राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. बहुतांश ‘एक्झिट पोल’ हे महायुतीच्या बाजूने असले, तरी निकालाच्या दोनच दिवसांनी आधीच्या विधानसभेची मुदत संपत असल्याने जर अटीतटीच्या लढतींत कोणालाच बहुमत मिळाले नाही, तर सरकार स्थापन होणे अशक्य आहे. यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

२३ नोव्हेंबरला मतमोजणी आहे, तर २६ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी केवळ ४८ तास हातात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने अपक्ष, छोटे पक्ष आणि महाशक्तीच्या नेत्यांना फोनाफोनी सुरू केली असून, बहुतासाठी गरज लागलीच तर मदत कोण करू शकेल याची चाचपणी सुरू केली आहे. महत्त्वाचे म्हणजे सत्ता स्थापन करण्यापेक्षा मुख्यमंत्री कोण असेल यावरूनच मोठे वाद होण्याची शक्यता आहे. यानंतर मंत्रिपदे, यात काही फिस्कटले तर या बाजूचे त्या बाजूला आणि त्या बाजूचे या बाजूला होण्याचीही दाट शक्यता आहे. सत्ता स्थापनेसाठी मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी होण्याचीही शक्यता आहे.

राजकारणात काहीही होऊ शकते, असे संकेत अजित पवार यांनी निवडणूक काळातही दिले आहेत. यामुळे सत्तेसाठी, मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्रही येऊ शकतात. भाजपच्या जागा कमी आल्या, तर पुन्हा एकनाथ शिंदे तोडपाणी करत मुख्यमंत्रिपद घेऊ शकतात. या सर्व गोष्टी ४८ तासांत करणे जवळपास अशक्य आहे. यामुळे राज्यपाल राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्याची शक्यता अधिक आहे.

महायुती सरकार राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या प्लॅनिंगमध्ये असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. राऊत यांचा आरोप खरा-खोटा ठरविण्यापेक्षा सध्याची परिस्थिती तिकडेच बोट दाखवत आहे. आमदारांना राज्यभरातून मुंबईत यासाठी यावे लागणार आहे. २३ तारखेला अनेकांना रात्री उशिरा निवडणूक आयोग प्रमाणपत्र देणार आहे. यानंतर त्यांना मुंबईत येण्यासाठी मिळेल तो मार्ग पकडून यावे लागेल.

घोडेबाजाराला ऊत येणार

बहुमताचा आकडा कोणालाच पार करता आला नाही, तर या आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू होतात. यामुळे या आमदारांना कुठेतरी दूर हॉटेलमध्ये नेऊन एकत्र ठेवावे लागते. यात आमदारांच्या घोडेबाजारालाही ऊत येतो. अनेक आमदार फोन बंद करून बसतात. यामुळे तो पक्षही या काळात गॅसवरच राहतो. महाराष्ट्रात अशी परिस्थिती बनेल, असे संकेत मिळत असले तरी बऱ्याचशा गोष्टी उद्या ठरणार आहेत.

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