बारामती; प्रतिनिधी : विरोधकांकडून मतदारांना धमक्या देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी केला. बारामती मतदारसंघातील काही केंद्रांवर कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडले. शहरातील महात्मा गांधी बालक मंदिर परिसरात दोन्ही पवार गट आमने सामने आले. त्यानंतर वाद झाला. त्यावर शर्मिला पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
मतदारांना घड्याळाच्या शिक्क्यांच्या स्लिपचे वाटप करत त्यांना धमकावल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मतदारांना दिलेल्या चिठ्ठ्यांच्या मागे घड्याळाचा शिक्का असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याच्या तक्रारीही आल्या असल्याचे त्या म्हणाल्या.
त्या म्हणाल्या, मतदारांकडे चिठ्ठ्या होत्या. त्यावर शिक्के मारून आत सोडले जात आहे. इतर ठिकाणी बूथवर फिरत होते. तेव्हा आमच्या कार्यकर्त्याला धमक्या आल्या. संपवतो, खल्लास करतो, अशी भाषा येथे सुरू आहे. हवे असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे तपासा अशी मागणीही त्यांनी केली.
अजित पवार यांनी आरोप फेटाळले
शर्मिला पवार यांनी केलेले आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळले. मी एवढ्या निवडणुका लढल्या, पण कधीही आमच्या कार्यकर्त्यांनी अशी वक्तव्य केलेली नाहीत. माझा कार्यकर्ता असे कधीही वागणार नाही. तसे काही घडलेले असेल तर तिथल्या सीसीटीव्हीमध्ये सगळे रेकॉर्ड झालेले असेल, निवडणूक अधिकारी ते तपासतील, असे अजित पवार म्हणाले.