कसोटी क्रमवारीत रिषभची हनुमान उडी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत-न्यूझीलंड यांच्यातील बंगळुरू कसोटीनंतर आयसीसी टेस्ट क्रमवारीत मोठे बदल झाले आहेत. आज (दि.२३) आयसीसीने क्रमवारीची ताजी यादी जाहीर केली. यामध्ये इंग्लंडचा फलंदाज जो रूटची घसरण झाली आहे. तर, भारताचा कमबॅक किंग रिषभ पंतने आणि सर्फराज खानने मोठी झेप घेतली आहे. मात्र, नव्या यादीत टॉप 2 मध्ये कोणताही बदल झालेला नाही. (ICC Test Rankings)

बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी सुमार कामगिरी केली होती.  यात भारताच्या पाच फलंदाजांना भोपळाही फोडता आला नव्हता. यात सर्फराजचाही समावेश होता. तर पहिल्या डावात सर्वाधिक २० धावांची खेळी रिषभने केली होती. यानंतर दुसऱ्या डावात रिषभ पंत आणि सर्फराज खान यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता.  यात रिषभने ९९ तर सर्फराजने १५० धावांची खेळी केली होती. या खेळीमुळे रिषभने टॉप १० फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे. याबाबतीत त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे. तर यशस्वी जैस्वालचा पहिल्या पाच यादीत समावेश आहे.

कोहली आठव्या स्थानावर

आयसीसने जाहीर केलेल्या कसोटीच्या ताज्या यादीत टॉप १०मध्ये भारताच्या तीन फलंदाजांचा समावेश आहे. यामध्ये ७८० गुणांसह यशस्वी जैस्वाल चौथ्या स्थानावर आहे. तर पंतने तीन स्थानाची झेप घेत विराटला मागे सोडले आहे. पंतचे ७४५ गुण आहेत. यादीत कोहली आठव्या स्थानावर आहे.

३१ स्थानांनी सर्फराजने घेतली मोठी झेप

बंगळुरू कसोटीत न्यूझीलंडविरूद्ध सर्फराजने दुसऱ्या डावात १५० धावांची दमदार खेळी केली होती. या खेळीचा फायदा त्याला आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत झाला आहे.  क्रमवारीत तो आता ५३ व्या स्थानावर पोहोचला आहे. सर्फराजने कसोटीच्या ताज्या क्रमवारीत ३१ स्थानांनी झेप घेतली आहे. त्याच्या कारकिर्दीतील हे मोठे यश आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जडेजा अव्वल

आयसीसीच्या कसोटी पुरूष अष्टपैलूच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा अव्वल स्थानावर आहे. रविचंद्रन अश्विन यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तर अक्षर पटेल सातव्या स्थानावर कायम आहे. जसप्रीत बुमराह कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.

हेही वाचा :

Related posts

India-Pak : भारत-पाक २३ फेब्रुवारीला भिडणार

Pak Series win : पाकचे निर्भेळ यश

Indian women’s win : भारताचा मोठा विजय