Home » Blog » भिंत खचली कलथून खांब गेले…

भिंत खचली कलथून खांब गेले…

भारतातील घटनात्मक आणि संबंधित संस्थांचा पंचनामा

by प्रतिनिधी
0 comments

सर्वोच्च न्यायालय तांत्रिकदृष्ट्या सर्व काही करू शकते. “तांत्रिकदृष्ट्या” हा फार सुंदर शब्द आहे. तो “संविधानानुसार”, “सैद्धांतिकदृष्ट्या” आणि “तत्त्वतः” या शब्दांसोबत एका सुंदर कपाटात ठेवलेला असतो. असे कपाट जे अतिशय चकचकीत ठेवले जाते आणि साधारणपणे उघडले जात नाही. (Republic of Excellent Intentions)

  • सतीश झा

हे सर्वांनी मान्य केलेले सत्य आहे — आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे सतत प्रसारित केले जाणारे सत्य आहे — की आपण एका सुवर्णयुगात जगत आहोत. हे आपल्याला माहीत असते, कारण या युगासाठी जबाबदार असलेले लोक सतत आणि इतक्या ठामपणे ते सांगतात की त्याची पडताळणी दुसरीकडे जाऊन करणे म्हणजे अक्षरशः उद्धटपणा ठरेल. आकडेवारीसुद्धा हेच सिद्ध करते. आकडेवारी नेहमीच हे सिद्ध करते. आकडेवारी इतकी उपयोगी का असते, याचे हे अनेक कारणांपैकी एक आहे.

शांत राहण्याची सवय(Republic of Excellent Intentions)

आपली लोकशाही अत्यंत निरोगी आहे. आधीच्या पिढीने आपले सर्वस्व पणाला लावल्यामुळे हा वारसा आपल्याला लाभला, तो कशासाठी तर आपण क्रिकेट आणि भ्रष्टाचारावर मोकळेपणाने वाद घालू शकू. लोकशाही निरोगी आहे, हे कशावरून कळते? तर जे लोक काही वेगळे म्हणणे मांडू शकले असते, त्यांनी अलीकडे एक विलक्षण आणि हृदयस्पर्शी अशी शांत राहण्याची सवय विकसित केली आहे. शांतता सुवर्णमयी असते, असे आपल्याला सांगितले जाते. म्हणजे आपण फार श्रीमंत राष्ट्र असलो पाहिजे.

आपण आपल्या संस्थांपासून सुरुवात करूया. त्या “स्तंभ” आहेत. “स्तंभ” हा शब्द भाषणांमध्ये फार लोकप्रिय आहे, आणि भाषणे आपल्या प्रजासत्ताकात फार लोकप्रिय आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये इतकी घट्ट मैत्री होणे साहजिकच आहे. शाळेत तुम्ही शिकलाच आहात की, स्तंभ म्हणजे वरून येणारा भार पेलणारी उभी रचना. आपल्या संस्था हा भार पेलण्यात अत्यंत निष्णात झाल्या आहेत. अपेक्षांचा भार, चौकशीचा भार, विशिष्ट वेळांना येणाऱ्या विशिष्ट फोन कॉल्सचा भार — त्या हे सर्व विलक्षण समतोलाने पेलतात आणि तक्रारही करत नाहीत. (Republic of Excellent Intentions)

कार्यपालिका आणि विधिमंडळ

कार्यपालिका — म्हणजे शासनकारभार करण्याची जबाबदारी असलेली शासनव्यवस्थेची ऊर्जावान शाखा. ती शासन करते. जोरदारपणे. निर्णायकपणे. जवळजवळ पूर्णपणे स्वतःहून. हाच तर कार्यक्षमतेचा अर्थ आहे. कार्यक्षमतेचा गोंधळ जुन्या, संथ पद्धतीशी करू नये — म्हणजे सल्लामसलत, मतभेद आणि निर्णयांचे पुनरावलोकन या कंटाळवाण्या गोष्टींशी. ती पद्धत त्या काळाला योग्य असेल. जसे बंदुका त्यांच्या काळाला योग्य होत्या. आता आपण पुढे निघून आलो आहोत.

विधिमंडळ — ते भव्य व्यासपीठ जिथे जनतेचे निवडून आलेले प्रतिनिधी जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एकत्र येतात. ते नियमितपणे आणि प्रभावी संख्येने भरते. नेमके ते कोणाचे प्रतिनिधित्व करतात, हा आता एक गुंतागुंतीचा तात्त्विक प्रश्न झाला आहे; पण अचूकतेमुळे गती कमी होऊ द्यायची नाही. चर्चा होतात. प्रस्ताव मांडले जातात. कधी कधी सदस्यसुद्धा हलवले जातात. अधिक प्रत्यक्षात. कधी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात. हा प्रकार तुम्हाला धक्कादायक वाटला असता, जर तुम्हाला हे समजले नसते की हे पक्षांतर नसून “चांगल्या शासनाकडे जाणारा आध्यात्मिक प्रवास” आहे. विशेष म्हणजे हे प्रवास जवळजवळ नेहमी एकाच दिशेने होतात. (Republic of Excellent Intentions)

