संत साहित्याचे अभ्यासक मारुतीराव जाधव यांचं निधन

कोल्हापूर : दिनमान वृत्तसेवा

तळाशी ( ता.राधानगरी) येथील तुकाराम गाथेचे निरूपणकार, संत साहित्याचे गाढे अभ्यासक मारुतीराव भाऊसो जाधव (वय ९१) यांचे निधन झाले. संत साहित्यातील योगदानाबद्दल नुकताच त्यांना शिवाजी विद्यापीठाचा पहिला पदमश्री डॉ. डी वाय पाटील पुरस्कार जाहीर झाला आहे.

मारुतीराव जाधव हे राधानगरी तालुक्यातील तळाशीसारख्या दुर्गम आणि शेतकरी कुटुंबात राहून ध्यासपूर्वक संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर संतांच्या साहित्याचा अभ्यास करत होते. शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनासाठी त्यांनी ‘तुकारामबोवांच्या गाथेचे निरूपण’ (खंड एक आणि दोन) हा सुमारे १८०० पृष्ठांचा आणि ‘कान्होबाची गाथा’ हा सुमारे ४०० पृष्ठांचा ग्रंथ सिद्ध केला आहे. त्यांनी निरूपण केलेली तुकारामबोवांची गाथा अल्पावधीत लोकप्रिय झाली असून त्याची दुसरी आवृत्तीही विद्यापीठाने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्याचबरोबर तळाशी गावातील मंदिराचा जिर्णोद्धार करण्याबरोबरच लोकजागृतीसाठी श्री ज्ञानेश्वरी व अध्यात्मावर ज्ञान देणारी ‘आनंदाश्रम’ संस्‍थेची त्यांनी स्थापना केली आहे. १९५६ पासून पंढरपूरला जाणाऱ्या पायी दिंडीचे ते संयोजन करत. गावोगावी प्रवचनाच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रबोधनाचे कामही ते अखंडितपणे करत होते.

अस्वस्थ वाटू लागल्याने कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उद्या (सोमवारी) सकाळी तळाशी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी