गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त

रायगडः गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याच्या कामांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी खासदार श्रीरंग बारणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सर्वश्री आमदार प्रशांत ठाकूर, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, रवींद्र पाटील, विभागीय आयुक्त पी.वेलरासू, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पनवेल पळस्पे येथून मुंबई-गोवा मार्गावरील रस्त्यांच्या कामांच्या प्रत्यक्ष पाहणीला मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आणि कशेडी घाटातील भोगाव येथील बोगद्याच्या ठिकाणी पाहणी दौऱ्याची सांगता झाली.  या १५५  किलोमीटर रस्त्याच्या पाहणीदरम्यान त्यांनी पळस्पे, गडब, कोलाड, माणगाव, लोणेरे फाटा आणि कशेडी बोगदा या ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची भर पावसात पाहणी केली.  शेवटी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी या महामार्गावरील रस्त्यांची राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याविषयी निर्देश दिले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. पहिली टेक्नॉलॉजी एम ६० आरएफसी आणि लिओ पॉलिमर पद्धत, दुसरी रॅपिडेक्स हार्डनर एम ६०पद्धत आणि तिसरी डीएलसी पद्धत या तीन आधुनिक पद्धतींनी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे ब्रिक्स कास्ट एम ६० या पद्धतीचाही उपयोग करण्यात येत आहे. या पद्धतीमध्ये सिमेंटच्या तयार प्लेट्स बसवून रस्ता तयार करण्यात येत आहे.या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा तसेच उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, जे जुने कंत्राटदार काम सोडून पळाले आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिले आहेत.

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