संपादकीय निर्णयांचा स्वयंस्फूर्त संगम

माध्यमे — आपली मुक्त, जिवंत, बंधनाशिवाय असलेली माध्यमे — अजूनही त्यांचा दबदबा आहे. ती “दबाव” टाकत आहेत. आजकाल ती दबाव टाकतात, पण कुणावर, तर लोकांना हितकारक वाटणा-या विचारसरणीवर. हा दबाव त्यांच्यासाठी असतो, ज्यांच्या जाहिरातींमुळे माध्यमांच्या कार्यालयांमधले दिवे चालू राहतात. ही सेन्सॉरशिप नाही, बरं का! सेन्सॉरशिप हे अशिक्षित राज्यांचे एक ढोबळ हत्यार असते. आपल्याकडे त्याहून कितीतरी देखणी गोष्ट आहे : संपादकीय निर्णयांचा असा विलक्षण स्वयंस्फूर्त संगम की इतक्या विविध वृत्तवाहिन्या आणि संपादक एकाच वेळी, एकाच निष्कर्षापर्यंत स्वतंत्रपणे पोहोचतात, हे पाहून केवळ योगायोगावरच आश्चर्य वाटावे. जेव्हा प्रत्येक अँकर एकाच क्षणी स्वतंत्रपणे एकाच निष्कर्षापर्यंत पोहोचतो, तेव्हा तो समन्वय नसतो. ते फक्त सत्य असते.

कायम छत्री बाळगण्याची सवय

दरम्यान, नागरिक आपला सर्वात लोकशाहीवादी अधिकार — बोलण्याचा अधिकार — अत्यंत सावधपणे वापरतो. त्याला बोलू नकोस असे कुणी सांगितलेले नाही. विनोद, टीका किंवा पत्रकार परिषदेत विचारलेला उपरोधिक प्रश्न यावर बंदी घालणारा कोणताही हुकूम नाही. तो पूर्णपणे मुक्त आहे. फक्त त्याने, हवामान बारकाईने पाहणाऱ्या माणसाच्या सहजज्ञानाने, हे ओळखले आहे की काही विशिष्ट ढगांनंतर काही विशिष्ट वादळे येतात. आणि त्यामुळे त्याने — पूर्णपणे स्वेच्छेने — कायम छत्री बाळगण्याचा आणि शक्यतो घरातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. याला शहाणपण म्हणतात. राज्याने स्वतःचा एक पैसाही खर्च न करता अत्यंत सावध नागरिकांची निर्मिती केली आहे. (Republic of Excellent Intentions)

काही शांत कोपऱ्यांमध्ये, जिथे लोक अजूनही कुजबुजण्यापेक्षा थोडे मोठ्याने बोलतात, तिथून असे ऐकू येते की न्यायालये, म्हणजे संविधानाचे शेवटचे किल्ले, कागदावर तरी अस्तित्वात असलेल्या अधिकारांचे संरक्षक, कदाचित काहीतरी करतील. जेव्हा न्यायाधीशांनी सत्तेकडे थेट पाहून सत्य उच्चारले, अशा क्षणांची नोंद इतिहास नावाचा अविश्वसनीय कथाकथनकार ठेवत असतो. ते प्रेरणादायी क्षण असतात. त्यांच्यावर उत्कृष्ट चित्रपट बनतात. आणि ते उत्कृष्ट चित्रपट बनले, कारण ते दुर्मिळ होते. जे नेहमी घडते, ते त्या प्रेरणादायी क्षणांच्या मधल्या काळातील दस्तावेजांमध्ये भरलेले असते — आणि तो दस्तावेजी इतिहास, जर प्रामाणिकपणे वाचला, तर खूपच लांब आहे.

न्यायाधीशही शेवटी माणूसच

न्यायाधीशही शेवटी माणूसच असतो. त्याला कुटुंब असते. त्याला निवृत्ती असते. आणि जर त्याने वर्तमानकाळात पुरेशी शालीनता दाखवली, तर निवृत्तीनंतर काही प्रतिष्ठित पदे संयमाने त्याची वाट पाहत असतात. संविधान त्याच्या कार्यकाळाची सुरक्षा देते. पण ज्याला तो सर्वाधिक प्रिय मानतो, त्याच्या सुरक्षेची हमी संविधान देत नाही. आणि अलीकडे असे दिसते की आपला मुद्दा पोहोचवू इच्छिणाऱ्या लोकांनी “प्रिय व्यक्ती” या माध्यमातून संदेश पोहोचवण्याचे कौशल्य विकसित केले आहे. संदेश पाठवला जात नाही — पण समजला जातो. ही कार्यक्षमतेची आणखी एक कमाल आहे.

