Home » Blog » Cultural Awards: मांजरेकर, खेर यांना जीवनगौरव पुरस्कार

Cultural Awards: मांजरेकर, खेर यांना जीवनगौरव पुरस्कार

गझल नवाझ पांचाळे यांना मंगेशकर पुरस्कार; काजोल, मुक्ता बर्वे यांचाही सन्मान

by प्रतिनिधी
0 comments
Cultural Awards

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी गुरुवारी (१७ एप्रिल) केली. यामध्ये चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार, स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अशा पाच महत्त्वाच्या पुरस्कारांचा समावेश आहे. (Cultural Awards)

मांजरेकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव

मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षासाठी दीर्घकाळ आयुष्य व्यतित करणारे तसेच अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलू गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अशा मान्यवरास चित्रपती. व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तसेच या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरास चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या वर्षीचा चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार नामवंत अभिनेता, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर जाहीर झाला आहे. रूपये १० लाख रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार यंदा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप ₹ ६ लाख, स्मृतिचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक असे आहे. (Cultural Awards)

‘राजकपूर जीवनगौरव’ अनुपम खेर यांना

हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केले आहे तसेच चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलू गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा मान्यवरास स्व. राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हिंदी चित्रपट सृष्टीतील हा मानाचा जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांना देण्यात येणार आहे. तर स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार यंदा अष्टपैलू अभिनेत्री काजोल देवगण यांना घोषित झाला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप अनुक्रमे ₹ १० लाख व ₹ ६ लाख, स्मृतिचिन्ह व मानपत्र, चांदीचे मेडल असे आहे. (Cultural Awards)

संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप  ₹१० लाख रोख रक्कम, मानचिन्ह, मानपत्र व शाल असे आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील पं ब्रिजनारायण, अशोक पत्की. सत्यशील देशपांडे, पं उल्हास कशाळकर आणि अंबरीश मिश्र यांच्या समितीने पुरस्कारार्थींची निवड केली.

सर्व पुरस्कारांचे वितरण २५ एप्रिल २०२५ रोजी एन.एस.सी.आय. डोम, मुंबई येथे एका भव्य समारंभात होणार आहे.

बाबासाहेबांना सांगीतिक मानवंदना

या सोहळ्याशिवाय, संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे २० एप्रिल रोजी सायंकाळी ६:३० वाजता गेटवे ऑफ इंडिया एक खास सांगीतिक मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात सुरेश वाडकर, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, नंदेश उमप आदी कलाकार सहभागी होणार आहेत. संचालन सुबोध भावे करणार आहेत. कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीते, नाट्यप्रवेश व नृत्य सादर केले जातील. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, सन्मानिका प्रवेशपत्रे शिवाजी नाट्य मंदिर व रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर वितरित केली जातील, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00