्तनाच्या चळवळीत काम करते, चळवळीतील एका तरुणाबरोबर प्रेम जमतं. तरुणाचीही साथ असते, परंतु शेवटी तो जातीत लग्न करतो. (Rajan Gavas’s stories)
कथा सांगण्याची शैली छान आहे जणू काही ती तरुणी सगळं मजेत सांगत आहे, परंतु कहाणी दुःखी आहे.
ही कथा १९९२ ची आहे, आता चालीरीतींमध्ये बदल झालेला असेल अशी आशा.
एक होता कावळा ही कथा साप्ताहिक सकाळ दिवाळी अंकात १९९९ला प्रकाशित झाली होती व तेव्हाच ती वाचलेली होती आणि त्याचे सार लक्षात होते. एका माणसाच्या मागे कावळे लागतात त्याची ही कहाणी. (Rajan Gavas’s stories)
उचकी कथेचा निवेदक एक लहान मुलगा आहे. घरी दारिद्र्य आहे. सगळे सुट्टीत मामाकडे आजोळी जातात. तिथे इतरही मावश्या आलेल्या आहेत. तिथे निवेदकाचा मोठा भाऊ काहीतरी बंगाली विद्येचा, अंधश्रद्धायुक्त जादूचा वगैरे एक प्रयोग करतो आणि सांगतो आपल्याकडे आता कधीच धान्य संपणार नाही. अर्थातच शेवटी निराशा पदरी येणार.
तिच्या वळणाची गोष्ट यात तुळसाबाई साताप्पा मिसाळ ही निवेदक आहे व तीच आपली कहाणी सांगत आहे. मिसाळ या आडनावावरून जात काय असेल यावरच पहिला परिच्छेद आहे. ती सांगते मी मराठ्यांच्या लेकावळ्या जातीची आहे. हुशार असते, तिला मास्तरीण व्हायचं असतं. घरी अर्थात एवढे उत्सुक नसतात, परंतु ही चांगल्या मार्काने पास होते आणि दहावीतसुद्धा चांगले मार्क मिळतात मग ती बारावी प्रवेश घेते. तिथे एका मास्तरांच्या सांगण्यावरून संघटनेचे काम करायला लागते. तिथे सतीश प्रधान नावाच्या मुलाबरोबर तिचं प्रेम जमतं, त्याचंही तिच्यावर प्रेम जमतं, परंतु नंतर त्याच्यातील ब्राह्मण जागा होतो आणि हिचा प्रेमभंग होतो. नंतर या मुलीचं काय होतं आणि घरचे तिला कसे वागवतात ते कथेत आहे.
दादा कोतोलीकर ही कथा खूप छान आहे.
हा दादा एका संघटनेत काम करत आहे. कथा निवेदकाची तिथेच त्याच्याबरोबर गाठ पडते आणि त्याला या दादाच्या आयुष्याची कर्मकहाणी कळते, त्याचा संघटनेत काम करण्याचा उद्देश कळतो. विवाहित स्त्री-पुरुष संबंध हा कथेचा भाग आहे. (Rajan Gavas’s stories)
बाई ही कथा हृदयाला हात घालणारी झालेली आहे. एक बाई नवऱ्याच्या छळाला वैतागून आणि आणखी एका मुख्य कारणामुळे घरातून बाहेर पडते, कुठे कुठे जाऊन राहते. शेवटी दोन माणसे तिला ठेवून घेतात. दोघेही विवाहित आहेत. एका विवाहित माणसाला तो असे संबंध ठेवले याबद्दलचा अपराधगंड आहे. असे बहुदा कथांमध्ये येणे दुर्मिळ असावे की माणूस लफडे तर करतो परंतु त्याचे मन त्याला खात असते, अपराधी वाटत असते.
दुसरा विवाहित माणूस एक मागणी करतो आणि त्यामुळे ही बाई तिथून पळत सुटते. ते कारण हेच कथेचे मर्म आहे.
इतरही कथा चांगल्या आहेत. कथनशैली चांगली आहे. या कथांवर अगदी ग्रामीण कथा असा शिक्का मारता येणार नाही. जातीचे पोटजातीचे बारकावे आहेत. यातील शीर्षक कथा जी आहे त्यावर २०२२ मध्ये सिनेमा आला होता. त्याची पटकथा संवाद संजय पवार यांचे होते व दिग्दर्शन डॉ. दिनेश कदम यांचे आहे. अक्षया गुरव प्रमुख भूमिकेत व शशांक शेंडे, रेणुका दप्तरदार, आकाश नलावडे इत्यादी कलाकार आहेत. सिनेमा youtube वर मिळेल किंवा इतर कुठे मिळाला तर बघू शकता.
हेही वाचा :
हिंदी सक्ती कराल तर…