नवी दिल्ली ः तरुण मोठ्या संख्येने राजकारणात प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी त्यांना फक्त योग्य संधी आणि मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात केले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांनी राजकारणात येण्याचे आवाहन स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी केले होते. त्यावर घराणेशाहीमुळे संधी मिळत नसल्याची तक्रार अनेक तरुणांनी केल्याचे मोदींनी यावेळी नमूद केले.
सामूहिक प्रयत्नांतूनच सामान्य तरुणांना राजकारणाचे दरवाजे उघडू शकतील, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, यावर्षी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात मी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एक लाख तरुणांना राजकीय व्यवस्थेशी जोडले जाण्याचे आवाहन केले होते, त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. तरुण मोठ्या संख्येने राजकारणात प्रवेश करण्यास उत्सुक असल्याचे लक्षात आले. मला देशभरातून तरुणांचा विविध माध्यमांतून प्रतिसाद मिळत आहे. त्यात घराणेशाहीचे राजकारण नवीन प्रतिभेला चिरडत असल्याचे अनेकांनी नमूद केले आहे, असे मोदी म्हणाले.