Home » Blog » Ramdas Phutane : कोल्हापूरच्या मातीची शक्ती खूप मोठी आहे : रामदास फुटाणे

Ramdas Phutane : कोल्हापूरच्या मातीची शक्ती खूप मोठी आहे : रामदास फुटाणे

by प्रतिनिधी
0 comments
Ramdas Phutane

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूरच्या मातीचा गंध वेगळा आहे, या मातीची शक्ती खूप मोठी आहे. अनेक क्षेत्रात कोल्हापूरने कर्तबगारी सिद्ध केली आहे, असे मत प्रसिद्ध वात्रटीकाकार, चित्रपट निर्माते रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले. ‘सामना’ चित्रपटाचे बहुतांशी चित्रिकरण कोल्हापूर परिसरात झाल्याची आठवण सांगताना त्यांनी कोल्हापूरच्या कलागुणांचे कौतुक केले. (Ramdas Phutane)

महाराष्ट्र दिनमान आयोजित दिनमान साहित्य उत्सवात ‘सामना’ चित्रपटाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त रामदास फुटाणे यांची मुलाखत कवी अरुण म्हात्रे आणि अभिनेता सागर तळाशीकर यांनी घेतली. राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमात रसिकांना फुटाणे यांनी सामना चित्रपटाची निर्मिती, प्रसिद्धी यावर मुलाखतीत भाष्य केले.  ते म्हणाले,  ‘सामना हा सत्तेतील प्रवृत्ती आणि सत्तेपासून बाजूला फेकलेली प्रवृत्ती यावर भाष्य करणारा चित्रपट आहे. हा सिनेमा सुरुवातीला फ्लॉप गेला. प्रेक्षक गाणी सुरू झाली की थिएटरमध्ये बसायचे आणि गाणी संपली की पुन्हा बाहेर पडत. मात्र बर्लिन चित्रपट महोत्सवात हा सिनेमा झळकला आणि या चित्रपटाने पुढे इतिहास घडला. तीन राष्ट्रीय पुरस्कार, तीन फिल्मफेअर, आंतरराष्ट्रीय महोत्सवात पुरस्कार अशी कामगिरी करणारा हा पहिलाच मराठी सिनेमा. जगभर गाजलेल्या या सिनेमाचे बहुतांश चित्रीकरण कोल्हापूर परिसरात झाले. कोल्हापूरच्या मातीचा गंध वेगळा आहे. या मातीत शक्ती मोठी असल्याचे ते म्हणाले.  दादा कोंडकेंनी मला सिनेमाची वाट दाखविली, जयप्रभा स्टुडिओने मला घडविलं अशी कबुलीही त्यांनी दिली. (Ramdas Phutane)

फुटाणे हे मूळचे मराठवाडयातील. नोकरीनिमित्त मुंबईला. चित्रकला शिक्षक. महिन्याला साधारणपणे साडेतीनशे पगार. सिनेमा निर्मितीकडे पावले कशी वळली ? असा प्रश्न करत म्हात्रे यांनी मुलाखतीला सुरुवात केली. फुटाणे म्हणाले, ‘आचार्य अत्रे यांच्या ‘मी कसा घडलो ?’ हे साहित्य माझ्यासाठी प्रेरणादायी होते. शाहीर व अभिनेता दादा कोंडके यांनी मला सिनमाची वाट दाखविली. ते म्हणाले, नोकरी सोडा, सिनेमा काढू. रजा काढून त्यांच्यासोबत मी, कोल्हापुरात आलो. जयप्रभा स्टुडिओत पोहोचलो. सोंगाडया, एकटा जीव सदाशिव करताना आपणही काही तरी करू असे वाटू लागलं. मी, सिनेमाची जुळवाजुळव करत होतो. मी, मनाशी एक खूणगाठ बांधलेली,  जे करायचं ते वेगळे. त्याशिवाय आपलं स्थान निर्माण होणार नाही अशी. सिनेमा हा खर्चिक. शिक्षक म्हणून  पगार कमी असला तरी सिनेमा काढायचं ठरविलं होते, जरी सिनेमा फ्लॉप झाला , कर्ज झालं तरी त्या कर्जाची परतफेड कशी करायची हा प्लॅन तयार केला होता. (Ramdas Phutane)

