Home » Blog » अलविदा सुपर नानाजी!

अलविदा सुपर नानाजी!

आयएएस अधिकारी निधी चौधरी यांना त्यांच्या आजोबांच्या निधनाची बातमी कळली आणि त्यांच्या मनाची विलक्षण घालमेल सुरू झाली. आजोबांच्या आठवणी त्यांच्या मनात पिंगा घालू लागल्या.

by प्रतिनिधी
0 comments

प्रत्येक व्यक्तिचं आजोळशी नातं अगदी जिव्हाळ्याचं असतं. संवेदनशील माणसांच्या मनाच्या कोप-यात तर आजोळची, आजी-आजोबांची खास जागा असते. आयएएस अधिकारी निधी चौधरी यांना त्यांच्या आजोबांच्या निधनाची बातमी कळली आणि त्यांच्या मनाची विलक्षण घालमेल सुरू झाली. आजोबांच्या आठवणी त्यांच्या मनात पिंगा घालू लागल्या. त्याच घालमेलीत त्यांनी रेखाटलेले हे आजोबांचे शब्दचित्र. (Nidhi Chaudhari IAS)

निधी चौधरी

परवा संध्याकाळी ५.१५ वाजता मम्मीचा मेसेज आला – की तुम्ही आता या जगात नाही. मला माहिती आहे की तोंडाच्या कॅन्सरमुळे तुम्ही खूप यातना सहन करत होता. कारण कॅन्सर शेवटच्या टप्प्यावर असल्यामुळं उपचार शक्यच नव्हते. गेले तीन महिने मम्मी दिवसरात्र तुमच्यासोबत होती, तुमची सेवा करत होती. या महिन्यात जेव्हा मी संपूर्ण कुटुंबासह तुम्हाला भेटायला आले, तेव्हा तुमची अवस्था पाहून विश्वासच बसला नाही की हेच ते माझे आजोबा. जे अगदी अलीकडं म्हणजे २०१९ मध्ये कोणालाही न सांगता अचानक मुंबईत मला सरप्राइज द्यायला आले होते. दुसऱ्या दिवशी मी कुटुंबासह गोव्याला जाणार होते. तिकीटं आधीच बुक होती. तुम्ही आला म्हणून मी आणि देव ती ट्रिप रद्द करायच्या विचारात होतो, पण तुम्ही ते ऐकलं आणि म्हणालात, “सुपर नायिका आपला प्लॅन कधीच बदलत नाही. जा आणि मजा करून या.” (Nidhi Chaudhari IAS)

सहा वर्षांपूर्वी ‘पत्रिका टीव्ही’वर ‘नायिका’ या कार्यक्रमात माझी मुलाखत प्रसारित झाली होती, त्यानंतर तुम्ही मला कधीच माझ्या नावानं नाही बोलावलंत – तुम्ही कायम मला ‘सुपर नायिका’ म्हणत आलात. (Nidhi Chaudhari IAS)

कामाच्या व्यग्रतेमुळे मी तुमच्याशी फारसं बोलू शकत नव्हते, पण ज्या वेळेस बोलायचे, तुम्ही हमखास विचारायचात, “सुपर नायिका कशी आहे? आणि काय नवीन करते आहेस? तुझ्यासाठी काहीही अशक्य नाही. तू सुपर नायिका आहेस.” (Nidhi Chaudhari IAS)

मला नेहमी वाटायचं – मी खरंच तुमच्या अपेक्षांना पात्र ठरेन का? तुमच्या अपेक्षांचं ओझं कधी कधी खूप मोठं वाटायचं. लहानपणापासून आठवतंय, कितीतरी नातेवाईकांनी माझ्या लग्नासाठी वेगवेगळे प्रस्ताव पाठवले, पण तुम्ही कधीच आग्रह धरला नाही. मामा, आजी, पप्पा-मम्मी यांच्यापैकी कोणाच्याही ‘हो’ ला ‘हो’ केलं नाहीत. तुमचं मौनही आमच्यासाठी ताकद असायचं. जी ताकद बऱ्याच वडीलधाऱ्या लोकांकडून नव्या पिढीला मिळत नाही.

