आजपासून ‘मिशन ऑस्ट्रेलिया’

पर्थ, वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान रंगणाऱ्या पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेस शुक्रवारपासून पर्थ कसोटीने सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील मागील दोन कसोटी मालिका भारताने जिंकल्या आहेत. यावेळी सलग तिसऱ्यांदा जिंकून मालिका विजयाची हॅट्ट्रिक साधण्यास भारतीय संघ उत्सुक आहे. त्याचवेळी, मागील दोनवेळच्या पराभवांचा वचपा काढण्याचा यजमान ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल.

आयसीसी जागतिक कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा संघ अग्रस्थानी असून भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यातही हे दोन्ही संघ सारख्याच स्थानावर आहेत. मागील महिन्यात भारताने मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची मालिका ०-३ अशी एकतर्फी गमावल्यानंतर भारताला या गुणतक्त्यातील अग्रस्थानही गमवावे लागले. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही २०२३-२५ च्या जागतिक कसोटी स्पर्धेतील भारताची अखेरची मालिका आहे. त्यामुळे, या मालिकेतील यश भारताला जागतिक स्पर्धेची अंतिम फेरीतील गाठण्यासाठी महत्त्वाचे आहे.

मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच, भारताला संघनिवडीबाबत काही कठीण प्रश्न सोडवावे लागले. भारताचा कर्णधार रोहित शर्माने मुलाच्या जन्मामुळे भारतातच थांबण्याचा निर्णय घेतला, तर सरावसत्रादरम्यान अंगठा फ्रॅक्चर झाल्यामुळे भारताचा प्रमुख फलंदाज शुभमन गिलला पहिल्या कसोटीस मुकावे लागले. आता रोहितच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करणार असून शुभमनच्या जागी देवदत्त पडिक्कलला अंतिम संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, यशस्वी जैस्वाल व लोकेश राहुल ही भारताची सलामी जोडी असेल आणि सहाव्या क्रमांकासाठी सर्फराझ खानऐवजी ध्रुव जुरेलचा समावेश संघात करण्यात येण्याची शक्यता आहे. पर्थच्या ऑप्टस स्टेडियमची खेळपट्टी उसळती असल्याने भारत तीन वेगवान गोलंदाज खेळवण्याचीही शक्यता आहे. तसे झाल्यास बुमराह व महंमद सिराजसोबत हर्षित राणा, प्रसिध कृष्णा व आकाशदीप यांच्यापैकी एकास संघात स्थान मिळू शकते. अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजाऐवजी नवोदित नितीश कुमार रेड्डीचा समावेश केला जाऊ शकतो.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ मार्चनंतर प्रथमच कसोटी क्रिकेट खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ या सामन्यात नॅथन मॅकस्विनी या नवख्या फलंदाजास सलामीवीर म्हणून संधी देण्याची शक्यता आहे. कर्णधार पॅट कमिन्ससह मिचेल स्टार्क हे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख गोलंदाज असून जोश हेझलवूड हा संघातील तिसरा वेगवान गोलंदाज असेल.

संघ : भारत – जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, रिषभ पंत, ध्रुव जुरेल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, प्रसिध कृष्णा, महंमद सिराज, आकाशदीप, वॉशिंग्टन सुंदर, अभिमन्यू ईश्वरन, सर्फराझ खान.

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लिऑन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, स्कॉट बोलंड.

कोट

मी कर्णधार असतानाही स्वतःला योग्यरीत्या सांभाळू शकतो. अतिरिक्त जबाबदारी कधी घ्यावी, हे मला समजते. येथे खेळणे हे आव्हान असले, तरी अशा आव्हानांवेळीच तुमच्या क्षमतेचा कस लागतो.

  • जसप्रीत बुमराह, भारताचा कर्णधार

सामन्याची वेळ – सकाळी ७.५० पासून

थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स व डीडी स्पोर्ट्स

Related posts

Indian women’s win : भारताचा मोठा विजय

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!