सिनेमा तयार करताना निर्माते प्रथम अभिनेता, अभिनेत्री निवडतात. मी, मात्र लेखक निवडला. विजय तेंडुलकर. त्यांचे ‘अशी पाखरे येती‘हे नाटक पाहिलेले होते.  लेखक, पटकथा लेखक म्हणून त्यांनाच घ्यायचं हे मी ठरविलेले होते, असे फुटाणे यांनी सांगितले. ते म्हणाले, तेंडुलकर हे अवतीभवतीच्या मूलभूत प्रश्नांचा शोध घेणारे लेखक होते. पहिल्यांदा त्यांनी पटकथा लेखनाला नकार दिला. वर्षभर थांबलो. नंतर तयार झाले. दिग्दर्शक म्हणून जब्बार पटेल डोळयासमोर होते. त्यांनी दिग्दर्शन केलेले ‘घाशीराम कोतवाल’ नाटक मी पाहिलं होतं. तेंडुलकरांच्या लेखनाचा नेमका अर्थ जब्बारच प्रेक्षकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणार याची खात्री होती. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्यासोबतही सिनेमा निर्मितीसंबंधी चर्चा केली. जयप्रभा स्टुडिओतच या सिनेमाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त झाला. पार्श्वगायिका लता मंगेशकर यांच्या हस्ते सिनेमाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ झाला. यावेळी चंद्रकांत मांडरे देखील उपस्थित होते. ’मुलाखती दरम्यान फुटाणे यांनी सिनेनिर्मितीच्या विविध आठवणी शेअर करत उपस्थितांना वेगळी अनुभूती दिली.

‘निर्मितीचा खर्च लाखात, आणि सिनेमा फ्लॉप…अशी स्थिती बनली. कर्जबाजारी झालो. सुरुवातीला सिनेमा चालला नाही. हे कर्ज फेडण्यासाठी कवितांचे कार्यक्रम सुरू झाले. कवी स्वत:च्या खिशातून चहा पाजून कविता ऐकवतो. आणि पैसे मिळवण्यासाठी सिनेमा काढतो. माझे उलटे झाले. सिनेमामुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी कवितांचे कार्यक्रम करुन कर्ज केले असे त्यांनी सांगितले. फुटाणे म्हणाले,  सप्टेंबर १९८६ मध्ये ‘भारत कधी कधी माझा देश आहे.’हा व्याख्यान-कविताचा कार्यक्रम सुरू केला. हा कार्यक्रम सुरू करुन यंदा चाळीस  वर्षे होत आहेत. पहिले व्याख्यान सोलापुरात झाले. ५५ मिनिटे व्याख्यान दिले. तेव्हा निर्मलकुमार फडकुले म्हणाले, ‘हा कार्यक्रम दीड तासाचा करा, यामध्ये आणखी मसाला भरा.’ पुढे हा कार्यक्रम देश-विदेशात गाजला. परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या, व्यंगात्मक कविता सादर करत होतो. त्याला गंभीर स्वरुप दिलं. पानांच्या-फुलांच्या, प्रेमाच्या कविता मी कधीच केल्या नाहीत. तो माझा प्रांतही नाही. ’असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर : ‘गाभ’ या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा कै. अनंत माने ग्रामीण चित्रपट दिग्दर्शक आणि कै. दादा कोंडके ग्रामीण चित्रपट पुरस्कार मिळाल्याबद्दल चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांचा या कार्यक्रमात शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन रामदास फुटाणे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डावीकडून कवी अरूण म्हात्रे, अभिनेते सागर तळाशीकर, श्री. जत्राटकर आणि महाराष्ट्र दिनमानचे संपादक डॉ. विजय चोरमारे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आलोक जत्राटकर यांनी केले.

मुलाखतीत  रामदास फुटाणे म्हणाले ‘आयुष्यात काय करायचं नाही हे सुद्धा मी ठरविले होते. सिनेमा, साहित्याच्या माध्यमातून मोठया व्यक्तिमत्वांशी माझा स्नेह जुळला. त्यांना ऐकायला, भेटायला मिळाले. मोठया माणसांच्या सहवासात आलो की आपण किती खुजे आहोत याची जाणीव व्हायची. जेव्हा खुजेपणाची जाणीव सतावते तेव्हा किंचित उंची वाढू लागते अशी माझी धारणा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत चेहरा दिला. पुढे शरद पवारांनी तो चेहरा जपला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे,  विलासराव देशमुख, माजी उपमुख्यमंत्री गोपिनाथ मुंडे यांच्याशी मित्रत्वाचे नातं तयार झालं. त्यांचा स्नेह लाभला. या राजकीय मंडळीवरही मी कवितेतून भाष्य केलं. मात्र ही सारी मोठया मनाची माणसं. त्यांनी कधी मनात राग धरला नाही.’

फुटाणे म्हणाले, जीवनाची समृद्ध अनुभूती मिळते. आयुष्यात जगण्याची दिशा ठरायला हवी. काय करायचं जस आपण ठरवितो, तसे काय करायचं नाही हे पक्क असावं.  आनंदी जीवनाचे, यशस्वी जीवनाचे खूप विषय आहेत. तांबडा-पांढरा रस्सा आणि क्वाटर-कोंबडी म्हणजे सगळं आनंद नव्हे. कोल्हापूरच्या मातीचा गंध वेगळा आहे, या मातीची शक्ती खूप मोठी आहे. अनेक क्षेत्रात कर्तबगारी सिद्ध केली आहे. तरुण पिढीला इतकंच सांगणं आहे, आयुष्यात जिद्द हवी, कष्टाची जोड हवी. यश नक्कीच मिळते.’

कार्यक्रमाची लिंक :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00