माझ्या धाकट्या बहिणीला जन्मानंतर ताप खूपच आला होता. तुम्ही आठवड्यानंतर गावात आलात, आणि समजलं की सगळे तिच्या मरणाची वाट बसले आहेत. तिच्यासाठी शेतात अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती. मग तुम्ही मामा लोकांना खडसावलं – की जिच्या तोंडात अन्नाचा एक कणसुद्धा गेलेला नाही, तिच्यासंदर्भात तुम्ही असे कसे वागू शकता? लगेच मोठ्या मामाला डॉक्टरला बोलवायला सांगितलंत. आणि ज्या दिवशी तिच्या मृत्यूची वाट पाहिली जात होती, त्या दिवशी तुम्ही तिला जगण्याचा डोस दिलात. आज ती केवळ माझी नाही, तर अनेक मुलींची, स्त्रियांची प्रेरणास्थान आहे – पण तिचं जीवन वाचवणारे देवमाणूस तुम्हीच होता. खरंच, तुम्ही ‘सुपर नाना’ होता. माझ्या लहानपणापासून मी तुम्हाला नेहमी डायरीत ‘राम नाम’ लिहिताना पाहिलं आहे. शांत चित्ताने रामनाम लिहिण्यात तुम्हाला काय सुख मिळत असेल, देवच जाणे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही आजोळी आलो की तुमच्या डायर्‍यात लिहिलेलं ‘राम’ वाचण्यात खूप मजा यायची. तुम्ही जेव्हा उगवत्या सूर्याच्या समोर बसून ‘रामचरितमानस’ वाचत होता, आणि आम्हाला मागून पाठ खाजवायला सांगत-सांगत रामचरितमानसाचा अर्थ समजावत होता – तेव्हा असं वाटायचं की स्वतः तुलसीदासच समोर बसलेत.

तुमच्यासारखा रामभक्त मी तरी कुठेच पाहिला नाही. तुम्ही कधीच ओरडून ‘जय श्रीराम’ नाही म्हणालात, पण तुमच्या मनात खोलवर रामनाम रुजलं होतं. काही महिन्यांपूर्वी आम्ही तुम्हाला अयोध्येतील राम मंदिरात घेऊन जाऊ असं सुचवलं, तेव्हा तुमचं उत्तर होतं, “राम तर मनात आहे, रोज त्याचं दर्शन होतं.”

खरंच, सुपर नाना तर तुम्हीच होता.

तुमचं रुंद कपाळ – तेच आम्हा सर्व नातवंडांना मिळालं. लोक म्हणतात, जितकं रुंद कपाळ, तितकं मोठं नशीब. खरंतर आमच्या सगळ्यांची नशीबं तुम्हीच लिहिलीत. गावाकडं आजोबांचं नातवंडांशी फारसं बोलणं होत नाही, पण तुम्ही आमच्यासोबत मोकळ्या छतावर रम्मी खेळायचात. आम्हाला पत्ते खेळताना पाहून आजी किती चिडायची. पण लोक काय म्हणतील याचा तुम्ही कधीच विचार केला नाही. तुमचं आयुष्य तुमच्या आनंदासाठी होतं – खरंखुरं आणि स्वाभाविक.

मम्मी कठौती गावात बारावीपर्यंत शिकलेली पहिली मुलगी होती – कारण तुम्ही तिच्या पाठीशी होता. मम्मी थोडी शिकली, म्हणून आम्ही पूर्णपणे शिकू शकलो. खरंच, सुपर नाना तर तुम्हीच होता.

बर्‍याच वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही घरात संडास बांधायचं ठरवलं, तेव्हा धार्मिक आणि पारंपरिक मतांमुळे सगळ्या शेजाऱ्यांनी विरोध केला. पण तुम्ही ठाम होता. आज प्रत्येक घरात संडास आहे, पण त्याकाळी समाजाच्या विरोधात जाऊन विचार बदलणारे सुपर नाना तुम्हीच होता.

