पाटणा : “रफ्तार पकड चुका बिहार, फिर से एनडीए सरकार” या घोष वाक्यासह बिहार विधानसभेच्या अठराव्या निवडणुकांना सामोरे जात असताना पुन्हा एकदा सत्तेवर येऊ पाहणाऱ्या एनडीए सरकारच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावरून भाजप आणि संयुक्त जनता दलामध्ये धुसफूस चालू आहे. उत्तम प्रशासक आणि विकास पुरुष म्हणून ज्यांची प्रतिमा आहे तसेच वीस वर्षे बिहारचे मुख्यमंत्री असलेले नितीशकुमार यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करण्यास भाजप तयार नाही.
वसंत भोसले
देशात सलग तीन वेळा सत्ता स्थापन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला चौदा राज्यांमध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करता आली. शिवाय बिहार आणि आंध्र प्रदेश सारख्या मोठ्या राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकारमध्ये भाजप सहभागी आहे. असे असले तरी उत्तर भारतातील बिहार हे एकमेव राज्य आहे, ज्या राज्यात भाजपला स्वतःचा मुख्यमंत्री करता आलेला नाही. गेली ३५ वर्षे जनता दलाची राजवट अनुक्रमे लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आहे.
नितीश कुमार यांना बाजूला करून भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री बनवण्याचा अयशस्वी प्रयत्न भाजपने काही वेळा करून पाहिला आहे. पण नितीश कुमार यांनी ही खेळी हाणून पाडली आहे. मागील निवडणुकीत (२०२०) भाजपने चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्षाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीत घेतले नव्हते. परिणामी चिराग पासवान यांनी आपल्या पक्षाचे १५० उमेदवार राज्यभर उभे केले होते. त्यामुळे नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षाला केवळ ४३ जागा मिळाल्या. भाजपने ७४ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रीय जनता दलास ७५ आणि काँग्रेसला १९ जागा मिळाल्या. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (एम एल) ला बारा जागा मिळाल्या होत्या. (BJP is far from the Chief Minister’s post in Bihar)
लोक जनशक्ती पक्षाच्या उमेदवारामुळे आपल्या पक्षाचे दोन डझन उमेदवार थोड्या मताने पराभूत झाले, असा आरोप नितीश कुमार यांनी केला होता आणि ती वस्तुस्थिती देखील होती. या निवडणुकीत देखील लोक जनशक्ती पक्षाला २९ जागा देण्यास नितेश कुमार यांचा विरोध होता. पण भाजपने त्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून चिराग पासवान यांना अधिक जागा दिल्या शिवाय चिराग पासवान यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेले आहे.
हिंदी पट्ट्यामध्ये बिहार या एकमेव राज्यांमध्ये भाजपला गेल्या निवडणुकीत एनडीए आघाडीमध्ये सर्वाधिक जागा जिंकून देखील नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करावे लागले. नितीश कुमार यांच्या मागे असलेला अति पिछडावर्ग (महा दलित) आणि महिलांची सहानभूती तसेच ओबीसी समाजाच्या पाठिंबामुळे भाजप त्यांना दुखवू शकत नाही. भाजपला केवळ दहा टक्के असलेल्या उच्चवर्णीय समाजाची हमखास मते मिळतात. याउलट ओबीसी, अति पिछाडा आणि दलित वर्गाची मते तुलनेने कमी मिळतात. (BJP is far from the Chief Minister’s post in Bihar)
लालूप्रसाद यादव यांनी राष्ट्रीय जनता दलाची स्थापना केल्यानंतर यादव, ओबीसी आणि मुस्लिम मतांच्या जोरावर पंधरा वर्षे सत्तेवर राहण्यात यश मिळवले. यापैकी ओबीसी वर्ग बाजूला करण्यात नितीस कुमार यांना यश आले. शिवाय संख्येने सर्वात मोठा असलेल्या अति पिछडा वर्गाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्यात आले. शिवाय सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देऊ केले. नितीश कुमार यांची आणखीन एक जमेची बाजू म्हणजे त्यांनी महिलांसाठी विविध योजना अत्यंत लक्षपूर्वक राबवल्या. दारूबंदी राबविल्याने त्यांची सहानुभूती नितीश कुमार यांना मिळालेली आहे.
नितीश कुमार यांच्या मागे असलेला वर्ग भारतीय जनता पक्षाला आपल्याकडे वळवता आलेला नाही. उत्तर प्रदेश प्रमाणे बिहारमध्ये उच्चवर्णीय आणि मध्यमवर्गीय मतदारांची संख्या कमी आहे. परिणामी अयोध्येच्या राम मंदिर आंदोलनाचा परिणाम बिहारमध्ये दिसून येत नाही. त्या ऐवजी आरक्षण रोजगार निर्मिती, शिक्षण आणि आरोग्य सारख्या सुविधा तसेच शेतीला सवलती देण्याच्या योजना राबवणारे सरकार यशस्वी होते. हे सूत्र नितीश कुमार यांनी तंतोतंत पाळल्यामुळे त्यांना सलग चार वेळा यश मिळाले. ही त्यांची जमेची बाजू असल्याने भाजप त्यांना डावलून बिहारचे राजकारणच करू शकत नाहीत. दरम्यान यावेळी मात्र नितीश कुमार यांच्या पक्षाला कमी जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री पदावर दावा करण्याचा भाजपचा विचार आहे. याच कारणासाठी नितीश कुमार हे एनडीए सरकारचे मुख्यमंत्री पदाचे चेहरा असतील, असे जाहीर करण्यास तयार नाही. राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महाआघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून तेजस्वी यादव यांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. (BJP is far from the Chief Minister’s post in Bihar)
अमित शाहांचा चेहरा गायब
भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा शब्द अंतिम मानला जातो. पक्षाच्या कोणत्याही संघटनात्मक डावपेचामध्ये अमित शाह यांची भूमिका खूप महत्त्वाची असते. मात्र नितीश कुमार यांच्याशी त्यांचे फारसे जमत नाही. चिराग पासवान यांना अधिक जागा दिल्याने संतप्त झालेल्या नितीश कुमार यांना शांत करण्यासाठी अमित शाह तातडीने बिहारमध्ये तीन दिवस आले होते. तेव्हा नितीश कुमार यांच्या निवासस्थानी भेट दिली पण ती केवळ पंधरा मिनिटांची भेट ठरली आणि नितीश कुमार प्रचारासाठी निघून गेले. या भेटीनंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नितीश कुमार असेल का असे पत्रकारांनी विचारले असता नव्याने निवडून येणारे आमदार नेता निवडतात असे उत्तर दिले होते. नितीश कुमार आणि अमित शाह यांच्यामधील तणावामुळे बिहार मधील सर्व प्रचाराच्या फलकावरून अमित शाह यांचा यांचे छायाचित्र गायब झाले आहे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)