Newzealand Win : न्यूझीलंडची विजयी सलामी

Newzealand Win

वेलिंग्टन : यजमान न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे मालिकेतील पहिला सामना ९ विकेटनी जिंकून विजयी सलामी दिली. मॅट हेन्रीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा डाव १७८ धावांत आटोपून न्यूझीलंडने हे आव्हान २७ व्या षटकात पार केले. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. (Newzealand Win)

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचे आघाडीचे चार फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे दहा षटकांअखेर त्यांची अवस्था ४ बाद २३ अशी झाली होती. त्यानंतर आविष्का फर्नांडो आणि जनिथ लियानगे यांनी पाचव्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचत संघाचे शतक धावफलकावर लावले. फर्नांडोने ६३ चेंडूंमध्ये ६ चौकार व एका षटकारासह ५६ धावांची खेळी केली. लियानगेने ४ चौकार व एका षटकारासह ३६ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर तळातील वनिंदू हसरंगाने केलेल्या ३५ धावांमुळे श्रीलंकेला पावणेदोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. मॅट हेन्रीने १९ धावांत ४ विकेट घेतल्या.(Newzealand Win)

श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना विल यंग आणि रचिन रवींद्र यांनी न्यूझीलंडला ९३ धावांची सलामी दिली. विक्रमसिंघेने रवींद्रला बाद करून ही जोडी फोडली. रवींद्रने ३६ चेंडूंमध्ये ६ चौकार व एका षटकारासह ४५ धावा केल्या. त्यानंतर यंग आणि मार्क चॅपमन यांनी नाबाद ८७ धावांची भागीदारी रचून विजयी लक्ष्य पार केले. यंग ८६ चेंडूंमध्ये १२ चौकारांसह ९० धावांवर नाबाद राहिला. चॅपमनने नाबाद २९ धावा केल्या. या मालिकेतील दुसरा सामना ८ जानेवारी रोजी हॅमिल्टन येथे होणार आहे.

संक्षिप्त धावफलक : श्रीलंका – ४३.४ षटकांत सर्वबाद १७८ (आविष्का फर्नांडो ५६, जनिथ लियानगे ३६, वनिंदू हसरंगा ३५, मॅट हेन्री ४-१९, जेकब डफी २-३९) पराभूत विरुद्ध न्यूझीलंड – २६.२ षटकांत १ बाद १८० (विल यंग नाबाद ९०, रचिन रवींद्र ४५, मार्क चॅपमन नाबाद २९, चामिदू विक्रमसिंघे १-२८).

Related posts

KSA Football :‘शिवाजी’ची ‘दिलबहार’वर मात

Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १२ जानेवारीला संघनिवड

‌Bumrah Injury : बुमराह इंग्लंडविरुद्धच्या मालिकेस मुकणार?