माझ्या लहानपणापासून ऐकतेय, तुम्ही कितीतरी लोकांना मदत केली. नात्यांच्या पलीकडे जाऊन समाजाचं भान ठेवणारे होता. जेव्हा पंचायतीराज मध्ये महिलांसाठी आरक्षण आलं, आणि आजीचं नाव पुढं आलं तेव्हा कोणताही संकोच न करता निवडणूक लढवायला आजीला परवानगी दिलीत. नंतर मम्मीसाठीसुद्धा हाच विषय निघाला, पण सासरच्यांनी विरोध केला. एके काळी बारावी शिक्षणानंतर सरकारी नोकरी मिळायची, तेव्हा तुम्ही मम्मीसाठी फॉर्म आणला होता. पण तिला परवानगी मिळाली नाही. मात्र ९० च्या दशकात पत्नीला निवडणुकीसाठी उभे करणारे सुपर नाना तुम्हीच होता.

असे असंख्य प्रसंग आहेत – बालपणापासून आतापर्यंत तुमच्या निश्चयी वृत्तीनं मी प्रभावीत झाले. उभ्या आयुष्यात मी कधी तुम्हाला कुणाशी मोठ्या आवाजात बोलताना पाहिलं नाही. आम्ही मुलांनी कधीही तुमच्या तोंडून अपशब्द ऐकला नाही. ही गोष्ट अनेकांना साधी वाटेल, पण मी ज्या जातीय आणि ग्रामीण पार्श्वभूमीबद्दल बोलतेय तिथं असा संयम साधुत्वाचंच प्रतीक आहे. असंही नाही की, आम्ही सगळयांनी तुम्हाला कधी नाराज होण्याची संधी दिली नाही. अनेकदा तसे प्रसंग घडले असतील. पण तरीसुद्धा आयुष्यभर इतक्या धीरानं जगणारे सुपर नाना तुम्हीच होता.

तुम्हाला माझ्या भाषणांचा, चित्रांचा, कवितांचा, प्रगतीचा प्रचंड अभिमान होता. जेव्हा माझी निवड रिझर्व्ह बँकेत झाली, तेव्हा तुमचा आनंद गगनात मावत नव्हता. आयुष्यभर स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूरमध्ये नोकरी केल्यानंतर तुम्ही सहाय्यक व्यवस्थापक म्हणून निवृत्त झालात. आणि तुमची नात ‘रिझर्व्ह बँके’मध्ये मॅनेजर झाली – ही तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आंतरजातीय विवाह असूनही तुम्ही मला आणि पतीला मनापासून स्वीकारलंत. माझ्या समोर कधीही याविषयी तक्रारीचा एक शब्दही उच्चारला नाहीत.

मी आयएएस झाल्यानंतर तुम्हाला थोडी काळजी वाटत होती – कारण जबाबदारी, बदल्या आणि सरकारी दगदगीत मी माझं कुटुंब कसं सांभाळीन याची तुम्हाला काळजी होती. तुम्हाला माहीत होतं की, रामकथा वाचून ज्या मुलांवर संस्कार केलेत, त्यांच्यासाठी साम-दाम-दंड-भेदाची कूटनीती आणि नात्यागोत्यांतील कौरवांच्या महाभारताशी लढणे तापदायक राहील. आणि खरंच कार्यालयीन व्यग्रता आणि कौटुंबिक जबाबदा-यांबरोबरच कविता, चित्रकला वगैरे आवडी सांभाळणं कठीण बनलं. परंतु ज्या प्रकारे तुम्ही मला अभिमानानं सुपर नायिका म्हणत होता,  पुढच्या सगळ्या काळात संघर्षाची वाट सोपी बनली.