रुपया — आर्थिक सार्वभौमत्वाचे ते धाडसी छोटे एकक — आजही त्याने आपले क्रीडाप्रदर्शन सुरू ठेवले आहे. तो अशा उंचीवर पोहोचत आहे जिथे रुपया यापूर्वी कधी पोहोचला नव्हता. अगदी त्या गिर्यारोहकाप्रमाणे ज्याने चुकीच्या बाजूने डोंगर चढायचे ठरवले आहे. आपल्या परकीय चलनसाठ्याबद्दल आश्वासक आवाजांत, आश्वासक चेहऱ्यांनी, आश्वासक प्राइम-टाइम स्लॉट्समध्ये चर्चा केली जाते. आणि ज्या उशा नीट तपासून पाहायच्या नसतात, त्यांच्याशी माणूस अगदी असेच वागतो.

लोकशाहीचा महान उत्सव

सोशल मीडिया — लोकशाहीचा महान उत्सव. प्रत्येक नागरिकाच्या हातात परिणामांची पर्वा न करता दिलेला मेगाफोन — त्याला हळूहळू शिकवले गेले आहे की उत्सवा-उत्सवांमध्ये फरक असतो. काही उत्सव चालू ठेवण्याची परवानगी मिळते. काहींना अचानक कळते की त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण अत्यंत गैरसोयीच्या वेळी आवश्यक झाले आहे, किंवा त्यांच्या कलाकारांना काही कार्यालयांत “चर्चेसाठी” बोलावले गेले आहे. त्यानंतर ते परत येतात — थोडे बदललेले. उत्सव सुरूच असतो. विदूषकांनी आता मोठ्या प्रमाणात शिकून घेतले आहे की, कोणते विनोद चालतात आणि कोणत्या विनोदांमुळे तंबू कोसळतात.

आणि तरीही — आणि इथे आपल्या आनंदी वार्ताहराला एक छोटासा, अनैच्छिक आणि पूर्णपणे अराजकीय आश्चर्याचा स्वर दडपता येत नाही. लोक टिकून आहेत. ते अजूनही विनोद करतात. कुणीतरी चुकीच्या क्षणी एखादा विनोद करतो आणि थोड्या काळासाठी, तेजस्वीपणे, अशा जनतेचा नायक बनतो जी हास्यासाठी इतकी उपाशी आहे की कुठलाही हशा तिला एखादी हरवलेली मौल्यवान गोष्ट परत आल्यासारखी वाटते. हे, जसे दिसते तसे, दडपशाहीचे लक्षण नाही. उलट, हे भारतीय आत्म्याच्या अजिंक्यतेचे पुरावे आहेत. या सुवर्णयुगात भारतीय आत्म्याला प्रचंड ओझे उचलावे लागले आहे — आणि तो अजूनही हसतमुखाने काम करत आहे.

क्षितिज कायम असते (Republic of Excellent Intentions)

मग काय करायचे? समाधानी वार्ताहर असा प्रश्न विचारत नाही. “काय करायचे?” असे विचारणे म्हणजे काहीतरी चुकीचे आहे असे गृहीत धरणे. आणि ते म्हणजे या सुवर्णयुगाच्या पुरवठादारांबद्दल उघड उद्धटपणा होय. त्याऐवजी आपण अधिक आरामदायी प्रश्न विचारूया : “सगळे समाधानी आहेत ना?” आणि मग आपण उत्तराची वाट पाहू —संयमाने वाट पाहू. अनेक शतकांच्या अनुभवातून ते शिकले आहे की, धुक्यात दिसत नसले तरी क्षितिज कायम असते.

सर्वोच्च न्यायालय तांत्रिकदृष्ट्या सर्व काही करू शकते. “तांत्रिकदृष्ट्या” हा फार सुंदर शब्द आहे. तो “संविधानानुसार”, “सैद्धांतिकदृष्ट्या” आणि “तत्त्वतः” या शब्दांसोबत एका सुंदर कपाटात ठेवलेला असतो. असे कपाट जे अतिशय चकचकीत ठेवले जाते आणि साधारणपणे उघडले जात नाही. (Republic of Excellent Intentions)

आपण आशावादाने समाप्त करूया, कारण अजून ज्यांना निराशावादाबद्दल हिशोब द्यावा लागलेला नाही, त्यांच्यासाठी आशावाद हीच योग्य मुद्रा असते. प्रजासत्ताक अजून उभे आहे. त्याचे उत्कृष्ट हेतू अजूनही उत्कृष्ट आहेत. त्याच्या संस्था अजूनही स्तंभ आहेत. आणि जर त्या स्तंभांपैकी काहींनी एका विशिष्ट दिशेला किंचित सजावटी झुकाव घेतला असेल, तर पीसाचा झुकता मनोरा देखील जगातील आश्चर्यांपैकी एक मानला जातो. लोक दूरदूरून तो पाहायला येतात. कदाचित हीच आपल्या भविष्यकालीन वारशाची खूण असेल : असे एक मनोहर झुकलेले स्मारक, ज्याखाली उभे राहून जग एक दिवस आश्चर्याने म्हणेल, ते अजून कोसळले कसे नाही.

ते अजून कोसळलेले नाही.

आम्ही पुढील घडामोडींची प्रतीक्षा करत आहोत.

(सतीश झा हे ज्येष्ठ पत्रकार असून जनसत्ता या हिंदी दैनिकाचे सहसंस्थापक तसेच टाइम्स ग्रूपच्या दिनमान या नियतकालिकाचे संपादक होते.)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00