आतापर्यंतच्या प्रवासात तुम्ही एकदाच, ७ वर्षांपूर्वी मला कामासाठी फोन केला होता – एका ओळखीच्या व्यक्तीच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनासाठी मी यावं म्हणून. बाकी कुठल्याही गोष्टींची चौकशी न करता मी लगेच होकार दिला. तुमच्या विनंतीवरून मी स्टडी सेंटर्सचं उद्घाटन केलं आणि एका वर्गात मुलांना शिकवलंही. पण नियती असा खेळ खेळली की या सगळ्यामुळं एक स्थानिक राजकीय व्यक्ती दुखावली गेली. आणि त्यानंतर एक मोठं आंदोलन उभं राहिलं. लोक विचारतात की खातरजमा न करता एखादं निमंत्रण स्वीकारल्यामुळं ही परिस्थिती ओढवली, तर पुन्हा असं काही करशील का? आणि मला वाटतं – माझ्या आजोबांनी काहीही मागितलं असतं, मी नाही म्हणू शकले नसते. वचनपूर्तीसाठी “रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाए पर वचन ना जाए” शिकवणा-या आजोबांच्या पहिल्या विनंतीचा मान तर ठेवायलाच पाहिजे होता. आणि ती तर त्यांची अखेरची विनंतीही होती. इतक्या वर्षांत कधी कुणासाठी त्यांनी काही सांगितलं नाही. जर पुन्हा त्या प्रसंगाला सामोरं जायचं असेल तर मी निःसंकोचपणे त्यांची विनंती मान्य केली असती. भले कुठला मोर्चा आला असता किंवा अपमान झाला असता. आयुष्यात जर काही निःस्वार्थीपणे करता येत नसेल तर त्या जगण्याला काय अर्थ आहे.

काल माझ्या ऑफिसमध्ये एक मोठा कार्यक्रम होता. मुंबई, दिल्लीहून अनेक मान्यवर आले होते. त्याच वेळी तुमची अंत्ययात्रा निघत होती. माझं कार्यालय झेंडूच्या फुलांनी सजवलं गेलं होतं. राहून राहून तुम्ही या जगात नसल्याचं दुःख डोळ्यातून झरत होतं. मग आठवायचं, की तुम्ही असता तर म्हणाला असता, `सुपर नायिका आपला प्लॅन कधी बदलत नाही, उत्तमपणे कार्यक्रम पार पाडा.` परंतु हेही आठवतं की, आता मला सुपर नायिका म्हणणारं कुणी राहिलेलं नाही. हृदयात तीव्रतम दुःख आणि चेह-यावर हसू असं दुहेरी जगणं सोपं नव्हतं. पण आयुष्यभर दुःख आणि यातनांचा कणखरपणे सामना करायलाही सुपर नानांनीच आम्हाला शिकवलंय.

या महिन्यातच मी मुलांसह तुम्हाला भेटायला आले होते. अद्विज आणि अद्विन दोघांनाही तुम्ही आशीर्वाद दिला. तुमचं अशक्त शरीर पाहून मन गलबलून आलं. गावातल्या मंदिरात, पुष्करच्या ब्रह्मा मंदिरात प्रार्थना केली – तुम्हाला यातनेतून मुक्ती मिळो. देवाने ऐकलं – अवघ्या ११ दिवसात, एकादशीच्या दिवशी तुम्ही वैकुंठवासी झालात. तुम्ही यातनांपासून मुक्त झालात. पण आमच्या आयुष्यात खूप सा-या आठवणी मागे ठेवून गेलात. मी कधीच विसरणार नाही, की अखेरपर्यंत तुम्ही जोपर्यंत बोलत होता, तुम्ही मला सुपर नायिकाच म्हणत होता. आता मला कुणी सुपर नायिका म्हणणार नाही, कारण माझे सुपर नाना राहिले नाहीत.

आणि हो – एक दिवस तुमच्यावर एक पुस्तक लिहीन. तीच असेल माझी खरी श्रद्धांजली – माझ्या सुपर नानाजींसाठी.

(अनुवादः विजय चोरमारे)

(निधी चौधरी या आयएएस अधिकारी असून कवयित्री आणि चित्रकारही आहेत. सध्या त्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या उपसंचालक आहेत.)

(फेसबुकवरून साभार)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00